नौवहन मंत्रालय
कोविडच्या कठीण काळामधे देशाला स्वावलंबी बनवण्यात आणि जागतिक पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्यात नाविकांचे, महत्त्वपूर्ण योगदान सर्बानंद सोनोवाल यांनी केले अधोरेखित
Posted On:
05 APR 2022 2:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 एप्रिल 2022
कोविडच्या कठीण काळामधे देशाला स्वावलंबी बनवण्यात आणि जागतिक पुरवठा साखळी कार्यरत ठेवण्यात नाविकांचे, महत्त्वपूर्ण योगदान केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी अधोरेखित केले आहे.
59 व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या समारंभात त्यांनी सागरी क्षेत्रातल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. मोठी आव्हाने समोर असताना आपल्या भारतीय नाविकांनी धैर्याने भारताचा ध्वज जगभरात उंच फडकवत ठेवला असे ते यावेळी म्हणाले. कोविड-19 महामारीच्या काळात 2021 मध्ये 2,10,000 हून अधिक भारतीय नाविकांनी भारतीय आणि परदेशी जहाजांवर सेवा दिली. यावरुनच, जागतिक पुरवठा साखळी कार्यान्वित ठेवण्यात भारतीय नाविकांनी बजावलेली भूमिका लक्षात येते असे त्यांनी नमूद केले.
भारतीय तसेच जागतिक व्यापार आणि वाणिज्यिक व्यवहार विनाअडथळा सुरू राहतील याची यामुळे खातरजमा करण्यात आली असे ते म्हणाले. महामारीच्या काळात जगभरात काम करणार्या आपल्या भारतीय नाविकांसह आपण आपल्या समृद्ध प्राचीन भारतीय आचारविचार आणि वसुधैव कुटुंबकम किंवा संपूर्ण जग एक कुटुंब आहे या तत्त्वज्ञानाचा जगासमोर आदर्श ठेवला आहे असे सोनोवाल यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी 2070 पर्यंत भारत, नेट झिरो अर्थात निव्वळ शून्य लक्ष्य साध्य करेल अशी घोषणा केली आहे. त्यानुसार, 'भारतीय सागरी उद्योगाला, निव्वळ शून्याकडे चालना' ही यावर्षीची राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना समर्पक असल्याचे त्यांनी सांगितले. सागरी उद्योगात, भारताने नेहमीच पर्यावरण संरक्षणाच्या उद्दीष्टांमधे बाजी मारली आहे, मग ती जागतिक सल्फर मर्यादेची अंमलबजावणी असो किंवा देशांतर्गत जहाजांवर आयएमओ हरित वायू उत्सर्जन नियमांची अंमलबजावणी असो किंवा 2070 पर्यंत निव्वळ शून्याच्या दिशेने पोहोचण्यासाठी यूएनएफसीसी कडे संबंधितांची परिषद घेणे असो भारताने नेहमीच पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आणि मेरीटाईम इंडिया व्हिजन, 2030 द्वारे पाठपुरावा करून आगामी काळात, सागरी क्षेत्राद्वारे भारत जगाचे नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागतिक नौवहन क्षेत्रात भारतीय नाविकांचा वाटा 2016 ते 2019 दरम्यान 25% वाढला आहे असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.
भारतीय क्रूझ उद्योग गेल्या 3 वर्षांत सरकारी सहभागामुळे वेगाने वाढत आहे. आगामी दशकात, वाढती मागणी आणि वाढते कर पश्चात उत्पन्न यामुळे भारतीय क्रूझ बाजारपेठेत 8 पटीने वाढण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.
सागरी समुदायाने दिलेल्या अतुलनीय योगदानाचे सोनोवाल यांनी कौतुक केले. सरकार दळणवळण खर्च कमी करण्यासाठी आणि नौवहन सुलभ करण्यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ ला प्रोत्साहन देत आहे आणि भारतीय सागरी क्षेत्राला जगात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी सफदरजंग स्मारक येथे राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांच्या हस्ते वॉकेथॉनला झेंडा दाखवून झाली. यावेळी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, नौवहन विभागाचे महासंचालक (डीजी शिपिंग), बंदर विभागाचे अधिकारी आणि एनसीआर एमटीआय मधील मेरीटाईम इन्स्टिट्यूटमधील सुमारे 600 प्रशिक्षणार्थी कॅडेट, अध्यापन विद्याशाखा तसेच एनसीआर क्षेत्रातील मर्चंट नेव्ही अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सागरी दिनाच्या उत्सवाला विशेष महत्त्व आहे कारण 103 वर्षांपूर्वी, 5 एप्रिल 1919 रोजी एसएस लॉयल्टी, हे भारतीय ध्वजाखालील पहिले जहाज मुंबई ते लंडनला निघाले आणि इतिहास रचला गेला.
* * *
S.Kane/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1813606)
Visitor Counter : 186