शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल 2022 रोजी परीक्षा पे चर्चाच्या 5 व्या भागात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद
Posted On:
31 MAR 2022 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल 2022 रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या 5 व्या भागात जगभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजल्यापासून नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे 9 वी ते 12 वी चे शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधतील.
देश कोविड-19 महामारीतून बाहेर येत असताना आणि परीक्षा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पाचव्या भागाला विशेष महत्त्व आहे.या कार्यक्रमाच्या संकल्पनांवर आधारित ऑनलाइन सर्जनशील लेखन स्पर्धेच्या आधारे निवडण्यात आलेले विद्यार्थी, शिक्षक आणि पालक पंतप्रधानांना प्रश्न विचारतील. ही स्पर्धा 28 डिसेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 या कालावधीत MyGov या मंचावर आयोजित करण्यात आली होती.
यंदाच्या परीक्षा पे चर्चा सर्जनशील लेखन स्पर्धेत 15.7 लाख स्पर्धकांनी नोंदणी केली होती,त्यात 12.1 लाखांहून अधिक विद्यार्थी, 2.7 लाख शिक्षक आणि 90 हजारांहून अधिक पालकांचा समावेश होता.
शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे गेल्या चार वर्षांपासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे.परीक्षा पे चर्चाचे पहिले तीन भाग नवी दिल्ली येथे टाऊन-हॉल प्रत्यक्ष परस्पर संवाद स्वरूपात आयोजित करण्यात आले होते .पंतप्रधानांच्या या संवादात्मक कार्यक्रमाचे "परीक्षा पे चर्चा 1.0" प्रथम आयोजन 16 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजित करण्यात आले होते .शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवादात्मक कार्यक्रमाचा दुसरा भाग ''परीक्षा पे चर्चा 2.0", 29 जानेवारी 2019 रोजी आणि 3रा भाग 20 जानेवारी 2020 रोजी आयोजित करण्यात आला होता. कोविड 19 महामारीमुळे,चौथा भाग 7 एप्रिल 2021 रोजी ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन (डीडी नॅशनल, डीडी न्यूज, डीडी इंडिया), आकाशवाणी वाहिन्या , दूरचित्रवाणी वाहिन्या , डिजिटल मीडियासह शिक्षण मंत्रालय , नरेंद्र मोदी , पीएमओ इंडिया , पीआयबी इंडिया , दूरदर्शन नॅशनल, मायगव्हइंडिया , डीडी न्यूज राज्यसभा टीव्ही, स्वयंमप्रभा यांच्या युट्युब वाहिन्यांवरून करण्यात येणार आहे.
S.Kulkarni/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1812154)
Visitor Counter : 283