पंतप्रधान कार्यालय

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठीच्या ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या संबंधितांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे साधला संवाद

Posted On: 15 MAR 2022 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2022

 

युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या सर्व संबंधितांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या मोहिमेद्वारे सुमारे 23,000 भारतीय नागरिक आणि इतर 18 देशांच्या 147  नागरिकांना युक्रेनमधून यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले.

या चर्चेदरम्यान युक्रेन,पोलंड,स्लोव्हेकिया,रोमानिया आणि हंगेरी या देशांतील भारतीय समुदायाचे प्रतिनिधी तसेच खासगी क्षेत्रातील प्रतिनिधींनी ऑपरेशन गंगामध्ये सहभागी होतानाचे त्यांचे अनुभव, त्यांच्यासमोर उभी राहिलेली आव्हाने यांच्याबद्दल सांगितले आणि अशा प्रकारच्या जटील मानवी कारवाईमध्ये सहभागी झाल्याबद्दल समाधान आणि गौरवाची भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी, या कारवाईच्या यशस्वितेसाठी अथकपणे काम करणारे भारतीय समुदायाचे नेते, स्वयंसेवक पथके, विविध कंपन्या, खासगी क्षेत्रातील व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांबद्दल मनापासून कौतुकाची भावना व्यक्त केली. ऑपरेशन गंगा मध्ये सहभागी झालेल्यांचा देशभक्तीचा उत्साह, समाजसेवेची भावना आणि या संपूर्ण मोहिमेदरम्यान सर्व संबंधितांनी दर्शविलेली संघभावना याची देखील पंतप्रधानांनी प्रशंसा केली. विविध सामाजिक संघटनांनी अगदी परदेशात देखील भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे दर्शन घडवत निःस्वार्थी सेवाभावाने जे काम केले त्याचा उल्लेख करून या संघटनांचे त्यांनी विशेष कौतुक केले.  

या संकटाच्या परिस्थितीत भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या सुनिश्चीतीसाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांच्या नेत्यांशी केलेल्या व्यक्तिगत चर्चेचे स्मरण करत  त्या सर्व परदेशी सरकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

परदेशात असलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेला भारत सरकार देत असलेल्या प्राधान्याचा पुनरुच्चार करत पंतप्रधान मोदी यांनी भारताने नेहमीच कोणत्याही आंतरराष्ट्रीय संकटाच्या वेळी आपल्या नागरिकांना तत्परतेने मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत याचे सर्वांना स्मरण करून दिले. वसुधैव कुटुंबकम या भारताच्या प्राचीन तत्वज्ञानाच्या मार्गदर्शनानुसार भारताने प्रत्येक आपत्तीच्या वेळी इतर देशांच्या नागरिकांना देखील मानवतेच्या भावनेतून मदत केली आहे असे ते म्हणाले.


* * *

N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1806374) Visitor Counter : 229