युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पॅरालिम्पिक रौप्य पदक विजेता योगेश कथुनिया यांनी बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या ‘मीट द चॅम्पियन्स’ उपक्रमाला केली सुरुवात, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाटण्याच्या स्थानिक मुलींच्या सर्व शाळांना दिली भेट
Posted On:
08 MAR 2022 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2022
पॅरालिम्पिक रौप्य पदक विजेता योगेश कथुनिया यांनी मंगळवार, 8 मार्च रोजी पाटणाच्या मुलींच्या सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेला भेट दिली आणि देशाच्या पूर्वेकडील भागात संतुलित आहार आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेल्या शाळा भेट मोहिमेला सुरुवात केली. मीट द चॅम्पियन्स, टोकियो 2020 ऑलिंपियन्स या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ऑलिपिंक विजेते देशभरातील शाळांना भेट देत आहेत.

योगेश यांनी याप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. योगेश यांच्या बालपणी त्यांना बरे करण्यात त्यांच्या आईने मोठी भूमिका बजावली होती, त्याची आठवण काढत ते म्हणाले, “ती नेहमीच माझ्या पाठीशी राहिली आहे आणि मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मी विशेषत: हा महिला दिन तिला समर्पित करतो.”

त्यानंतर त्यांनी आपल्या पॅरालिम्पिक प्रवासाबद्दल सांगितले. “माझ्यासाठी हा प्रवास 2017 मध्ये सुरू झाला असला तरी, याच खेळात कारकीर्द घडवायची आहे हे मला लगेच समजले आणि तेव्हापासून मी स्वतःला पूर्णपणे या खेळासाठी समर्पित केले" असे ते म्हणाले.
मीट द चॅम्पियन्सचा उपक्रम हा सरकारच्या ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा’ एक भाग आहे. डिसेंबर 2021 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती.

आत्तापर्यंत 9 ऑलिंपिक खेळाडू आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत 600 हून अधिक शाळांच्या विद्यार्थी प्रतिनिधींना भेट दिली आणि त्यांचे जीवन अनुभव, धडे, योग्य आहार कसा घ्यावा याबद्दलची माहिती दिली तसेच शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी प्रोत्साहन दिले आहे.
पाटणा येथे योगेश यांच्या कार्यक्रमादरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने विविध शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना आमंत्रित केले, जेणेकरुन विद्यार्थ्यांशी योगेश संवाद साधू शकतील आणि त्यांना खेळासाठी प्रवृत्त करू शकतील.

समतोल आहार प्रत्येकासाठी कसा महत्त्वाचा आहे याविषयी योगेश यांनी मार्गदर्शन केले. "आपल्याला सर्व अन्नपदार्थांची गरज आहे, अगदी साखरसुद्धा, पण योग्य प्रमाणात आणि योग्य अन्नपदार्थातून. जंक फूडमधून देखील तुम्हाला प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात, परंतु त्यामध्ये वाईट मेदाचे (सॅच्युरेटेड फॅट्सचे) प्रमाणही जास्त असते जे तुम्ही टाळायला हवे. त्यामुळे तुमच्या प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सच्या स्रोतासाठी योग्य अन्नपदार्थ शोधणे महत्त्वाचे आहे."
स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर योगेश तिथे उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व्हॉलीबॉलही खेळले आणि खेळाडूंच्या पुढील पिढीला सर्व प्रकारचे खेळ खेळण्याची प्रेरणा दिली.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही अनोखी शाळा भेट मोहीम आयोजित केली जात आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताच्या प्रचंड यशानंतर हा उपक्रम सुरू झाला. पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधताना त्यांना 75 शाळांना भेट देण्याची आणि संतुलित आहार आणि तंदुरुस्तीचे महत्त्व सांगण्याची विनंती केली होती.
* * *
R.Aghor/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1804073)
अभ्यागत कक्ष : 260