पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऑपरेशन गंगा’ चा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

Posted On: 28 FEB 2022 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘ऑपरेशन गंगा’ च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी कालपासून 'ऑपरेशन गंगा' या नावाने मोहीम सुरु करण्यात आली आहे. तिथे अडकलेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित रहावेत, यासाठी सरकारची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांचे विशेष दूत म्हणून चार वरिष्ठ मंत्री युक्रेनजवळच्या  विविध देशात गेले असून, त्यांच्या प्रत्यक्ष तिथे जाण्याने नागरिकांना मायदेशी परत आणण्याच्या मोहिमेला मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यातून, या मुद्द्याला भारत सरकारने दिलेले प्राधान्यही अधोरेखित होत आहे, असे त्यांनी सांगितले.

युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाचा सामना करण्यासाठी भारताने पाठवलेल्या मदतीची पहिली खेप उद्या पाठवली जाईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

‘वसुधैव कुटुंबकम’ हा भारताचा मूलमंत्र असून, भारत, आपल्या शेजारील राष्ट्रांना तसेच विकसनशील देशांनाही गरज पडल्यास, युक्रेनमधल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती मदत करेल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

 

* * *

R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801940) Visitor Counter : 218