पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य क्षेत्रावर केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चा सकारात्मक परिणाम या वरच्या वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 26 FEB 2022 9:57PM by PIB Mumbai

 

नमस्कार !

मंत्रिमंडळातले माझे सहकारी, देशभरातून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित सर्व व्यावसायिक, निमवैद्यकीय कर्मचारी, परिचारक, आरोग्य व्यवस्थापक, तंत्रज्ञान आणि संशोधनाशी जोडले गेलेले महनीय, महिला आणि सज्जन हो!

सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांनी जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वीपणाने चालविल्याबद्दल 130 देशवासियांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे खूप- खूप अभिनंदन करतो. भारताची आरोग्य व्यवस्था किती कार्यक्षम आहे, कशा प्रकारे मिशन ओरिएंटेडआहे, ही गोष्ट तुम्ही मंडळींनी संपूर्ण जगासमोर सिद्ध केली आहे.

 

मित्रांनो,

हा अर्थसंकल्प गेल्या सात वर्षांपासून  आरोग्य व्यवस्थेत सुधारणा आणि परिवर्तन करण्यासाठी आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांचा विस्तार आहे, आणि जे अंदाजपत्रक शास्त्रातले जाणकार, तज्ज्ञ आहेत, त्यांना ही गोष्ट नक्कीच जाणवत असणार की, अगदी पहिल्या दिवसापासून आमचा अर्थसंकल्प असो अथवा आमचे धोरण असो, त्यामध्ये सातत्य आहे आणि पुरोगामी विचारधारा उलगडणारे कार्य आहे. आम्ही आपली आरोग्यसेवा प्रणाली तयार करताना एक समग्र दृष्टीकोन स्वीकारला आहे. आज आपल्या दृष्टीने आरोग्य क्षेत्राला प्राधान्य तर आहेच त्याच बरोबर आरोग्य कल्याणला- निरोगीपणाला तितकेच जास्त प्राधान्य आहे. आम्ही आजारांना जबाबदार ठरणारे घटक दूर करणे, निरोगी समाज निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आजाराच्या स्थितीमध्ये उपचारही समावेशक असावेत, यासाठी लक्ष्य केंद्रीत करीत आहोत. म्हणूनच स्वच्छ भारत अभियान असो, फिट इंडिया मिशन असो, अशा सर्व उपक्रमांला आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे.

 

मित्रांनो,

आम्ही ज्यावेळी आरोग्य क्षेत्रामध्ये समग्र आणि सर्वसमावेशकतेविषयी बोलतो, त्यावेळी तीन घटकांचा समावेश करीत आहोत. पहिला घटक आहे - आधुनिक वैद्यकीय विज्ञानाशी संबंधित पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा विस्तार. दुसरा घटक आहे- आयुषसारख्या पारंपरिक भारतीय औषधोपचार पद्धतीमध्ये संशोधनाला प्रोत्साहन आणि आरोग्यसुविधा कार्यप्रणालीमध्ये या पद्धतीचा कृतीशील सहभाग. आणि तिसरा घटक म्हणजे - आधुनिक आणि भविष्यातल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक भागापर्यंत चांगली आणि परवडणारी आरोग्य सेवा -सुविधा पोहोचविणे. यासाठी आम्ही आरोग्य क्षेत्राच्या अंदाजपत्रकामध्ये खूप चांगली वृद्धी केली आहे.

 

मित्रांनो,

आम्ही भारतामध्ये अशा  आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बनवू इच्छितो की, त्या काही फक्त मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित असू नयेत. आणि तुम्ही पाहिलेच असेल की, याविषयी मी सातत्याने जगासमोर चर्चा करीत असतो. विशेष करून कोरोनानंतर तर मी म्हणतो की, ‘वन अर्थ, वन हेल्थया उद्देशाने, या चैतन्याने आपल्याला हिंदुस्तानमध्येही -वन इंडिया, वन हेल्थअशी मोहीम सुरू करून दूर- अतिदुर्गम क्षेत्रांमध्येही समान व्यवस्था विकसित करायची आहे. आमचा प्रयत्न आहे की, गंभीर, अतिदक्षतेची आवश्यकता असलेली आरोग्य सुविधा गट स्तरावरही उपलब्ध असावी. जिल्हा स्तरावरही असावी, गावांना जवळ पडेल, अशा ठिकाणीही असावी. या पायाभूत सुविधांची निगराणी, देखभाल करणे आणि वेळो-वेळी त्या उन्नत करणे अतिशय जरूरीचे आहे. म्हणूनच यासाठी खाजगी क्षेत्र आणि इतर क्षेत्रांनीही आपल्याकडची जास्त शक्ती लावून पुढे यायचे आहे.

 

मित्रांनो,

चांगल्या धोरणाबरोबरच त्याच्या चांगल्या अंमलबजावणीचीही आवश्यकता आहे. यासाठी गरज आहे ती, तळापर्यंतच्या  स्तरावर म्हणजेच प्रत्यक्षात धोरणांची अंमलबजावणी ज्यांच्याकडून केली जाते, त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. यासाठी या अंदाजपत्रकामध्ये आम्ही दोन लाख अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून उन्नत करून त्यांना अधिक सशक्त करण्यासाठी तरतूद केली आहे. हीच गोष्ट पोषण 2.0 या योजनेवियषीही लागू होते.

 

मित्रांनो,

प्राथमिक आरोग्य क्षेत्राचे जाळे अधिक बळकट करण्यासाठी दीड लाख आरोग्य आणि कल्याण केंद्रांच्या निर्मितीचे कामही वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत 85 हजारांपेक्षा  जास्त केंद्रांमध्ये नियमित तपासणी, लसीकरण, चाचण्यांची सुविधा देण्यात आली आहे. यावेळी अर्थसंकल्पामध्ये यामध्ये मानसिक आरोग्यसेवेची सुविधाही जोडण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत आपण कसे पोहचू शकू, जागरूकता कशा पद्धतीने निर्माण करता येईल, यासाठी आपण सर्वांनी मिळून, अर्थात यामध्‍ये तुम्हालाही तुमचे प्रयत्न वाढविले पाहिजेत.

 

मित्रांनो

अधिक चांगल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा फक्त सुविधाच नाही, तर आरोग्य सेवेची मागणीही वाढवित असतात. त्यामुळे हे एक रोजगार वृद्धीचेही मोठे माध्यम आहे. गेल्या वर्षांमध्ये ज्या-ज्याप्रमाणे आरोग्य सेवेची मागणी वाढत आहे, त्यानुसार आम्ही कुशल आरोग्य व्यावसायिक तयार करण्याचाही प्रयत्न करीत आहोत. यासाठी अंदाजपत्रकामध्ये आरोग्य शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांच्याशी संबंधित मनुष्य बळ विकासासाठीच्या तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठी वाढ केली आहे. वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित सुधारणा आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या निर्मितीमध्ये यासंबंधी  आमच्या वचनबद्धतेविषयी आपण सर्वजण चांगलेच परिचित आहात. या सुधारणा करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढे कसे जाता येईल, गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणात  अधिक  सुधारणा  कशी करता येईल, अधिक सर्वसमावेशक आणि सर्वांना परवडणारे कसे बनवता येईल, यासाठी काही ठोस पावले एका निश्चित कालावधीमध्ये आपल्याकडून उचलली गेली पाहिजेत.

 

मित्रांनो,

आरोग्य सेवेशी संबंधित आमचे उद्दिष्ट जैवतंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांच्यामध्ये आत्मनिर्भर झाल्याशिवाय साध्य होऊ शकणार नाही. कोरोना काळामध्ये आपण हा अनुभव घेतला आहे. जेनरिक, मोठ्या-घाऊक प्रमाणात औषधे, लशी या  क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी असलेल्या शक्यतांची तपासणी करून त्याकडे आपल्याला लक्ष दिले  पाहिजे. म्हणूनच आम्ही वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यासाठी लागणा-या कच्च्या मालासाठी पीएलआययोजना सुरू केली आहे.

 

मित्रांनो,

कोरोना लसीकरणामध्ये कोविनसारख्या मंचाच्या माध्यमातून आपल्या डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन, ग्राहक आणि आरोग्य सेवा प्रदाता यांच्यामध्ये एक सुलभ इंटरफेसउपलब्ध करून देत आहे. यामुळे देशामध्ये उपचार घेणे आणि देणे असे दोन्हीही अतिशय सोपे होईल. इतकेच नाही तर यामुळे भारताची गुणवत्तापूर्ण आणि परवडणारी आरोग्य सेवा प्रणाली जागतिक स्तरावर उपलब्ध होणे सुलभ होऊ शकेल. यामुळे वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल आणि देशवासियांसाठी उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध वाढतील. यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये या मिशनला सशक्त करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या नावे एक खुला मंच तयार करण्याविषयी चर्चा झाली आहे. अशा प्रकारच्या नव्या उपक्रमांविषयीच्या संधी आणि त्यांचा प्रभाव यावर आपण गांभीर्याने चर्चा केली पाहिजे.

 

मित्रांनो,

कोरोना काळामध्ये दुर्गम भागात आरोग्यसेवा, टेलीमेडिसीन, टेली सल्ला मसलत यामुळे जवळपास अडीच कोटी रूग्णांना मदत झाली. शहरी आणि ग्रामीण भारतामध्ये आरोग्य सेवा उपलब्धतेची दरी भरून काढण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी ठरू शकते. आता तर  आपल्या देशातल्या प्रत्येक गावामध्ये फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण झाले आहे. 5 जी तंत्रज्ञान येण्यासाठीही आता काही फार वेळ लागणार नाही. 5 जी तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्गम स्थानी आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी आपल्याकडच्या खाजगी क्षेत्राने आपली भागीदारी  वाढवली पाहिजे. आपल्या गावांमध्ये जितके दवाखाने आहेत, आयुष केंद्र आहेत, त्यांना आपण शहरातल्या मोठ्या खाजगी आणि सार्वजनिक रूग्णालयांबरोबर कसे जोडू शकतो, दुर्गम भागात आरोग्य सेवा आणि टेली सल्लामसलत यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देवू शकतोयावरही आपल्याकडून येणा-या शिफारशींची आम्ही वाट पहात आहोत. ड्रोन तंत्रज्ञानाचा आरोग्य सेवेमध्ये अधिकाधिक उपयोग वाढविण्यासाठी आरोग्य क्षेत्राशी जोडलेल्या खाजगी कंपन्यांनी पुढे आले पाहिजे.

 

मित्रांनो,

आयुषची भूमिका तर आज संपूर्ण दुनिया मान्य करीत आहे. आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की, जागतिक आरोग्य संघटना आपले विश्वातले एकमेव  पारंपरिक औषधोपचार जागतिक केंद्र भारतामध्ये सुरू करीत आहे. आता ही गोष्ट आपल्या सर्वांवर अवलंबून आहे की, आपण आपल्यासाठी आणि जगासाठीही आयुषच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कार्य सादर करून निरसन कसे करू शकतो. कोरोनाच्या या काळामध्ये आरोग्य सेवा आणि औषध निर्माण याबाबतीत भारताचे सामर्थ्य किती आहे, याचा परिचय संपूर्ण दुनियेला झाला आहे. म्हणूनच या वेबिनारच्या टाइम लाइनबरोबरच आवश्यक असणारा कृती आराखडाही तयार केला गेला तर एक खूप मोठी सेवा असेल असे मी मानतो. आणखीही एक गोष्ट मी करू इच्छितो, विशेष करून खाजगी क्षेत्रातल्या सहकारी मंडळींना माझे सांगणे आहे की, आज आपली मुले शिक्षणासाठी, विशेषतः वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जगातल्या लहान -लहान देशांमध्ये जात आहेत. तिथे भाषेची समस्या आहे, तरीही तिथे ते शिकायला जातात. देशाचे अब्जावधी रूपये बाहेर जात आहेत. मग आपली खाजगी क्षेत्रे मोठ्या संख्येने या क्षेत्रामध्ये येवू शकत नाही का? आमच्याकडची राज्य सरकारे या प्रकारच्या कामासाठी भूमी देण्यासाठी योग्य धोरण तयार करू शकत नाही का? देशात चांगल्या सुविधा मिळाल्या तर जास्तीत जास्त डॉक्टर्स आमच्या इथेच तयार होतील. निमवैद्यकीय कर्मचारी तयार होवू शकतील. इतकेच नाही, आपण जगाचीही मागणी पूर्ण करू शकतो. आपल्या डॉक्टरांनी गेल्या चार-पाच दशकांपासून संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिष्ठा खूप वाढवली आहे. भारताचे डॉक्टर जिथे कुठे गेले आहेत, तिथे त्यांनी त्या देशात सर्वांची मने जिंकली आहेत. भारतीय डॉक्टरांच्या बुद्धिमत्तेला आणि कुशलतेला  विश्वातले सामान्यातल्या सामान्य नागरिकही खूप उत्तम मानतात. याचा अर्थ असा की, आमचे ब्रँडिंग आधीच झाले आहे. आता आपल्याला योग्य लोकांना तयार करण्यासाठी वेगाने काम केले पाहिजे. त्याच प्रमाणे जगात सर्वात मोठी आपली  आरोग्य विमा योजना आहे. मी तर या योजनेला आरोग्य विमा योजना म्हणत नाही  आणि ती आयुष्मान भारत, हुकमी उत्पन्न आहे. भारत सरकारने त्याचा विमा घेतला आहे. तुमचे  रूग्णालय  मोठे असेल आणि तिथे जर गरीब व्यक्ती आली  तर , त्याच्यावर करण्‍यात येणा-या उपचाराच्या पैशाची व्यवस्था भारत सरकारकडून होणार आहे. मग खाजगी क्षेत्रातले लोक, दुस-या किंवा तिस-या श्रेणीच्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढे येणार का? आयुष्मान भारत योजनेचे जे रूग्ण आहेत, त्यांच्यासाठी विशेष सेवा विकसित करावी, तुम्हाला उत्पन्नाची समस्या उरणार नाही. तुम्ही सेवा देण्यासाठी जी काही गुंतवणूक करणार आहात, त्याचा परतावा नक्कीच मिळेल, अशी ही योजना आहे. आणि या कामामध्ये खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी झाली तर आपल्या देशातल्या आरोग्य क्षेत्राला अतिशय बळकटी मिळू शकते. आणि आपण पाहिले असेल की, आपल्या आयुर्वेदाने तर खूप मोठी प्रतिष्ठा मिळवली आहे. विशेष करून कोरोना काळामध्ये जी हर्बल उत्पादने वापरली गेली, त्यांची  आज संपूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात वाढली आहे. याचा अर्थ या उत्पादनांविषयी आकर्षण वाढले आहे. आपण सर्वजण मिळून या योजनांना कशा पद्धतीने पुढे घेवून जायचेयाविषयी मला वाटते अगदी खुल्या मनाने नेतृत्व करण्यासाठी भारताला तयार करण्याचे काम आपण करावे. केवळ अंदाजपत्रकातल्या आकड्यांनी गोष्ट बनणार नाही, काम होणार नाही. आणि आपण अर्थसंकल्प एक महिना आधीच मांडतो. का बरं लवकर मांडतो? कारण आपल्याला  फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या सर्व तरतुदींसाठी योजना तयार करण्यासाठी सुविधा व्हावी, वेळ मिळावाआणि 1 एप्रिलपासूनच आपले नवीन अंदाजपत्रक प्रत्यक्षात कार्यरत करणे शक्य व्हावे, यामुळे आपल्याला कमी वेळेमध्ये अधिकाधिक फळ  मिळण्यासाठी पुढे जाता यावे. मी आपल्या सर्वांना आग्रहाने सांगू इच्छितो की, आजच्या या चर्चेतून चांगले निष्पन्न व्हावे. आणि मी सरकारच्या वतीने जास्त भाषणबाजी करण्याच्या बाजूने नाही. मला तर तुमच्याकडून सूचना   ऐकायच्या  आहेत. अगदी ठोस पावले उचलण्यासाठी ते असावे. कारण अंमलबजावणी करण्यामध्ये एखादी गोष्ट सुटली तर सहा-सहा महिने फायली फिरत राहतात. या चर्चेमुळे अशा चुका कमीत कमी होतील. अतिशय सुकरतेने गोष्टींची अंमलबजावणी करता येईल.  अनेक गोष्टींविषयी  आमचे अधिकारी, प्रणालीलाही आपल्याकडून उत्तम मार्गदर्शन मिळावे  त्यामुळे आपण गोष्टी लागू करू शकू. तर माझी अशी इच्छा आहे की, ज्यावेळी दुनियेला या संकटाने आरोग्य परिणाम  किती महत्वाचे आहेत हे जाणवून दिले आहेतर मग आता आपल्यालाही याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

आपल्या सर्वांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा !

धन्यवाद!!

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801485) Visitor Counter : 313