आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन


वेबिनार मधील आयुष्मान भारत डिजिटल मिशन, ई-संजीवनी आणि टेलि मेंटल हेल्थ या विषयांवरील चर्चासत्रात, नामवंत वक्ते आणि तज्ज्ञांसह खाजगी क्षेत्रातील महत्वाचे हितसंबंधीय होणार सहभागी

Posted On: 25 FEB 2022 8:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या अर्थसंकल्प पश्चात वेबिनारचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 10 वाजता होणार आहे. या वेबिनार मध्ये, पावणे अकरा ते सुमारे एक वाजेपर्यंत, तीन प्रमुख विषय- आयुष्मान भारत डिजिटल मिशन, ई-संजीवनी आणि टेलि मेंटल हेल्थ या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.

या वेबिनारचे उदिष्ट, केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रात सुरु केलेल्या उपक्रमांमध्ये खाजगी हितसंबंधी कंपन्यांचा सहभाग वाढवणे हे आहे. पंतप्रधान या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करणार असून, ते या वेबिनारची दिशा स्पष्ट करतील. त्यानंतर होणाऱ्या चर्चासत्रात, आरोग्य विभागातील तज्ञ आणि प्रमुख वक्ते, तसेच नीती आयोग, आरोग्य क्षेत्रातील उद्योजक, स्टार्ट अप कंपन्या, अभ्यासक देखील या वेबिनार मध्ये सहभागी होतील. वेबिनारच्या सांगता सोहळ्याचे अध्यक्षपद, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मंडवीय आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल संयुक्तपणे भूषवतील.

 

या वेबिनार मध्ये खालील विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत:

  1. आयुष्मान भारत डिजिटल मिशन: नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) या चर्चासत्राचे सूत्रसंचालन करतील. या वेळी, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण गेडाम, यशोदा रुग्णालयाच्या उपासना अरोरा, नारायणा आरोग्य संस्थेच्या डॉ देवी शेट्टी, मेट्रोपोलिस लॅबच्या व्यवस्थापकीय संचालिका अमीरा शाह, NATHEALTH चे अध्यक्ष डॉ हर्ष महाजन आणि आयुर्वेदचे कार्यकारी प्रमुख श्री राजीव वसुदेवन सहभागी होतील.
  2. राष्ट्रीय टेलि मेडिसीन उपक्रम आणि ई-संजीवनी :- पीएचएफआयचे अध्यक्ष प्रा. के श्रीनाथ रेड्डी या सत्राचे सूत्रसंचालन करतील. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, ई-संजीवनी वर सादरीकरण देतील. डॉ. अरुंधती चंद्रशेखर, व्यवस्थापकीय संचालक, एनएचएम कर्नाटकसंगिता रेड्डी, सह व्यवस्थापकीय संचालक, अपोलो हॉस्पिटल, गिरीश कृष्णमूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स, डॉ. अश्विनी गोयल, अध्यक्ष, टेलिहेल्थ स्टँडर्ड्स समिती, बीआयएस या सहभागी आहेत.
  3. टेलि मानसिक आजार कार्यक्रम:  राष्ट्रीय मानसिक आजार आणि मज्जासंस्थाविषयक आजार अध्ययन संस्था, NIMHANS च्या संचलिका, डॉ प्रतीमा मूर्ती या सत्राचे सूत्रसंचालन करतील तसेच त्या स्वागतपर भाषणही देतील. आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारीतील NHM चे मुख्य व्यवस्थापक विकास शील, या विषयावर एक संक्षिप्त सादरीकरण करतील. या सत्रात सहभागी होणारे मान्यवर डॉ. मोहन इसाक, मानसोपचारशास्त्राचे क्लिनिकल प्रोफेसर, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, डॉ. अनंत भान, जागतिक आरोग्य संशोधक, संगथ यूएसए/गोवा, डॉ. प्रीती कुमार, उपाध्यक्ष, PHFI, डॉ. टीके श्रीकांत, प्रोफेसर, आयआयआयटी बंगलोर आणि डॉ. किशोर कुमार, निम्हान्स हे आहेत.

या चर्चासत्रानंतर, हितसंबंधी व्यक्तीसोबत सविस्तर चर्चा करता यावी, या दृष्टीने त्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरुन सर्वांचा सक्रिय सहभाग असेल आणि यातील घोषणांची कालबद्ध अंमलबजावणी करणे शक्य होईल. पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण डी डी न्यूज वाहिनीवरुन केले जाईल.

***

S.Tupe/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801205) Visitor Counter : 223