युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
भारताचे बॅडमिंटन दुहेरीचे प्रशिक्षक म्हणून टॅन किम हर यांच्या नियुक्तीला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता
Posted On:
25 FEB 2022 6:57PM by PIB Mumbai
2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांपर्यंत भारताचे बॅडमिंटन दुहेरीचे प्रशिक्षक म्हणून निष्णात मलेशियन बॅडमिंटन प्रशिक्षक टॅन किम हर यांच्या नियुक्तीला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे. या 50 वर्षीय प्रशिक्षकांची पुन्हा नियुक्ती झाल्यामुळे भारताचा बॅडमिंटन दुहेरीचा स्तर उंचावण्यास मदत होईल.
पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डीसह जागतिक क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर असलेल्या २४ वर्षीय चिराग शेट्टीने या घोषणेचे स्वागत केले आहे. “टॅन प्रशिक्षक म्हणून पुन्हा आम्हाला मार्गदर्शन करणार असल्याचा सात्विकला आणि मला आनंद झाला आहे. आम्हा दोघांचाही खेळ एकसारखाच असल्याने आणि आमच्यापैकी एकालाही फ्रंट कोर्टमध्ये खेळण्याचा आत्मविश्वास नसल्याने आम्ही दोघेही सुरुवातीला एकमेकांसोबत खेळण्याबाबत साशंक असूनही त्यांनी आम्हा दोघांची जोडी तयार केल्यामुळे आम्ही नेहमीच त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो,” असे तो म्हणाला.
त्यांच्या ठाम विश्वासामुळे आम्हाला सध्याची पातळी गाठणे शक्य झाले. आम्हाला अगदी तळाच्या स्थानापासून जगातील आघाडीच्या 16 जोड्यांमध्ये आणण्याची किमया त्यांनी ते भारतातून मायदेशी परत जाईपर्यंत करून दाखवली. त्यांना पुन्हा सेवेत आणल्याबद्दल बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे आम्ही आभारी आहोत, असे चिराग म्हणाला.
“प्रशिक्षक टॅन किम यांना भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची अतिशय चांगली माहिती आहे आणि त्यांच्या समावेशामुळे भारतातील बॅडमिंटन दुहेरीचे पथक आणखी मजबूत होणार आहे. त्यांच्या नियुक्तीसाठी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया(BAI) आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण(SAI) एकत्र आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे, कारण यामुळे चिराग शेट्टी आणि सात्विक रांकीरेड्डी ही आमची दुहेरीची आघाडीची जोडी आणि इतर जोड्या आणखी मजबूत होण्याबरोबरच भावी पिढीतील जोड्या देखील तयार होण्यास मदत मिळणार आहे, असे बीएआय चे सरचिटणीस अजय सिंघानिया म्हणाले.
2015 ते 2019 या काळात पहिल्यांदा दुहेरीचे प्रशिक्षक म्हणून काम करताना टॅन यांनी सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना प्रशिक्षण दिले होते आणि पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत त्यांना आघाडीच्या 10 जोड्यांमध्ये आणले होते. तर अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांना महिला दुहेरीच्या पहिल्या 20 जोड्यांमध्ये स्थान मिळवून दिले होते. याशिवाय विविध प्रकारातील अव्वल 50 जोड्यांमध्ये भारताच्या सहा जोड्यांना स्थान मिळवून दिले होते.
टॅन यांनी जपानच्या संघाला दिलेल्या प्रशिक्षणाच्या जोरावर जपानने 2021 मध्ये पुरुष दुहेरीचे जागतिक अजिंक्यपद पटकावले आणि मिश्र दुहेरीचे रौप्य पदक पटकावले तर टोक्यो ऑलिंपिकमध्ये कांस्य पदक पटकावले. टॅन यांना परदेशी प्रशिक्षणाबरोबरच एकंदर प्रशिक्षण प्रणालीच्या आखणीची आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्याबरोबरच गुणवत्ताप्राप्त भारतीय प्रशिक्षकांची निवड करण्याचे देखील ते काम पाहतील आणि दरवर्षी चार कार्यशाळांच्या आयोजनाच्या माध्यमातून कौशल्य विकासाला मदत करतील. यामुळे भारतीय संघांना भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मदत करणारे जास्तीत जास्त दुहेरी प्रशिक्षक तयार होऊ शकतील.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1801162)
Visitor Counter : 195