युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
ऑलिम्पिक 2024 आणि 2028 च्या तयारीसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने 398 प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक केले नियुक्त, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा समावेश
Posted On:
16 FEB 2022 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) भारताचा प्रशिक्षण कणा बळकट करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाने 21 प्रकारांमध्ये विविध स्तरांवर 398 प्रशिक्षकांना सेवायोजनाचा प्रस्ताव पाठवला. एकूण 398 पैकी अनेक जण माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते असून त्यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आणि ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे किंवा पदके जिंकली आहेत. एकूण 398 पैकी 101 प्रशिक्षक सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आणि इतर सरकारी संस्थांमधून प्रतिनियुक्तीवर रुजू होत आहेत.
ऑलिम्पिक 2024 आणि 2028 यासह महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडापटूंना संपूर्ण साहाय्य पुरवण्याच्या युवा व्यवहार मंत्रालयाच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या आणि पदके जिंकलेल्या अनेक माजी खेळाडूंनी या पदांसाठी अर्ज केले असून त्यांची निवड करण्यात आली असल्याचा मला आनंद आहे,” असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितले. “व्यवस्थेत त्यांच्या समावेशामुळे क्रीडापटूंना खेळाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच, ते त्यांना मानसिक कणखरतेसाठी प्रशिक्षण देऊ शकतील, जी जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत यशाची गुरुकिल्ली आहे."
प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांच्या नवीन तुकडीत अनेक नामवंत नावे आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेते, अर्जुन पुरस्कार प्राप्त, पद्मश्री बजरंग लाल ठाकर नौकानयन प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले आहेत. 2011 च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या शिल्पी शेरॉन कुस्तीसाठी सहायक प्रशिक्षक म्हणून सहभागी झाल्या आहेत. ऑलिम्पिकपटू जिन्सी फिलिप, अॅथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून तर आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवलेल्या प्रणामिका बोराह मुष्टियुद्ध प्रशिक्षक म्हणून सहभागी झाल्या आहेत. अर्जुन पुरस्कारप्राप्त बजरंगलाल ठाकर यांनी नव्या जबाबदारीबाबत मनोगत व्यक्त केले, "खेळासाठी योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा मी आभारी आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जल क्रीडा प्रकारांमध्ये भारताला प्रभाव पाडण्याची मोठी संधी आहे. मी आशियाई स्पर्धांसाठी संघाला प्रशिक्षण देत आहे आणि मला विश्वास आहे की जास्तीत जास्त प्रकारांमध्ये खेळाडूंना संधी मिळून आम्ही आगामी आशियाई स्पर्धेत देशाच्या पदकतालिकेत भर घालू शकू." जलक्रीडा प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या जगतपुरा आणि अलेप्पी येथील नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे भारतातील जल क्रीडा क्षेत्राला अधिक चालना मिळाली असल्याचेही ठाकर यांनी सांगितले.
या पदांसाठी निवड झालेल्यांमध्ये 4 अर्जुन पुरस्कार, 1 ध्यानचंद पुरस्कार आणि 1 द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त आहेत. माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंव्यतिरिक्त, ज्यांनी NSNIS पटियाला किंवा मान्यताप्राप्त भारतीय किंवा परदेशी विद्यापीठातून क्रीडा प्रशिक्षणामध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे त्यांनादेखील समाविष्ट करण्यात आले आहे. प्राधिकरणाचे अनेक प्रशिक्षक जे पूर्वी करारावर होते परंतु ज्यांचे करार संपले होते, त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार पुन्हा सेवेत नियुक्त करण्यात आले आहे.
* * *
S.Thakur/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798844)
Visitor Counter : 456