आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वत्रिक लसीकरणावर लक्ष केंद्रित: डॉ. मनसुख मांडविय यांनी मिशन इंद्रधनुष (आयएमआय) 4.0 चा केला प्रारंभ


"भारत जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे"

"कठिण परिस्थितीत आणि दुर्गम भागात लसीकरण करून आरोग्य सेवा कर्मचारी देशाला उत्तम सेवा देत आहेत"

सार्वत्रिक लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सबका प्रयास आणि जन लोक भागिदारीची गरज- डॉ. मनसुख मांडवीय

Posted On: 07 FEB 2022 3:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022

भारत जागतिक स्तरावर सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. या अंतर्गत दरवर्षी 3 कोटी पेक्षा जास्त गर्भवती महिला आणि 2.6 कोटी बालकांचे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत (युआयपी) लसीकरण केले जात आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज आभासी माध्यमातून मिशन इंद्रधनुष (आयएमआय) 4.0 चा प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

आसामचे आरोग्य मंत्री केशब महंता आणि गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला. मिशन इंद्रधनुष 4.0 च्या तीन फेऱ्या असतील आणि त्या देशातील 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 416 जिल्ह्यांमध्ये (स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासाठी निवडलेल्या 75 जिल्ह्यांसह) राबवल्या जातील.

पहिल्या फेरीत (फेब्रु-एप्रिल 2022), 11 राज्ये आयएमआय 4.0 चे आयोजन करतील. यात आसाम, उत्तराखंड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा आणि छत्तीसगड यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह इतर 22 राज्ये एप्रिल ते मे 2022 या कालावधीत याचे आयोजन करतील.

अतिदुर्गम गावे आणि घरे लसींनी सुरक्षित होतील याची खातरजमा करणासाठी, खडतर भौगौलिक आणि हवामानाच्या परिस्थितीत आघाडीवर राहून धैर्याने  लसीकरण करणाऱ्यांच्या वचनबद्धतेला आणि समर्पणाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याप्रसंगी सलाम केला.

 

ताज्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात लसीकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसून आले, आपल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब यात दिसून येते याबद्दल डॉ. मांडवीय यांनी समाधान व्यक्त केले. लस ही अर्भके, मुले आणि गर्भवती महिलांना रोग आणि मृत्यूपासून वाचवण्यासाठी सर्वात प्रभावी, परवडणाऱ्या आणि सुरक्षित पद्धतींपैकी एक आहे.

संपूर्ण लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याच्या उद्देशाने, लसीकरण कमी झाले आहे तसेच उच्च जोखीम आणि पोहोचण्यास कठीण अशा भागात आंशिक किंवा लसीकरण न झालेल्या गरोदर स्त्रिया आणि मुलांचे लसीकरण करण्यासाठी तसेच लसीपासून बचाव करण्यायोग्य रोगांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधानांनी डिसेंबर 2014 मध्ये मिशन इंद्रधनुष सुरू केले, असे ते म्हणाले.

मिशन इंद्रधनुष अंतर्गत, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाद्वारे (यूआयपी) सर्व लसी राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकानुसार उपलब्ध केल्या जातात. ग्राम स्वराज अभियान (541 जिल्ह्यांमधील 16,850 गावे) आणि विस्तारित ग्राम स्वराज अभियान (112 आकांक्षित जिल्ह्यांमधील 48,929 गावे) या अंतर्गत प्रमुख योजनांपैकी एक म्हणून मिशन इंद्रधनुष देखील ओळखले जाते.

कोविड महामारीमुळे नियमित लसीकरणाची गती मंदावली असताना, आयएमआय 4.0 ने ही पोकळी भरून काढण्यासाठी आणि सार्वत्रिक लसीकरणाच्या दिशेने चिरस्थायी फायदा मिळवून देण्यात मोठा हातभार लावला असे डॉ. मांडवीय यांनी नमूद केले.

नियमित लसीकरण (आरआय) सेवा लसीकरण न केलेल्या आणि अंशतः लसीकरण झालेल्या बालके आणि गर्भवती महिलांपर्यंत पोहोचतील याची ते खातरजमा करतील, असेही ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आभासी माध्यमातून आयएमआय 4.0 पोर्टलचे लोकार्पण केले आणि आयएमआय 4.0 साठी कृतीआधारित मार्गदर्शक तत्त्वे, शहरी भागात लसीकरणाला वेग देणे-कृतीसाठी एक आराखडा आणि शहरी भागात लसीकरणासाठी महिला आरोग्य समिती वरील पुस्तिका तसेच मोहिमेचा भाग म्हणून जागरूकता सामग्रीचे लोकार्पण केले.

देशभरातील 701 जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत मिशन इंद्रधनुषचे दहा टप्पे पूर्ण झाले आहेत. एप्रिल 2021 पर्यंत, मिशन इंद्रधनुषच्या विविध टप्प्यांत एकूण 3.86 कोटी बालके आणि 96.8 लाख गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर आयएमआय 4.0 च्या तीन फेऱ्यांची योजना आखण्यात आली आहे. हा उपक्रम 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 416 जिल्ह्यांमध्ये आयोजित केला जाईल. तथापि, कोविड रुग्णसंख्येतील अलीकडील उच्चांक लक्षात घेता, राज्यांना मार्च ते मे 2022 पर्यंत मोहीम राबविण्याची लवचिकता प्रदान करण्यात आली आहे. 33 पैकी 11 राज्यांनी फेब्रुवारी - एप्रिल 2022 च्या वेळापत्रकानुसार मोहीम राबवण्याची योजना आखली आहे.

 

 

 

 

 

S.Tupe/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796136) Visitor Counter : 684