अर्थ मंत्रालय
सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये सीमा शुल्क विषयक प्रशासन संपूर्णपणे माहिती तंत्रज्ञानाद्वारे संचालित असेल
भांडवली वस्तू आणि प्रकल्पासाठी आवश्यक आयात मालासाठी असलेले सवलतींचे दर टप्याटप्याने काढून टाकणार आणि त्यांच्यावर 7.5% मध्यम स्वरूपाचा दर आकारणार
मिश्रित नसलेल्या इंधनावर 2 रुपये प्रती लिटर दराने अतिरिक्त फरक शुल्क लागू होणार
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2022
सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये सीमा शुल्क विषयक प्रशासन संपूर्णपणे माहिती तंत्रज्ञानाद्वारे संचालित असेल अशी घोषणा केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. संसदेत 2022-23 या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्या आज बोलत होत्या. राष्ट्रीय सीमाशुल्क पोर्टलचे कामकाज ग्राहकांना अधिक सुविधा पुरविण्यावर आणि केवळ धोक्याची शक्यता असणाऱ्या बाबींची तपासणी करण्यावर केंद्रित असेल असे देखील त्या म्हणाल्या.

भांडवली वस्तू आणि प्रकल्पांसाठी आवश्यक आयात
भांडवली वस्तू आणि प्रकल्पासाठी आवश्यक आयात मालासाठी असलेले सवलतींचे दर हळूहळू काढून टाकण्याचा आणि त्यांच्यावर 7.5% मध्यम स्वरूपाचा दर आकारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे असे देखील त्यांनी जाहीर केले. मात्र देशात उत्पादन होऊ न शकणाऱ्या काही आधुनिक यंत्रांच्या आयातीवरील सूट यापुढेही देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
सीमा शुल्कातील सूट आणि दरांचे सुलभीकरण याचा आढावा
गेल्या दोन अर्थसंकल्पांमध्ये सरकारने अनेक सीमाशुल्कविषयक सूट यांचे सुसूत्रीकरण केले आहे याची आठवण करून देत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर सखोल चर्चा केल्यानंतर सरकारने सीमा शुल्कातील 350 प्रकारच्या सवलती टप्याटप्याने रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या सवलती देण्यात आलेल्या घटकांमध्ये काही कृषी उत्पादने, रसायने, कापड, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे.

इलेक्ट्रॉनिक्स
अधिक मागणी असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, परिधान करण्याची आणि ऐकण्यासाठीची साधने तसेच इलेक्ट्रॉनिक स्मार्ट मीटर्स इत्यादींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून केंद्रीय मंत्री सीतारामन यांनी श्रेणीबद्ध कर रचना लागू करण्यासाठी सीमा शुल्काचे दर नव्याने निश्चित करण्याची घोषणा केली. मोबाईल फोन चार्जरच्या ट्रान्सफॉर्मरचे सुटे भाग आणि मोबाईल कॅमेराची भिंगे तसेच इतर काही वस्तूंना देखील सीमा शुल्कात सूट देण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले.
रत्ने आणि दागिने
केंद्रीय मंत्री म्हणाल्या की, देशातील रत्ने आणि दागिने निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कापलेले आणि पॉलिश केलेले हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने यांच्यावरील सीमा शुल्कात कपात करून ते 5% करण्यात आले असून दातेरी हिऱ्यांचे सीमाशुल्क शून्यावर आणण्यात आले आहे.
रसायने
देशांतर्गत मूल्यवर्धनासाठी सरकारने मिथेनॉल, अॅसिटिक आम्ल तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेल्या रसायनांसह काही महत्त्वाच्या रासायनिक पदार्थांवरील सीमा शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे मात्र सोडियम सायनाईडच्या उत्पादनाची देशांतर्गत क्षमता पुरेशी असल्याने त्यावरील शुल्क वाढविण्यात आले आहे अशी घोषणा त्यांनी केली.
निर्यात
त्या म्हणाल्या की निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, सौंदर्यवर्धक अलंकार, ट्रीमिंग, फास्टनर्स, बटणे, झिप्स, लायनिंग साहित्य, विशिष्ट चामडे, फर्निचरच्या जोडण्या आणि हस्तकलेच्या वस्तू, वस्त्रे आणि चामड्याची प्रावरणे, चामडी पादत्राणे आणि इतर वस्तू यांच्या अधिकृत निर्यातदारांना लागणारे पॅकेजिंगचे खोके यांसारख्या वस्तूंवरील शुल्कात सूट देण्यात आली आहे. कोळंबीची शेती करणाऱ्यांना त्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आवश्यक काही वस्तूंवरील शुल्क देखील कमी करण्यात येत आहे.
इंधनाचे मिश्रण
केंद्रीय मंत्री सीतारामन म्हणाल्या की इंधनाच्या मिश्रणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. इंधन मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मिश्रित नसलेल्या इंधनावर 1 ऑक्टोबर 2022 पासून 2 रुपये प्रती लिटर या दराने अतिरिक्त फरक उत्पादन शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे.
वस्तू आणि सेवा करविषयक प्रगती
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर ही सहकारात्मक संघवाद दर्शविणारी स्वतंत्र भारतातील महत्त्वाची सुधारणा आहे अशी नोंद करत सीतारामन यांनी सांगितले की जीएसटी मंडळाचे मार्गदर्शन आणि दूरदृष्टीखाली प्रशासनाने या संदर्भातील आव्हानांवर चतुराईने आणि परिश्रमपूर्वक मात केली आहे. त्या म्हणाल्या की, सुविधा आणि सक्ती यांच्यात उत्तम समतोल साधल्यामुळे या कायद्याची अधिक उत्तम अंमलबजावणी झाली आणि हा कर भरण्यासाठी योगदान देणाऱ्या करदात्यांचे देखील कौतुक करायला हवे.
कोविड-19 महामारीच्या काळात आघाडीवर राहून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सीतारामन यांनी सीमाशुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्या म्हणाल्या की, सीमाशुल्क विभाग प्रशासनाने खुल्या प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाच्या अंतर्भावातून चेहेराविरहित म्हणजे थेट संपर्काशिवाय कार्यरत रचनेत स्वतःला स्थापित केले आहे.
U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1794286)
आगंतुक पटल : 426