संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'बीटिंग द रिट्रीट' सोहळा 2022


1,000 ‘मेक इन इंडिया’ड्रोन्स प्रथमच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील

सोहळा अधिक रोमहर्षक करण्यासाठी नवीन सुरावटींचा समावेश

Posted On: 28 JAN 2022 2:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

नवी दिल्लीतील  ऐतिहासिक विजय चौक इथे 29 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रपती आणि सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर  राम नाथ कोविंद यांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यात या वर्षी एक अभिनव ड्रोन शो हा प्रमुख आकर्षणांपैकी एक असेल. 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने हा शो प्रथमच या समारंभाचा भाग बनवण्यात आला आहे.

जोशपूर्ण   मार्शल म्युझिकल ट्यून या वर्षीच्या  सोहळ्याचे वैशिष्ट्य असेल. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) बँडद्वारे वाजवण्यात येणाऱ्या सुरावटींवर सादर केले जाणारे एकूण 26 सांगीतिक आविष्कार   प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. सर्वप्रथम येणारा  मास बँड 'वीर सैनिक’ धून लाजवेल . त्यानंतर पाईप्स अँड ड्रम्स बँड, सीएपीएफ बँड, हवाई दल बँड, नौदल  बँड, आर्मी मिलिटरी बँड आणि मास बँड सादरीकरण करतील.  समारंभाचे प्रमुख सूत्रधार कमांडर विजय चार्ल्स डी’क्रूझ असतील.

‘स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव’साजरा करण्यासाठी या  सोहळ्यात अनेक नवीन सुरावटींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ‘केरळ’, ‘हिंद की सेना’ आणि ‘ए मेरे वतन के लोगों’चा समावेश आहे. ‘सारे जहाँ से अच्छा’ या सदैव लोकप्रिय सुरांनी   कार्यक्रमाची सांगता होईल.

या ड्रोन शोचे आयोजन 'बोटलॅब डायनॅमिक्स' या स्टार्टअपने केले आहे आणि त्याला भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटी  दिल्ली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांनी सहाय्य  केले आहे.   हा शो 10 मिनिटांचा असेल ज्यामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या सुमारे 1,000 ड्रोनचा समावेश असेल. ड्रोन शो दरम्यान सिंक्रोनाइझ पार्श्वसंगीत देखील वाजवले जाईल.

‘बीटिंग द रिट्रीट’ही शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा आहे, जेव्हा सूर्यास्ताच्या वेळी सैन्याला युद्धातून माघारी बोलावले जायचे. बिगुल वाजताच  सैन्याकडून लढाई थांबवली जायची , शस्त्रे  म्यान करून  रणांगणातून माघारी फिरायचे. त्यामुळेच रिट्रीटच्या  वेळी स्थिर उभे राहण्याची प्रथा आजही कायम आहे. कलर्स आणि स्टँडर्ड्स  सुरक्षित कंटेनरमध्ये ठेवली जातात आणि ध्वज उतरवला जातो.

 

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1793242) Visitor Counter : 298