भारतीय निवडणूक आयोग

12 वा राष्ट्रीय मतदार दिन देशभरात साजरा


मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडून कौतुक

निवडणुका अधिक सर्वसमावेशक, सुलभ करून सर्वांचा सहभाग वाढवण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्धाराचा मुख्य निवडणूक आयुक्तांकडून पुनरुच्चार

भारतीय निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा - ‘माझे मत माझे भविष्य- एका मताची शक्ती’


Posted On: 25 JAN 2022 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

आज 25 जानेवारी 2021 रोजी देशभरात 12 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांचा प्रमुख पाहुणे म्हणून या प्रसंगी दिलेला संदेश आभासी माध्यमातून सादर करण्यात आला. आपल्या संदेशात, त्यांनी मतदानाची टक्केवारी सुधारण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता वाढविण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल निवडणूक आयोगाचे कौतुक केले. गेल्या निवडणुकीत केलेल्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल आजच्या पुरस्कार विजेत्यांची त्यांनी प्रशंसा केली. माजी मुख्य निवडणूक आयुक्त श्री नवीन चावला आणि श्री सुनील अरोरा, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे वरिष्ठ प्रतिनिधी; भारतीय निवडणूक आयोगाच्या सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्त, सुशील चंद्रा यांनी निवडणूक अधिक सर्वसमावेशक, सुलभ करून सर्वांचा सहभाग वाढवण्याच्या आयोगाच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, यंदाच्या राष्ट्रीय मतदार दिवसाची संकल्पना विशेषत: त्यानुसार निवडण्यात आली आहे. चंद्रा म्हणाले, भारतीय निवडणूक आयोगाने दोन दिशांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत, एक मतदारांची नोंदणी वाढवणे आणि सुलभ करणे आणि दुसरे मतदान केंद्रे अधिक अनुकूल, आरामदायी आणि प्रवेशयोग्य बनवणे. भारतीय निवडणूक आयोगाने सातत्यपूर्ण प्रयत्न करून जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सहभागाला सक्षम बनवण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी हा अतिरिक्त टप्पा पार केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ज्यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जाणे अडचणीचे होते त्यांना पोस्टल बॅलेटचा पर्याय देऊन आयोगाने मतदान केंद्र त्यांच्या दारात आणले आहे, असे ते म्हणाले. ज्यांनी महामारीच्या आव्हानात्मक काळात आपली कर्तव्ये पार पाडली आणि निवडणुकांना कोणत्याही प्रकारे समस्या येऊ दिली नाही अशा सर्व क्षेत्रीय कार्यकर्ता, बूथ स्तर अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या सदस्यांचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी कौतुक केले.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाच्या अधिकाराची कदर केली पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे की जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मतदार असणे हा एक विशेषाधिकार आहे असे रिजिजू यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, यशस्वी लोकशाहीचा पाया निष्पक्ष  निवडणूक प्रक्रियेवर उभारला जातो. त्यांनी अलिकडच्या नवीन निवडणूक सुधारणा अधोरेखित केल्या ज्यामुळे युवा  पात्र नागरिकांसाठी आता वर्षातून चार वेळा नोंदणी करता येणार आहे.  घटनात्मक अधिकारांच्या  स्वातंत्र्याची गरज लक्षात घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या स्वातंत्र्याशी तडजोड न करता समन्वित कामकाजाच्या गरजेवर भर दिला.  निवडणूक कर्तव्ये बजावताना  आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या मतदान कर्मचार्‍यांना सन्मानित करण्यासाठी  मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरु करावी असे  रिजिजू यांनी यावेळी सुचवले .

आपल्या  भाषणात निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी नमूद केले की, लोकशाहीची परंपरा आणि लोकशाही पद्धती  भारतात खोलवर रुजलेल्या आहेत. ते म्हणाले की, भारतीय संविधान स्वीकारण्याच्या आधी एक दिवस  एक घटनात्मक संस्था म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय , लोकशाहीच्या भावनेप्रति  आणि आपल्या नागरिकांचे संकल्प  साजरे करण्याच्या आपल्या संस्थापक सदस्यांच्या वचनबद्धतेचे स्मरण करून देतो.   निवडणूक आयोग  सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना समान संधी प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे जेणेकरुन मतदार निर्भयपणे किंवा निष्पक्षपणे  सहभागी होऊ शकतील याचा कुमार यांनी पुनरुच्चार केला .   भारतीय निवडणूक आयोगाने अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर अनेक सुधारणा योजना आखल्या असून, विशेषत: निवडणूक प्रक्रियेमध्ये  आणि मतदारांच्या कल्याणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जात असल्यामुळे भविष्यात निवडणुका अधिक  गतिमान होतील  असे ते म्हणाले .

12 व्या राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या मान्यवर आणि पुरस्कार विजेत्यांचे  निवडणूक आयुक्त  अनुप चंद्र पांडे यांनी स्वागत केले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये मुक्त, निष्पक्ष, सहभागात्मक , सर्वसमावेशक आणि सुगम्य  निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी भारतीय  निवडणूक आयोग अथक प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले की दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय मतदार दिन आम्हाला एकही मतदार वंचित राहणार नाही या तत्त्वावर आधारित आयोगाच्या घटनात्मक दायित्वाची आठवण करून देतो.  राष्ट्रीय मतदार दिन  2022 च्या निमित्ताने  भारतातील निवडणुकांनी 70  यशस्वी वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या निमित्ताने आयोगाने विविध क्षेत्रात निवडणुकांचे आयोजन करण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकार्‍यांना सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धतीसाठीचे  राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. याशिवाय मतदार जागृती आणि संपर्क  क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल सरकारी  विभाग आणि माध्यमांनाही  पुरस्कार प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय मतदार दिनाच्या माहितीपत्रकाची लिंक डाउनलोड  करा :

https://eci.gov.in/files/file/13975-12th-national-voters-day-best-electoral-practices-awards-2021-2022/

भारतीय निवडणूक आयोगाने ‘लीप ऑफ फेथ: जर्नी ऑफ इंडियन इलेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. एकोणिसाव्या ते एकविसाव्या शतकापर्यंत भारताचा निवडणूक इतिहास आणि भारतातील प्रातिनिधिक आणि निवडणूक तत्त्वांचा विकास  या पुस्तकात कथन करण्यात आला आहे. नागरिकांनी दिलेला  निकाल खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या  सातत्यपूर्ण प्रयत्नांवर या पुस्तकात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

‘प्लेजिंग  टू व्होट – ए डीकेडल  जर्नी ऑफ द नॅशनल व्होटर्स डे इन इंडिया’ या दुसऱ्या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.  भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने साजरा केलेल्या राष्ट्रीय मतदार दिवस सोहळ्याचा हिरक महोत्सवापासूनचा पुढचा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये मतदार दिवसाच्या समारंभामध्ये  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांची भाषणे, मुख्य निवडणूक आयुक्तांची भाषणे, संदेश, संक्षिप्त प्रस्तावना , प्रसिद्धिपत्रके आणि गेल्या अनेक  वर्षांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. ई-पुस्तकाचा दुवा :

https://eci.gov.in/files/file/13976-pledging-to-vote-a-decadal-journey-of-the-national-voters%E2%80%99-day-in-india/

2022 च्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे प्रत्येक मताचे महत्त्व पुन्हा विशद करण्याच्या अनुषंगाने , ‘माझे मत माझे भविष्य- एका मताचे  सामर्थ्य ’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा देखील सुरू करण्यात आली. गाणे, घोषवाक्य, प्रश्नमंजुषा, चित्रफीत तयार करणे  आणि पोस्टर डिझाइन यासारख्या अनेक श्रेणींसह, ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असेल आणि इच्छुक सहभागींना 15 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या प्रवेशिका पाठवता येतील.विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रे प्रदान केली जातील. अधिक माहितीसाठीhttps://ecisveep.nic.in/contest/  या संकेतस्थळाला भेट द्या

या कार्यक्रमादरम्यान आयोगाच्या विविध उपक्रमांवरील मल्टीमीडिया प्रदर्शनही भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात अलीकडील निवडणूक सुधारणा, ईव्हीएम -व्हीव्हीपॅट ची माहिती, आंतरराष्ट्रीय अनुभव, ज्ञानाची देवाणघेवाण आणि निवडणुका अधिक समावेशक, सुलभ , सहभागात्मक  आणि कोविड पासून सुरक्षित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे घेतलेले उपक्रम या प्रदर्शनात मांडण्यात आले होते.

या कार्यक्रमादरम्यान, दिल्लीतील नव्याने नोंदणी केलेल्या पाच नवीन मतदारांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांना त्यांचे मतदार छायाचित्र ओळखपत्र (ईपीआयसी ) देण्यात आले.

वर्ष 1950 मध्ये आजच्याच दिवशी स्थापन झालेल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.

लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणे , नवीन मतदारांच्या नावनोंदणीला प्रोत्साहन देणे, सुलभ करणे आणि जास्तीत जास्त नोंदणी करण्यासह मतदारांचा सहभाग वाढवणे हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे.

 

 MC/VJ/SK/SC/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1792659) Visitor Counter : 396