महिला आणि बालविकास मंत्रालय
राष्ट्रीय महिला आयोगाने ‘मुलगी वाचवा’ या विषयावरील वेबिनारचे केले आयोजन
Posted On:
24 JAN 2022 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2022
लहान मुलींच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण, आरोग्य तसेच पोषण या मुद्द्यांसह त्यांच्याशी संबंधित विविध विषयांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आजच्या राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त राष्ट्रीय महिला आयोगाने ‘मुलगी वाचवा’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन केले. समाजाची मुलींशी असलेली वर्तणूक बदलून आणि मुलींना सोसाव्या लागणाऱ्या भेदभावाचे प्रमाण कमी करण्यासाठी जाणीव निर्माण करून मुलींबाबत नवा दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने या वेबिनारमध्ये चर्चा करण्यात आली.
आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, हरियाणा सरकार मधील माजी केंद्रीय मंत्री ओ.पी.धनकर आणि ‘मुले वाचवा’ अभियानाच्या प्रमुख प्रज्ञा वत्स या वेबिनारमध्ये तज्ञ म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्ष रेखा शर्मा यांनी यावेळी बोलताना, मुलींचे शिक्षण, आरोग्य, निवडीचे स्वातंत्र्य आणि निर्णय घेण्याचा अधिकार यांच्याशी संबंधित विविध समस्यांना स्पर्श केला. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मुली या मुलांच्या बरोबरीच्या पातळीवर आहेत आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक महिला-केन्द्री धोरणे आखत आहे. “मुलींनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांची गुणवत्ता सिध्द केली असून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रीय महिला आयोग प्रत्येक क्षेत्रात मुलींची सुरक्षितता आणि सशक्तीकरण सुनिश्चित करत आहे. मुलींचे नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी सरकार अनेक संधी उपलब्ध करून देत असले तरीही समाजाने मुलींबाबतची प्रतिगामी मानसिकता सोडायला हवी जेणेकरून बदल घडविण्यासाठी मुली पुढे येतील.
माजी केंद्रीय मंत्री धनकर म्हणाले की, समाजात बदल घडवून आणण्यासाठी सरकार सक्रियतेने उपक्रम राबवीत आहे. मुली वाचविण्यासाठी आणि त्यांना प्रगती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या पंतप्रधानांनी आणि सरकारने समर्पितपणे काम केले आहे आणि त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
याप्रसंगी अभियान प्रमुख वत्स म्हणाल्या की गरिबी, पितृसत्ताक पद्धती आणि चुकीचे समज महिलांना त्यांच्या क्षमता आणि उपलब्ध शक्यता अजमावून पाहण्यापासून वंचित ठेवतात. मुलींचे सशक्तीकरण आणि विकास साधण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य आणि सहयोगातून एकत्रितपणे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारा राष्ट्रीय महिला आयोग, विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून मुलींविषयी समाजात खोलवर रुजलेला भेदभाव निपटून काढण्यासाठी समर्पितपणे कार्य करत आहे आणि आजची चर्चा ही या विषयाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी टाकलेले पुढचे पाऊल होय.
महिला आणि बालविकास मंत्रालयाने, वर्ष 2008 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. भारतातील मुलींना आधार आणि संधी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने दर वर्षी 24 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. मुलींच्या अधिकारांबाबत जाणीव निर्माण करणे तसेच मुलींचे शिक्षण,आरोग्य आणि पोषण यांचे महत्त्व समजण्यासाठी जागृती करणे या उद्देशाने सरकारने हा उपक्रम सुरु केला आहे.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1792246)
अभ्यागत कक्ष : 221