पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुजरातमधील सोमनाथ येथे नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन केले


"ज्या परिस्थितीत सोमनाथ मंदिराचा विध्वंस झाला आणि ज्या परिस्थितीत सरदार पटेलांच्या प्रयत्नातून मंदिराचा जीर्णोद्धार झाला, ते दोन्ही एक मोठा संदेश देतात"

“आज पर्यटन केंद्रांचा विकास हा केवळ सरकारी योजनांचा भाग नसून लोकसहभागाची मोहीम आहे. देशातील वारसा स्थळे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा विकास ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत”

देश पर्यटनाकडे सर्वांगीण दृष्टीकोनातून पाहत आहे. स्वच्छता, सोय, वेळ आणि विचार या घटकांचा पर्यटन नियोजनात अंतर्भाव होत आहे

“आपली विचारसरणी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक असणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी आपल्याला आपल्या प्राचीन वारशाचा किती अभिमान आहे हे खूप महत्त्वाचे आहे."

Posted On: 21 JAN 2022 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सोमनाथ येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे नवीन सर्किट हाऊसचे उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यमंत्री, संसद सदस्य, मंदिर न्यासाचे सदस्य उपस्थित होते.

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी सोमनाथ सर्किट हाऊसच्या उद्घाटनाबद्दल गुजरात सरकार, सोमनाथ मंदिर न्यास आणि भाविकांचे अभिनंदन केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की एकेकाळी विध्वंस झालेल्या मंदिराच्या कळसावर भक्तांना भारताचा अभिमान वाटेल. भारतीय संस्कृतीचा आव्हानात्मक प्रवास आणि शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी टिप्पणी केली की सोमनाथ मंदिर ज्या परिस्थितीत नष्ट झाले आणि ज्या परिस्थितीत मंदिराचा जीर्णोद्धार सरदार पटेल यांच्या प्रयत्नांनी झाला, ते दोन्ही एक मोठा संदेश देतात. “आज, जेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, आम्ही आमच्या भूतकाळातून धडा घेऊ इच्छितो, तेव्हा सोमनाथसारखी संस्कृती आणि श्रद्धेची ठिकाणे केंद्रस्थानी आहेत”, पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

ते म्हणाले की, जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा मोठा वाटा आहे. "आपल्याकडे प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारच्या अनंत शक्यता आहेत", ते म्हणाले. पंतप्रधानांनी आध्यात्मिक स्थळांचे आभासी भारत दर्शन वर्णन केले आणि गुजरातमधील सोमनाथ, द्वारका, कच्छचे रण आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी; उत्तर प्रदेशातील अयोध्या, मथुरा, काशी, प्रयाग, कुशीनगर आणि विंध्याचल ही ठिकाणे; देवभूमी उत्तराखंडमधील बद्रीनाथ केदारनाथ; हिमाचलमधील ज्वाला देवी, नैना देवी; दिव्य आणि नैसर्गिक तेजाने परिपूर्ण असा संपूर्ण ईशान्य; तामिळनाडूतील रामेश्वरम; ओडिशातील पुरी; आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी; महाराष्ट्रामधील सिद्धी विनायक; केरळमधील सबरीमाला या ठिकाणांचा उल्लेख केला. “ही ठिकाणे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे आणि एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात. आज, देश त्यांच्याकडे समृद्धीचा एक मजबूत स्त्रोत म्हणून पाहतो. त्यांच्या विकासाद्वारे आपण मोठ्या क्षेत्राचा विकास करू शकतो,” ते म्हणाले.

गेल्या 7 वर्षांत देशाने पर्यटनाची क्षमता ओळखण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. “आज पर्यटन केंद्रांचा विकास हा केवळ सरकारी योजनांचा भाग नसून लोकसहभागाची मोहीम आहे. देशातील वारसा स्थळे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचा विकास ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.” त्यांनी 15 संकल्पनांवर आधारित पर्यटन सर्किट्स सारख्या उपायांची माहिती दिली. उदाहरणार्थ, रामायण सर्किटमध्ये, भगवान रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देता येईल. विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. दिव्य काशी यात्रेसाठी उद्या दिल्लीहून विशेष रेल्वे सुरू होत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. त्याचप्रमाणे बुद्ध सर्किटमुळे भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणांना भेटी देणे सोपे होत आहे. परदेशी पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल करण्यात आले असून लसीकरण मोहिमेत पर्यटन स्थळांना प्राधान्य देण्यात आले आहे.

आज देश पर्यटनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आजच्या काळात पर्यटन विकासासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. पहिली स्वच्छता- पूर्वी आपली पर्यटनस्थळे, पवित्र तीर्थक्षेत्रेही अस्वच्छ होती. आज स्वच्छ भारत अभियानाने हे चित्र बदलले आहे. पर्यटनाला चालना देणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे सोय. परंतु, सुविधांची व्याप्ती केवळ पर्यटनस्थळांपुरती मर्यादित नसावी, असे पंतप्रधान म्हणाले. वाहतूक, इंटरनेट, योग्य माहिती, वैद्यकीय व्यवस्था या सर्व प्रकारच्या सुविधा असाव्यात आणि या दिशेने देशात सर्वांगीण कामही सुरू आहे. पर्यटन वाढवण्यासाठी वेळ ही तिसरी महत्त्वाची बाब आहे. या युगात, लोकांना कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त जागा व्यापायची आहे. पर्यटन वाढवण्यासाठी चौथी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली विचारसरणी. आपली विचारसरणी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक असणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी आपल्याला आपल्या प्राचीन वारशाचा किती अभिमान आहे, हे खूप महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर हा नवा विकास दिल्लीतील काही कुटुंबांसाठीच होता. पण आज देश त्या संकुचित विचारसरणीला मागे टाकून अभिमानाची नवी ठिकाणे बांधून त्यांना भव्यता देत आहे. “आपल्याच सरकारने दिल्लीत बाबासाहेबांचे स्मारक, रामेश्वरममध्ये एपीजे अब्दुल कलाम स्मारक उभारले. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी संबंधित स्थानांना योग्य दर्जा देण्यात आला आहे. आपल्या आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास समोर आणण्यासाठी देशभरात आदिवासी संग्रहालये देखील बांधली जात आहेत”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. नव्याने विकसित झालेल्या ठिकाणांच्या क्षमतांविषयी माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, महामारी असूनही 75 लाख लोक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आले आहेत. अशी ठिकाणे पर्यटनासोबतच आपली ओळख नव्या उंचीवर नेतील, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी ‘व्होकल फॉर लोकल’ या त्यांच्या आवाहनाचा संकुचित अर्थ न लावण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की या आवाहनामध्ये स्थानिक पर्यटनाचा समावेश आहे. परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी भारतातील किमान 15 ते 20 ठिकाणांना भेट देण्याची विनंती त्यांनी पुन्हा केली.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1791490) Visitor Counter : 203