सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा यांच्या हस्ते दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, 2020 मधील सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंडपाचे उद्घाटन, 'खादी इंडिया' चित्रपट प्रदर्शित
Posted On:
17 JAN 2022 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022
एमएसएमई म्हणजे सूक्ष्म-मध्यम-लघु उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भानुप्रताप सिंग वर्मा, तसेच मंत्रालयाचे सचिव बी बी स्वैन आणि खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज दुबईच्या वर्ल्ड एक्स्पो, 2020 मधील एमएसएमई मंडपाचे उद्घाटन झाले. यावेळी दुबईचे वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मानवी प्रतिभेची झेप आणि मानवाला निरनिराळ्या बाबतीत मिळालेले यश साजरे करण्यासाठी जगातील लक्षावधी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने 'वर्ल्ड एक्स्पो, 2020 दुबई' हा मेळावा भरवण्यात आला आहे. मनामनांना जोडून उज्ज्वल भवितव्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने, 'कनेक्टिंग माइंड्स, क्रिएटिंग फ्युचर्स' अशी या मेळाव्याची मध्यवर्ती संकल्पना आखण्यात आली आहे. भारतातील एमएसएमई उद्योगांसाठीची व्यवस्था आणि वातावरण मांडून विविध देशांच्या सरकारांशी तसेच उद्योग व व्यापार जगतातील नेतृत्वाशी संवाद साधता यावा, या क्षेत्रात जगभर अंमलात असलेल्या चांगल्या कार्यपद्धती आणि संकल्पनांची देवाणघेवाण करता यावी, या उद्देशाने एमएसएमई मंत्रालयाने सदर मेळाव्यात भाग घेऊन मंडप उभारला आहे.
केव्हीआयसी म्हणजे खादी ग्रामोद्योग आयोग निर्मित 'खादी इंडिया' या चित्रपट यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला. उद्घाटनपर भाषणात राणे यांनी, रोजगारनिर्मिती आणि उत्पादन क्षेत्राच्या विस्तारासाठी एमएसएमई क्षेत्राकडून मिळत असलेल्या भरीव योगदानाचे कौतुक केले. आज या क्षेत्रातील 6 कोटींपेक्षा अधिक उत्पादन एककांमध्ये 11 कोटींपेक्षा अधिक व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. जीडीपी म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचे 30% हून अधिक योगदान आहे. तर भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत 48% वाटा या क्षेत्राचा आहे. देशातील एमएसएमई उद्योगांना आवश्यक असणाऱ्या - निर्यात, उत्पादनाची गुणवत्ता, जीडीपीमधील योगदान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा तसेच अद्ययावत तंत्रज्ञान याबाबतच्या सुविधा पुरवून देशभरातील एमएसएमई उद्योगांसाठी नवे मापदंड तयार करण्याचा मंत्रालयाचा उद्देश आहे.
एमएसएमई क्षेत्राला अधिक गती देण्यासाठी मंत्रालयाकडून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले जात आहेत, असे राज्यमंत्री भानुप्रताप वर्मा यांनी सांगितले. पतसुविधा, क्षमताबांधणी, कौशल्य प्रशिक्षण, बाजारपेठेशी जोडून देणाऱ्या दुव्यांची सुविधा व संपर्क, तंत्रज्ञानात नवे बदल आदी विषयांमध्ये वेगाने काम करून या उद्योगांच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
* * *
S.Tupe/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790522)
Visitor Counter : 228