पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक


"कठोर परिश्रम हाच आपला एकमेव मार्ग आणि विजय हाच आपला एकमेव पर्याय "

"केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्याप्रकारे नियोजनबद्ध,सक्रिय आणि सामूहिक दृष्टिकोनाचा अवलंब केला होता ,तोच या वेळीही विजयाचा मंत्र असेल''

“भारताने 92 टक्के प्रौढ लोकसंख्येला दिली लसीची पहिली मात्रा. दुसऱ्या मात्रेची व्याप्तीही सुमारे 70 टक्क्यांपर्यंत पोहोचली ”

“अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे स्थानिक प्रतिबंधांवर अधिक लक्ष केंद्रित करणे योग्य ”

''विषाणूचे विविध उत्परिवर्तक आढळले तरी , लसीकरण हा महामारीचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग''

“कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण प्रत्येक उत्परिवर्तकाच्या विरोधात आपली सज्जता ठेवली पाहिजे''.

कोविड-19 च्या लागोपाठ आलेल्या लाटांदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले त्यांचे आभार

Posted On: 13 JAN 2022 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी  सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा  आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते.  या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.

या बैठकीला  संबोधित करताना  पंतप्रधानांनी नमूद केले की,100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारी विरोधातील भारताचा  लढा आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे."कठोर परिश्रम हाच आपला  एकमेव मार्ग आहे आणि विजय हाच आपला एकमेव पर्याय आहे." आपण  भारताची  130 कोटी जनता, आपल्या प्रयत्नांनी कोरोनावर नक्कीच विजय मिळवू, असे ते म्हणाले.

ओमायक्रॉनबद्दल पूर्वी निर्माण झालेला  संभ्रम  आता हळूहळू दूर होत आहे.ओमायक्रॉन उत्परिवर्तक पूर्वीच्या उत्परिवर्तकांपेक्षा  कितीतरी पटीने अधिक वेगाने सामान्य लोकांना संक्रमित करत आहे , असे पंतप्रधान म्हणाले. .आपण दक्ष असले पाहिजे, सावधगिरी बाळगली पाहिजे,मात्र  घाबरण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे.या सणासुदीच्या काळात जनता आणि प्रशासनाच्या दक्षतेत कुठेही ढिलाई होणार नाही, हे पाहावे लागेल. केंद्र आणि राज्य सरकारांनी ज्या प्रकारे यापूर्वी नियोजनबद्ध, सक्रिय आणि सामूहिक दृष्टिकोनाचा अवलंब केला होता, तोच या वेळीही विजयाचा मंत्र असेल. कोरोनाचा संसर्ग आपण जितका मर्यादित ठेवू  तितकी समस्या कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

विषाणूचे विविध उत्परिवर्तक आढळले तरी , लसीकरण हाच  महामारीचा  सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतात निर्माण करण्यात आलेल्या लसी जगभरात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. आज भारताने 92 टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीची पहिली मात्रा दिली आहे, ही  प्रत्येक भारतीयासाठी  अभिमानाची बाब आहे. दुसऱ्या मात्रेची  व्याप्तीही सुमारे  ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे,अशी माहिती त्यांनी दिली. 10 दिवसांच्या आत, भारतानेही सुमारे 30 दशलक्ष किशोरांचे लसीकरण केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर  राहून काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना खबरदारीची मात्रा (प्रिकॉशन डोज)   जितकी  लवकर दिली  जाईल, तितकी आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढेल."100% लसीकरणासाठी आपण हर घर दस्तक मोहीम अधिक तीव्र केली पाहिजे",असे त्यांनी सांगितले. लसींबद्दल  किंवा मास्क घालण्यासंदर्भातील चुकीच्या  माहितीचे खंडन करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

कोणतेही धोरण आखताना सर्वसामान्य लोकांच्या उपजीविकेचे तसेच आर्थिक व्यवहारांचे कमीत कमी नुकसान होईल आणि अर्थव्यवस्थेची गती कायम राहील हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. म्हणूनच, स्थानिक पातळीवर प्रतिबंध लावण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ते म्हणाले. गृह-विलगीकरण स्थितीमध्येच बाधितांना जास्तीतजास्त उपचार पुरवण्याच्या स्थितीत आपण असले पाहिजे आणि त्यासाठी गृह-विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्वे वेळोवेळी सुधारली पाहिजेत आणि या तत्वांचा आपण सर्वांनी कठोरपणे अवलंब केला पाहिजे या मुद्यावर पंतप्रधानांनी भर दिला. कोविड-19 संसार्गावरील उपचारात टेली-मेडिसिन सुविधेची मोठी मदत होईल असे ते म्हणाले.

आरोग्यविषयक पायाभूत सुविधांबाबत बोलताना, यापूर्वी राज्यांना आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या 23,000 कोटी रुपयांच्या पॅकेजचा राज्यांनी उत्तम उपयोग करून घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. या मदतीअंतर्गत देशातील लहान बाळांसाठीची 800 सुविधाकेंद्रे, दीड लाख नव्या अतिदक्षता तसेच उच्च अवलंबित्व सुविधा असलेल्या खाटा, 5 हजारांहून अधिक विशेष रुग्णवाहिका, 950 हून अधिक वैद्यकीय वापराच्या द्रवरूप ऑक्सिजन साठवण टाक्या इत्यादी सुविधांची भर घालण्यात आली. पायाभूत सुविधांचा सतत विस्तार करत राहण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. कोरोनाला पराभूत करण्यासाठी, भविष्यात येऊ घातलेल्या या विषाणूच्या विविध प्रकारांशी लढा देण्यासाठी आपण आधीच सज्ज राहायला हवे. ओमायक्रॉनवर उपाययोजना करतानाच आपण आतापासूनच या विषाणूच्या भविष्यातील नव्या रूपांशी दोन हात करण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे, पंतप्रधान म्हणाले.

लागोपाठ येत असलेल्या कोरोना-19 संसर्गाच्या लाटांच्या काळात उत्तम प्रकारे नेतृत्व केल्याबद्दल या बैठकीला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी दिलेले पाठबळ आणि मार्गदर्शन याबद्दल विशेष आभार मानत तसेच केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा  राज्यांमधील पायाभूत सुविधांचा दर्जा अधिक उत्तम करण्यासाठी मोठा उपयोग झाल्याची भावना व्यक्त करत उपस्थित मुख्यमंत्र्यांनी केंद्राला धन्यवाद दिले. खाटांची संख्या तसेच ऑक्सिजन सुविधा वाढविणे इत्यादी उपाययोजनांच्या माध्यमातून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर उपचार करण्यासाठी केलेल्या तयारीबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेंगलुरूमध्ये या रोगाचा वाढता प्रसार आणि लहान इमारतींमध्ये हा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांची माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णसंख्या वाढण्याची शंका व्यक्त करत त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी तामिळनाडू राज्य, केंद्र सरकारच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे अशी भावना तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. झारखंड राज्यांतील ग्रामीण तसेच आदिवासी भागात कोविडप्रतिबंधक लसीविषयी असलेल्या चुकीच्या संकल्पना आणि त्यामुळे राज्यातील लसीकरण कार्यक्रमात येत असलेल्या समस्या यांची माहिती झारखंडच्या मुखमंत्र्यांनी दिली.लसीकरण अभियानात राज्यांतील एकही नागरिक लसीची मात्रा घेण्यापासून शिल्लक राहणार नाही याची सुनिश्चिती करत असल्याचे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि त्या उभारण्यासाठी विशेषतः ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, या लसीची खबरदारीची  मात्रा देण्यासारख्या पावलांमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढीला लागला आहे. मणिपूर राज्यात अधिकाधिक लोकांना लसीच्या संरक्षक कवचाच्या कक्षेत आणण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत आहे अशी माहिती मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.   

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1789776) Visitor Counter : 377