युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन करणार
Posted On:
11 JAN 2022 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2022
ठळक मुद्दे:
- केंद्रीय युवा व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाबाबत प्रसारमाध्यमांना आभासी पद्धतीने माहिती दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, पुदुचेरी येथे 25 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. महान तत्वज्ञ आणि विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 12जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात येतो. आपण स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करत असताना, त्यांची शिकवण आणि युवकांवरील त्यांचा अथांग विश्वास भारतातील बदलत्या परिस्थितीमध्ये प्रतिध्वनित होत आहे. राष्ट्रीय युवक महोत्सव 2022 बाबत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माहिती देताना केंद्रीय युवा व्यवहार सचिव उषा शर्मा म्हणाल्या की हा महोत्सव भारतातील युवा मनांना आकार देण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या उद्देशाने त्यांना एकत्रित सामर्थ्यामध्ये रुपांतरीत करण्याच्या उद्देशाने आयोजित केला आहे.
सध्या देशात कोविड संसर्ग वेगाने वाढताना दिसत आहे हे लक्षात घेऊन या वर्षीचा महोत्सव 12 आणि 13 जानेवारी 2022 या कालावधीत आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती उषा शर्मा यांनी दिली. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर राष्ट्रीय युवा शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी युवा वर्गामध्ये चैतन्य आणणे, त्यांच्यात स्फुल्लिंग चेतविणे, त्यांना एकत्र आणणे आणि युवा शक्तीला चालना देणे तसेच आपल्या देशातील लोकसंख्येच्या या मोठ्या भागाची खरी क्षमता उजेडात आणणे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत युवकांना, पर्यावरण, हवामान बदल, शाश्वत विकास ध्येयांच्या माध्यमातून विकास, तंत्रज्ञान,उद्योजकता आणि अभिनव संशोधन, स्वदेशी आणि प्राचीन ज्ञान, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्र उभारणी यांसह अनेक चालू घडामोडींबद्दल मते व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. “या परिषदेत युवकांना ऑरोव्हिले या प्रयोगशील शहराची झलक पाहायला मिळेल, तसेच संपूर्ण देशभरातील स्वदेशी प्रकारचे खेळ आणि लोकनृत्ये यांचे दर्शन घडेल. या महोत्सवात, प्रत्यक्ष सांगीतिक सादरीकरण, ऑरोव्हिले तसेच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या प्रशिक्षकांतर्फे संवादात्मक योग वर्गाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे असे शर्मा यांनी पुढे सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ‘मेरे सपनोंका भारत’ आणि ‘अनसंग हिरोज ऑफ इंडियन फ्रीडम मूव्हमेंट’ या विषयावरील निवडक निबंधांचे प्रकाशन करतील. या दोन विषयांवर देशभरातून 1 लाखांहून जास्त निबंध सादर करण्यात आले होते, त्यांतून या निबंधांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय युवक महोत्सव केवळ राष्ट्रीय एकात्मता बळकट करत नाही तर देशातील युवकांमध्ये सामाजिक सुसंवाद आणि बंधुत्वाच्या प्रेरणेचा प्रसार देखील करतो.
पंतप्रधानांच्या उद्घाटनपर सत्राचे अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1789142)
Visitor Counter : 211