युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडा मंत्रालयाच्या ‘टॉप्स’ योजनेमध्ये अदिती अशोकसह पाच गोल्फपटूंसमवेत आणखी 10 खेळाडूंचा समावेश

Posted On: 10 JAN 2022 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जानेवारी 2022

 

घोडेस्वार फवाद मिर्जा, गोल्फपटू अनिर्बान लाहिरी, अदिती अशोक आणि दीक्षा डागर, अल्पाइन स्कीईंगपटू मोहम्मद अरिफ खान यांच्यासह 10 क्रीडापटूंचा समावेश युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने मिशन आलिम्पिक सेल (एमओसी)मध्ये करण्यात आला आहे. या सर्व खेळाडूंना ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्किम’- टॉप्सअंतर्गत आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर या पाचही खेळाडूंचा कोअर गटामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर गोल्फपटू शुभंकर शर्मा आणि त्वेसा मलिक आणि ज्युडोपटू यश घंगस, उन्नती शर्मा आणि लिंथोई चनमबाम यांचा समावेश ‘डेव्हलपमेंट’ समूहामध्ये करण्यात आला आहे. यामुळे आता टॉप्समध्ये समावेश करण्यात आलेल्या क्रीडापटूंची संख्या 301 झाली आहे. त्यापैकी 107 क्रीडापटू कोअर ग्रुपमध्ये आहेत.

प्रत्येक राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी (एसीटीसी)वार्षिक दैनंदिनी अंतर्गत मंत्रालयाच्यावतीने प्रामुख्याने वरच्या क्रमांकाच्या खेळाडूंना मदत करीत असते. टॉप्स एसीटीसी अंतर्गत समावेश झाला नसलेल्या क्षेत्रांमध्ये खेळाडूंनाही काही प्रमाणात त्यांच्या गरजेनुसार पाठिंबा देत आहे. ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची तयारी करताना खेळाडूंना अनपेक्षितपणे लागणारी मदत केली जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग इथला स्कीईंगपटू मोहम्मद अरिफ खान हा पुढच्या महिन्यात बीजिंग येथे होणा-या हिवाळी ऑलिम्पिक 2022 साठी पात्र ठरलेला पहिला भारतीय अल्पाइन स्कीईंगपटू आहे. एमओसीने 17.46 लाख रूपये मंजूर केले आहेत. या निधीचा विनियोग युरोपमध्ये पाच आठवड्याचे प्रशिक्षण आणि उपकरणांच्या खरेदीसाठी करण्यात येणार आहे.

घोडेस्वार फवाद मिर्जा याने जकार्ता येथे  2018 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये इव्हेंटिंग- वैयक्तिक रौप्य पदक जिंकले होते आणि गेल्या वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 23 वे स्थान मिळवले होते. जर्मनीमध्ये वास्तव्य करणारा फवाद मिर्जा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये 87व्या स्थानावर आहे. या 29 वर्षीय खेळाडूने सप्टेंबरमध्ये सोपोट येथे  आणि नोव्हेंबरमध्ये प्रॅटोनी डेल विवॅरो येथे दोन टॉप-10 फिनीश नोंदवले आहेत.

बेंगलुरूची 23 वर्षीय गोल्फपटू अदिती अशोक हिने पदके जिंकून आणि चमकदार कामगिरीने टोकियो 2020 स्पर्धेमध्ये संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. तर हरियाणातल्या झज्जर इथली 21 वर्षीय डावखुरी दीक्षा डागरने 2017 च्या उन्हाळी बधिरांच्या ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकून लक्ष वेधले. तिने गेल्या वर्षी ऑलिम्पिक खेळांमध्ये 50वे स्थान मिळवले आहे.

किशोरवयीन ज्युडोपटू यश घंगास (100किलो गट),लिंथोई चनामबाम (57किला गट), आणि उन्नती शर्मा (63किलो गट) यांनी गेल्या महिन्यात लेबनान, बेरूत येथे झालेल्या आशिया- ओशनिया कनिष्ठ विजेतेपदाच्या  क्रीडा स्पर्धेत रजत पदक जिंकले आहे. यश घणघस हरियाणातल्या पानिपतचा आहे तर लिंथोई मणिपूरचा आहे आणि उन्नती उत्तराखंडची आहे.


* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789009) Visitor Counter : 174