अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अटल निवृत्तीवेतन योजनेत आतापर्यंत 65 लाखांहून अधिक सदस्य नोंदणी


2015 मध्ये अटल निवृत्तीवेतन योजना सुरू झाल्यापासून 3.68 कोटी सदस्य नोंदणी

Posted On: 05 JAN 2022 5:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

 

अटलनिवृत्तीवेतन  योजना  (एपीवाय ) सुरु झाल्यापासून या योजनेचा  साडेसहा वर्षांचा प्रवास 3.68 कोटी सदस्य नोंदणीसह लक्षणीय आहे. 65 लाखांहून अधिक सदस्यांच्या  नोंदणीसह या योजनेची या आर्थिक वर्षातील कामगिरी चांगली झाली आहे.योजना सुरू झाल्यापासून याच कालावधीतील  आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंदणी आहे. नोंदणी व्यतिरिक्त, 56:44 या  पुरुष आणि महिला सदस्यता गुणोत्तरात सुधारणा होत आहे आणि व्यवस्थापनाखालील ठेवी  सुमारे 20,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत.

विशेषत: असंघटित क्षेत्रातील नागरिकांना वृद्धापकाळात उत्पन्न  सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने,  9 मे 2015 रोजी माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी अटल निवृत्तीवेतन योजना ही भारत सरकारची पथदर्शी सामाजिक सुरक्षा योजना सुरु केली होती.

अटल निवृत्तीवेतन योजना प्रशासित करणाऱ्या, निवृत्तीवेतन निधी  नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (पीएफआरडीए ) अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय म्हणाले की, “समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना निवृत्तीवेतनाच्या  कक्षेत आणण्याची ही कामगिरी केवळ सार्वजनिक आणि खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, पेमेंट बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, टपाल  विभाग यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि राज्यस्तरीय बँकर्स समित्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाली आहे''

“या चालू आर्थिक वर्षात एक कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट  साध्य करण्यासोबतच आमच्याकडे देशात निवृत्तीवेतन परिपूर्तता  साध्य करण्याचे कार्य आहे आणि  ते साध्य करण्यासाठी आम्ही सतत सक्रिय पुढाकार घेऊ'', असे पीएफआरडीएच्या अध्यक्षांनी सांगितले.

18-40 वयोगटातील बँक खाते असलेल्या  कोणत्याही भारतीय नागरिकाला अटल निवृत्तीवेतन योजनेचे सदस्यत्व घेता येईल.आणि तीन विशिष्ट फायद्यांमुळे  या योजनेचे  वेगळेपण आहे. पहिले वैशिष्ट्य, ही योजना  60 वर्षे पूर्ण झाल्यावर 1000 रुपये ते रुपये 5000 पर्यंतची किमान हमी निवृत्तीवेतन  प्रदान करते. दुसरे म्हणजे, सदस्याच्या  मृत्यूनंतर पती/पत्नीला आयुष्यभर निवृत्तीवेतनाची हमी दिली जाते आणि शेवटचे वैशिष्ट्य , दोन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना ,जमा झालेला संपूर्ण निवृत्तीवेतन निधी दिला जातो. 

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787724) Visitor Counter : 133