गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

कृती आणि संशोधनाच्या दिशेने स्मार्ट शहरे आणि शिक्षण (एसएएआर) कार्यक्रमाचा प्रारंभ


गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी व्यवहार राष्ट्रीय संस्था स्मार्ट शहरे अभियानाअंतर्गत 15 प्रमुख स्थापत्य आणि नियोजन संस्थांच्या सहकार्याने 75 शहरी प्रकल्पांचे करणार दस्तऐवजीकरण

Posted On: 05 JAN 2022 2:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2022

 

देशभर साजरा होत असलेल्या  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम ) सोहळ्याचा  एक भाग म्हणून, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट शहरे अभियानाने “कृती आणि संशोधनाच्या दिशेने स्मार्ट शहरे आणि शिक्षण (एसएएआर)” या कार्यक्रमाचा प्रारंभ केला असून गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, शहरी व्यवहार राष्ट्रीय संस्था (एनआययूए) आणि देशातील आघाडीच्या भारतीय शैक्षणिक संस्थांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, देशातील 15 प्रमुख स्थापत्य  आणि नियोजन संस्था या  स्मार्ट शहरे अभियानासोबत  सोबत काम करतील आणि स्मार्ट शहरे अभियानाद्वारे हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे दस्तऐवजीकरण करतील.विद्यार्थ्यांना शहरी विकास प्रकल्पांमध्ये सहभागासाठी संधी उपलब्ध करून देत तसेच शहरांचे अभ्यासक आणि शैक्षणिक संस्था  यांच्यात माहितीचा वास्तविक  प्रवाह उपलब्ध करून देऊन सर्वोत्तम पद्धतींच्या माध्यमातून हे दस्तऐवज संकलित केले जातील.

स्मार्ट शहरे अभियानाअंतर्गत असलेले  शहरी प्रकल्प हे इतर आकांक्षी  शहरांसाठी दीपस्तंभासारखे  प्रकल्प आहेत. 2015 मध्ये हे अभियान मिशन सुरू झाल्यापासून,  2,05,018 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह  100 स्मार्ट शहरे  एकूण 5,151 प्रकल्प विकसित करत आहेत. स्मार्ट शहरे अभियानाअंतर्गत भारतातील 75 महत्त्वाच्या शहरी प्रकल्पांचे दस्तऐवजीकरण  करणे हे एसएएआर अंतर्गत संकल्पित केलेला पहिला उपक्रम आहे. हे 75 शहरी प्रकल्प नाविन्यपूर्ण, बहु-क्षेत्रीय आहेत आणि संपूर्ण भौगोलिक  क्षेत्रांमध्ये  राबवले जात आहेत.

या कार्यक्रमाला सहकार्य लाभलेल्या 15 प्रमुख संस्थांमध्ये, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आणि कमला रहेजा विद्यानिधी स्थापत्य संस्था, मुंबई या महाराष्ट्रातल्या दोन संस्थांचा समावेश आहे. 

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1787640) Visitor Counter : 236