पंतप्रधान कार्यालय
त्रिपुरा येथील महाराजा बीर बिक्रम विमानतळ आणि अन्य प्रकल्पांच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
04 JAN 2022 6:30PM by PIB Mumbai
भारत माता की जय!
भारत माता की जय!
त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव आर्य , इथले युवा आणि ऊर्जावान मुख्यमंत्री बिप्लब देब , त्रिपुराचे उप-मुख्यमंत्री जिश्नु देव वर्मा , केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी प्रतिमा भौमिक जी, ज्योतिरादित्या सिंधिया , राज्य सरकारमधील मंत्री एनसी देबबर्मा , रत्नलाल नाथ , प्रणजीत सिंघा रॉय , मनोज कांति देब , अन्य लोक प्रतिनिधि गण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !
शबाई के नमोश्कार। शकल के दू हजार बाइस वर्षेर ऑनेक-ऑनेक शुभेच्छा। जॉतौनो खूनूमखा। जॉतौनो बीशी कॉतालनी खा काहाम याफर ओ। वर्षाच्या सुरुवातीलाच , त्रिपुराला माता त्रिपुर सुंदरीच्या आशिर्वादाने आज तीन प्रकल्पांची भेट मिळत आहे. पहिली भेट आहे - कनेक्टिविटी , दुसरी भेट आहे - 100 विद्याज्योति शाळांचे अभियान आणि तिसरी भेट आहे - त्रिपुरा ग्राम समृद्धि योजना . आज शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि शिलान्यास इथे झाला आहे. तुम्हा सर्वांचे या तिन्ही प्रकल्पांसाठी खूप-खूप अभिनंदन !
मित्रांनो ,
21 व्या शतकातील भारत 'सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास' या भावनेनेच सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल. काही राज्ये मागे राहतात , काही राज्यातील लोक मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहतात, हा असंतुलित विकास राष्ट्राच्या विकासासाठी योग्य नाही, ठीक नाही. . त्रिपुरातील जनतेने अनेक दशकांपासून हेच पाहिले, हेच अनुभवले आहे. आधी इथे भ्रष्टाचार बोकाळत चालला होता आणि विकासाच्या गाडीला खीळ बसली होती. इथे आधी जे सरकार होते, त्यांच्याकडे विकासाबद्दल कोणतीही दूरदृष्टी नव्हती आणि करण्याची इच्छाच नव्हती. गरीबी आणि मागासलेपण त्रिपुराच्या भाग्याशी जोडले होते. ही स्थिती बदलण्यासाठी मी त्रिपुरातील लोकांना HIRA - H म्हणजे हायवे(महामार्ग), I म्हणजे इंटरनेट जाळे , R म्हणजे रेल्वे आणि A म्हणजे हवाई मार्ग, हे आश्वासन दिले होते. आज हिरा -HIRA प्रारूपाच्या आधारे त्रिपुरा आपल्या संपर्क आणि दळणवळणाचा विस्तार आणि बळकटीकरण करत आहे,
इथे येण्यापूर्वी मी महाराजा बीर बिक्रम विमानतळाची नवनिर्मित टर्मिनलची इमारत आणि अन्य सुविधा पाहण्यासाठी गेलो होतो. त्रिपुराची संस्कृती, तिचा वारसा, येथील वास्तुकला विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या प्रथम दृष्टीस पडेल. त्रिपुराचे नैसर्गिक सौंदर्य असो, उनाकोटी टेकड्यांवरील आदिवासी मित्रांची कला असो, दगडी शिल्पे असो, असे वाटते जणू विमानतळावरच संपूर्ण त्रिपुरा एकवटला आहे. नवीन सुविधांमुळे महाराजा बीर-बिक्रम विमानतळाची क्षमता पूर्वीच्या तुलनेत तीन पटीने वाढली आहे. आता इथे डझनभर विमाने उभी करता येऊ शकतील. यामुळे त्रिपुराबरोबरच संपूर्ण ईशान्य प्रदेशाची हवाई कनेक्टिविटी वाढवण्यात मोठी मदत होईल. जेव्हा इथल्या देशांतर्गत कार्गो टर्मिनलचे, कोल्ड स्टोरेजचे काम पूर्ण होईल, तेव्हा संपूर्ण ईशान्य प्रदेशातल्या व्यापार उद्योगाला अधिक बळ मिळेल. आपल्या महाराजा बीर-बिक्रम जी यांनी शिक्षण क्षेत्रात, वास्तुकला क्षेत्रात त्रिपुराला नव्या उंचीवर नेलं होतं. आज ते त्रिपुराचा विकास पाहून, इथल्या लोकांचे प्रयत्न पाहून खूप खुश झाले असते.
मित्रांनो,
आज त्रिपुराची कनेक्टिविटी वाढवण्याबरोबरच त्याला ईशान्येचे प्रवेशद्वार म्हणून विकसित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. रस्ते असो, रेल्वे असो, हवाई असो किंवा जलमार्ग कनेक्टिविटी असो, आधुनिक पायाभूत विकासामध्ये जेवढी गुंतवणूक आमचे सरकार करत आहे, तेवढी यापूर्वी कधीही झाली नाही. आता त्रिपुरा या क्षेत्रात व्यापार उद्योगाचे नवीन केंद्र बनत आहे, व्यापार कॉरिडोर बनत आहे. रस्ते आणि रेल्वेशी संबंधित डझनभर प्रकल्प आणि बांगलादेश बरोबर आंतरराष्ट्रीय जलमार्ग कनेक्टिविटीने इथे कायापालट घडवायला सुरवात केली आहे. आमचे सरकार अगरतला-अखौरा रेल लिंकचे काम देखील वेगाने पूर्ण करण्याचे काम करत आहे.
बंधू आणि भगिनींनो,
केंद्रात आणि राज्यात जेव्हा विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे सरकार असते, तेव्हा दुप्पट वेगाने कामं होतात. म्हणूनच दुहेरी इंजिनच्या सरकारला पर्याय नाही. दुहेरी इंजिनचे सरकार म्हणजेच संसाधनांचा योग्य वापर, दुहेरी इंजिनचे सरकार म्हणजे भरपूर संवेदनशीलता, दुहेरी इंजिनचे सरकार म्हणजे लोकाच्या सामर्थ्याला प्रोत्साहन, दुहेरी इंजिनचे सरकार म्हणजे सेवाभाव, समर्पणभाव. दुहेरी इंजिनचे सरकार म्हणजे संकल्पांची सिद्धी, दुहेरी इंजिनचे सरकार म्हणजे समृद्धीच्या दिशेने एकजुटीने प्रयत्न. आज इथे प्रारंभ केला जात असलेली मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धि योजना याचेच एक उदाहरण आहे. जेव्हा प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी जोडणी होईल, जेव्हा प्रत्येक गरीबाकडे पक्के घर असेल आणि आताच मी काही लाभार्थ्यांना भेटून आलो. या योजनांबद्दलचा त्यांचा स्वतःचा अनुभव काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न मी करत होतो. एक मुलगी जिला घर मिळणे नक्की झाले आहे , आता केवळ फरशीचे काम झाले आहे , अजून भिंतीचे काम बाकी आहे , मात्र ती इतकी खुश होती, इतकी खुश होती की तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहणे थांबतच नव्हते. हा आनंद , हे सरकार सामान्य माणसाच्या आनंदासाठी समर्पित आहे. जेव्हा प्रत्येक पात्र कुटुंबाकडे आयुष्मान योजनेचे कार्ड असेल, एक असे कुटुंब मला भेटले , ज्यात आई आणि तिचा तरुण मुलगा दोघांनाही कर्करोग झाला होता. आयुष्मान भारत योजनेमुळे आईचे आयुष्य, मुलाचे आयुष्य , त्याला उपयुक्त मदत मिळू शकेल. जेव्हा प्रत्येक गरीबाकडे विमा सुरक्षा कवच असेल, जेव्हा प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळेल,जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल, , प्रत्येक गावात उत्तम रस्ते असतील, तेव्हा गरीबाचा आत्मविश्वास वाढेल, गरीबाचे आयुष्य अधिक सुकर होईल, माझ्या देशातील प्रत्येक नागरिक सशक्त बनेल, माझा गरीब सशक्त होईल. हाच आत्मविश्वास समृद्धीचा आधार आहे , संपन्नतेचा आधार आहे. म्हणूनच , मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की आता आपल्याला योजनांच्या प्रत्येक लाभार्थी पर्यंत स्वतः पोहचावे लागेल, योजनांच्या पूर्ण लाभ मिळेल या दिशेने पुढे जावे लागेल. मला आनंद आहे की आज त्रिपुराने या दिशेने खूप मोठे पाऊल टाकले आहे. अशा वर्षात , जेव्हा त्रिपुरा आपल्या राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण करत आहे, तेव्हा हा संकल्प हा खूप मोठी कामगिरी आहे. गाव आणि गरीबांच्या कल्याणासाठी सुरु असलेल्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्यात त्रिपुरा देशातील अव्वल राज्यांपैकी एक आहे. ग्राम समृद्धि योजना त्रिपुराची कामगिरी आणखी उंचावेल.
20 पेक्षा अधिक मूलभूत सुविधा प्रत्येक गावात प्रत्येक गरीब परिवाराला मिळाव्यात याची काळजी घेतली जाईल. जी गावे प्रथम शंभर टक्के उद्दिष्ट गाठतील त्यांना लाखोंचा प्रोत्साहन निधी सुद्धा दिला जाईल, ही गोष्ट मला सर्वात जास्त भावली. यामुळे विकासासाठी एक निकोप स्पर्धा असेल.
मित्रहो,
आज त्रिपुरामध्ये जे सरकार आहे ते गरिबांचे दुःख समजून घेते आहे, गरिबांबाबत संवेदनशील सुद्धा आहे. आपले मीडियातील मित्र यावर बोलत नाहीत म्हणून मी आज एक उदाहरण देऊ इच्छितो. जेव्हा त्रिपुरात पंतप्रधान ग्रामीण घर योजना या योजनेवर काम सुरू झाले तेव्हा कच्च्या घराच्या सरकारी व्याख्येमुळे एक अडचण उभी राहिली. आधी इथे असलेल्या सरकारने जी व्याख्या केली होती त्यानुसार ज्या घरावर पत्र्याने बनवलेले छत असेल त्याला कच्चे घर मानले जात नव्हते. घराच्या आतील परिस्थिती कितीही हालाखीची असू दे, घराच्या भिंती मातीच्या असू देत, पण घराच्या छतावर पत्रे असतील तर त्या घराला कच्चे घर मानले जात नव्हते. या कारणामुळे त्रिपुरातील हजारो ग्रामीण परिवार पंतप्रधान ग्रामीण घर योजनेच्या लाभापासून वंचित होते. याबाबतीत मी माझे मित्र विप्लब देवजी यांची प्रशंसा करतो. कारण ते हा विषय घेऊन माझ्याकडे आले. त्यांनी केंद्र सरकारसमोर सर्व परिस्थिती मांडली, पुराव्यानिशी मांडली. त्यानंतर भारत सरकारनेही आपले नियम बदलले, व्याख्या बदलल्या आणि म्हणूनच त्रिपुरातील एक लाख 80 हजाराहून अधिक गरीब कुटुंबांना मजबूत बांधकाम झालेल्या घराचा हक्क मिळाला आत्तापर्यंत त्रिपुरातील पन्नास हजारांहून अधिक मंडळींना मजबूत बांधकामाचे घर मिळाले सुद्धा आहे. दीड लाखाहून अधिक कुटुंबांनी नुकतेच आपले घर बांधण्यासाठी पहिला हप्ता सुद्धा दिला आहे. यावरून आपण आपल्याला अंदाज येईल की आधीचे सरकार कसे काम करत होते आणि आमचे डबल इंजिन सरकार कसे काम करत आहे.
बंधू-भगिनींनो,
कोणत्याही प्रदेशाच्या विकासासाठी साधन सामग्री सोबतच तेथील नागरिकांचे सामर्थ्य सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. आमची वर्तमानातील आणि भविष्यातील पिढी आत्ता आमच्या पेक्षाही जास्त सामर्थ्यवान बनावी ही काळाची गरज आहे, अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ही. एकविसाव्या शतकात भारताला आधुनिक करणारे दूरदृष्टीचे युवक मिळावेत म्हणूनच देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जात आहे. यामध्ये प्रादेशिक भाषेतील अभ्यासावर सुद्धा तेवढा भर दिला गेला आहे. त्रिपुरातील विद्यार्थ्यांना आता मिशन-100, विद्या ज्योती या योजनांमधून सुद्धा मदत मिळणार आहे. शाळांमध्ये शेकडो करोडो रुपयांनी उभारल्या जाणाऱ्या आधुनिक सुविधा अभ्यासाला अधिक सोपे आणि सुलभ करतील. विशेषतः शाळांना ज्या प्रकारे अटल टिंकरिंग लॅब, ICT लॅब आणि व्होकेशनल प्रयोगशाळांनी सुसज्ज केले जात आहे ते सर्व त्रिपुराच्या युवकांना नूतनीकरणक्षम, स्टार्टअप्स आणि युनिकॉर्नसमृद्ध आत्मनिर्भर भारतासाठी तयार करेल.
मित्रहो,
करोनाच्या या कठीण कालखंडात सुद्धा आमच्या युवकांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले गेले. कालपासून देशभरात पंधरा ते अठरा वर्षाच्या किशोरवयीन मुलांसाठी विनामूल्य लसीकरणाची मोहीम सुरू केली गेली आहे.
विद्यार्थ्यांना निश्चिंत मनाने आपला अभ्यास करता यावा., कोणत्याही काळजीविना परीक्षा देता यावी, हे खूप आवश्यक आहे. त्रिपुरामध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. 80 टक्क्यांहून जास्त लोकांना पहिली मात्रा आणि 65 टक्क्याहून जास्त लोकांना दुसरी मात्रा मिळाली आहे. मला संपूर्ण विश्वास आहे पंधरा ते अठरा वर्षीय मुलांचे संपूर्ण लसीकरण हे उद्दिष्टसुद्धा त्रिपुरा वेगाने गाठेल.
मित्रहो,
आज डबल इंजिन सरकार, गाव असो शहर असो, संपूर्ण आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करत आहे. शेतीपासून वनोपज आणि स्व-सहाय्य गटांपासून सर्व क्षेत्रातील जी काम पार पडत आहेत ती आमच्या या कटिबद्धतेचा पुरावा आहे. शेतकरी असोत, स्त्रिया असोत किंवा वनोपजवर अवलंबून असलेले आमचे वनवासी मित्र आज त्यांना संघटित करून एक मोठी शक्ती आकाराला आणली जात आहे.
आज जेव्हा त्रिपुरा पहिल्यांदाच “मूली बांबू कुकीज” यासारखे पॅकेज उत्पादन लॉन्च करत आहे तर त्याच्या पाठी त्रिपुरातील आमच्या माता भगिनींची मोठी महत्त्वाची भूमिका आहे.
एकदाच वापर असणाऱ्या प्लास्टिकचा पर्याय देशाला देण्यावर सुद्धा त्रिपुरा मुख्य भूमिका निभाऊ शकते इथे तयार होणारे बांबूचे झाडू, बांबूच्या बाटल्या अश्या उत्पादनांसाठी देशात मोठी बाजारपेठ तयार होत आहे. यामुळे बांबूच्या सामान तयार करणाऱ्या आमच्या हजारो मित्रांना रोजगार, स्व-रोजगार मिळणार आहे. बांबूच्या संदर्भात असलेल्या कायद्यामध्ये बदल झाल्याचा जास्तीत जास्त लाभ त्रिपुराला मिळाला आहे.
मित्रहो,
त्रिपुरामध्ये सेंद्रीय शेतीसंदर्भातही चांगले काम होत आहे. अननस असो, सुगंधी तांदूळ असो, आलं असो, हळदी असो, मिरची असो यांच्याशी संबंधित शेतकऱ्यांसाठी देशात आणि जगात आज मोठी बाजारपेठ खुली आहे. त्रिपुरातील छोट्या शेतकऱ्यांची ही उत्पादने आज किसान रेल्वेच्या माध्यमातून आगरतळापासून दिल्लीसहित देशातील अनेक शहरापर्यंत कमीत कमी भाड्यामध्ये कमी वेळेमध्ये पोचत आहेत. महाराज वीर विक्रम विमानतळावर अशी मोठी कार्गो सेंटर्स तयार होत आहेत. त्यामुळे येथील सेंद्रीय कृषी उत्पादने परदेशी बाजारपेठेपर्यंत सहजपणे पोहोचतील.
मित्रहो,
विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य राहण्याची त्रिपुराची ही सवय आपल्याला कायम राखायची आहे. देशातील सामान्य माणूस, देशाच्या दूरवरच्या कोपऱ्यात राहणारी व्यक्तीसुद्धा देशाच्या आर्थिक विभागात सहभागी असेल, सशक्त होईल, सबल होईल हाच आमचा संकल्प आहे. याच संकल्पातून प्रेरणा घेत आम्ही दुप्पट विश्वासाने काम करू. आपणा लोकांचे प्रेम, आपली मैत्री आणि आपला विश्वास हीच आमची मोठी संपत्ती आहे आणि आज मी विमानतळावर येताना बघत होतो रस्त्यावर सगळे आवाज देत होते. आपलं हे प्रेम, मी आपल्याला डबल इंजिन शक्तीच्या हिशोबाने आपले हे प्रेम, डबल विकासाने परत करेन. मला विश्वास आहे जेवढे प्रेम आणि स्नेह त्रिपुरातील लोकांनी आम्हाला दिला आहे तो पुढे ही मिळत राहील. पुन्हा एकदा या विकास योजनांसाठी आपले अभिनंदन करतो.
मां त्रिपुराशुंदरिर निकॉट, आपनार परिवारेर शॉमृद्धि, उराज्येर शार्बिक बिकाश कामना कोरछि। शकोल के धन्नबाद...... जॉतौनो हम्बाई। भारत माता की जय !
***
MC/Sushma/Vijaya/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787623)
Visitor Counter : 199
Read this release in:
Urdu
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam