पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पीएम - किसान योजनेच्या आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 01 JAN 2022 5:27PM by PIB Mumbai

उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर व्यक्ती, सर्वात पहिले मी माता वैष्णो देवी परिसरात झालेल्या दुःखद घटनेविषयी शोक व्यक्त करतो. चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले जवळचे लोक गमावले, जे जखमी झाले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. केंद्र सरकार जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हाजींशी देखील माझं बोलणं झालं आहे. मदत कार्य सुरु आहे, जखमींच्या उपचाराची संपूर्ण काळजी घेतली जात आहे.

बंधू - भगिनींनो,

या कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यांचे कृषी मंत्री, इतर मान्यवर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेल्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, भारतात राहात असलेल्या आणि भारताबाहेर असलेल्या प्रत्येक भारतीयाला, भारताच्या प्रत्येक शुभचिंतकाला आणि जगाला 2022 या नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्षाची सुरवात देशाच्या कोट्यवधी अन्नदात्यांसोबत व्हावी, वर्षाच्या सुरवातीलाच मला देशाच्या कानाकोपऱ्यातल्या आपल्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या दर्शनाचे सौभाग्य मिळाले, हे माझ्यासाठी खूप प्रेरणादायक क्षण आहेत. आज देशातल्या कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना, विशेषतः लहान शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा 10 वा हप्ता मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांत 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले गेले आहेत. आज आपल्या शेतकरी उत्पादन संस्था (Farmers Produce Organisations), त्यांच्याशी जोडले गेलेले शेतकरी, यांना देखील आर्थिक मदत पाठवण्यात आली आहे. शेकडो शेतकरी उत्पादन संस्था आज नवी सुरवात करत आहेत.

मित्रांनो,

आपल्याकडे म्हटलं जातं - ''आमुखायाति कल्याणं कार्यसिद्धिं हि शंसति''।

म्हणजेच, यशस्वी सुरवात कार्यसिद्धीची, संकल्प सिद्धीची घोषणा आधीच करते. एक राष्ट्र म्हणून आपण 2021 हे सरतं वर्ष याच दृष्टीने बघू शकतो. 2021 मध्ये, शंभर वर्षांतली सर्वात मोठी महामारी आली, आणि तिला तोंड देताना कोट्यवधी भारतीयांचे सामूहिक सामर्थ्य, देशाने काय करून दाखवलं, याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. आज आपण नव्या वर्षात प्रवेश करत आहोत, तेव्हा गेल्या वर्षीच्या आपल्या प्रयत्नांपासून प्रेरणा घेऊन आपल्याला नव्या संकल्पपूर्तीकडे मार्गक्रमण करायचे आहे.

या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहोत. ही वेळ आहे देशाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी एक नवा चैतन्यमय प्रवास सुरु करण्याची, नव्या हिमतीने पुढे जाण्याची आहे. 2021 मध्ये आपण भारतीयांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की जेव्हा आपण काही ठरवतो, तेव्हा मोठ्यात मोठं उद्दिष्टही सहज साध्य होतं. भारतासारखा विशाल देश, इतके वैविध्य असलेला देश इतक्या कमी वेळात 145 कोटी लसींच्या मात्रा देऊ शकेल? कुणी विचार केला असता की भारत एका दिवसात अडीच कोटी मात्रा देऊन विक्रम करू शकतो? कुणी विचार करू शकत होतं, की भारत एका वर्षात 2 कोटी घरांत नळाने पाणीपुरवठ्याची सोय करू शकेल? 

भारत या करोना काळात अनेक महिन्यांपासून आपल्या 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवठा करत आहे. आणि मोफत धान्य पुरवठ्याच्या या एकाच योजनेवर भारताने 2 लाख 60 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले आहेत. मोफत धान्य योजनेचा खूप मोठा लाभ खेड्यांना, गरिबांना, खेड्यांत राहणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांना मिळाला आहे, शेतमजुरांना मिळाला आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे असंही म्हटलं जातं - संघे शक्ति कलौ युगे।

म्हणजे, हे संघटनातून शक्तीचे युग आहे. संघटन शक्ती, म्हणजे सर्वांचे प्रयत्न, संकल्प सिद्धी पर्यंत जाणारा मार्ग. जेव्हा 130 कोटी भारतीय मिळून एक पाऊल पुढे टाकतात तेव्हा ते फक्त एक पाउल नसतं, ती एकत्रित 130 कोटी पावलं असतात. आम्हा भारतीयांचा स्वभाव आहे, विखुरलेल्या मोत्यांची एक माळ बनते, तेव्हा भारत माता दैदिप्यमान होते. कितीतरी लोक देशासाठी आपलं आयुष्य देत आहेत, राष्ट्र निर्माण करत आहेत. हे काम ते आधी देखील करत असत , मात्र त्यांच्या या कार्याची दखल घेण्याचे काम आता होत आहे. प्रत्येक भारतीयाची शक्ती आज सामूहिक शक्तीचं रूप घेऊन देशाच्या विकासाला नवी गती आणि उर्जा देत आहे. जसं आपण आजकाल पद्म पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या लोकांची नावं बघतो, त्यांचे चेहरे बघतो, तेव्हा मन आनंदाने भरून येतं. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नानेच आज भारत कोरोनासारख्या इतक्या मोठ्या महामारीचा सामना करत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

कोरोनाच्या या काळात, देशाची आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणे, आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणखी वाढविण्यावर सातत्याने काम होत आहे. 2021 मध्ये देशात शेकडो ऑक्सिजन प्लांट बसवले गेले, हजारो नवे व्हेंटीलेटर्स तयार केले गेले आहेत. 2021 मध्ये देशात अनेक नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झालीत, डझनावारी वैद्यकीय महाविद्यालयांवर काम सुरु झालं आहे. 2021 मध्ये देशात हजारो निरामय केंद्र देखील सुरु करण्यात आली आहेत. आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन देशाच्या जिल्ह्या - जिल्ह्यात, तालुक्या - तालुक्यात देखील चांगले दवाखाने, चांगल्या चाचणी प्रयोगशाळांचे जाळे मजबूत करेल. डिजिटल भारताला नवी ताकद देत आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशन देशात आरोग्य सुविधा आणखी सुलभ आणि प्रभावी बनवेल. 

बंधू आणि भगिनींनो,

ज्यावेळी कोविडचे संकट देशात आले नव्हते, त्यावेळच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही अनेक निकषांवर आज भारताची आर्थिक स्थिती अधिक सुदृढ असल्याचे, आकडेवारीचे निदर्शक सांगत आहेत. आज आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 8 टक्क्यांपेक्षा देखील जास्त आहे. भारतात विक्रमी गुंतवणूक आली आहे. आपली विदेशी चलनाची गंगाजळी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. वस्तू आणि सेवा कर संकलनाने देखील जुने विक्रम मोडीत काढले आहेत. निर्यात आणि विशेषतः कृषी क्षेत्रात देखील आपण नवे विक्रम केले आहेत.

मित्रांनो,

आज आपला देश, आपली विविधता आणि विशालतेला अनुरूपच, प्रत्येक क्षेत्रात आपण विकासाचे मोठे विक्रम करत आहे. 2021 मध्ये भारतात जवळजवळ 70 लाख कोटी रुपयांचे व्यवहार केवळ युपीआयने झाले आहेत, डिजिटल व्यवहार झाले आहेत. आज भारतात 50 हजारपेक्षा जास्त स्टार्टअप्स काम करत आहेत. यातील 10 हजार पेक्षा जास्त स्टार्टअप्स तर गेल्या 6 महिन्यात बनले आहेत. 2021 मध्ये भारताच्या युवकांनी करोनाच्या या कालखंडात देखील 42 युनिकॉर्न बनवून एक इतिहास रचला आहे. मी आपल्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, की हे एक एक युनिकॉर्न, हे जवळजवळ सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेले स्टार्टअप्स आहेत. इतक्या कमी वेळात इतकी प्रगती झाली आहे, आज भारताची युवाशक्ती नवी यशोगाथा लिहित आहे.

आणि मित्रांनो,

आज जिथे भारत एकीकडे आपली स्टार्टअप व्यवस्था मजबूत करत आहे, तर दुसरीकडे आपली संस्कृतीही आपण तितक्याच अभिमानाने समर्थ करत आहोत. काशी विश्वनाथ धाम सौंदर्यीकरण प्रकल्पापासून ते केदारनाथ धाम विकास प्रकल्पांपर्यंत, आदि शंकराचार्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार असो, की माता अन्नपूर्णेच्या मूर्तीसह भारतातून चोरी केलेल्या शेकडो मूर्ती परत आणण्यापर्यंत, अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामापासून धोलाविरा आणि दुर्गा पूजा उत्सवाला जागतिक वारसा हा दर्जा मिळण्यापर्यंत, भारताकडे इतकं सगळं आहे. देशाविषयी जगाला आकर्षण आहे. आणि आता जेव्हा आपण आपल्या या वारशांचे जतन आणि संवर्धन करायला सुरवात केली आहे, त्यामुळे तिथे पर्यटन आणि तीर्थाटन देखील वाढेल.

मित्रांनो,

भारत आपल्या युवकांसाठी, आपल्या देशातल्या महिलांसाठी आज एक अभूतपूर्व पाउल उचलत आहे. 2021 मध्ये भारताने आपल्या सैनिकी शाळांचे दरवाजे मुलींसाठी उघडले. 2021 मध्ये भारताने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दरवाजे देखील महिलांसाठी उघडले आहेत. 2021 मध्ये भारताने मुलींच्या लग्नाचं वय 18 पासून वाढवून 21 वर्ष, म्हणजे मुलांइतकं करण्याचे प्रयत्न सुरु केले. आज भारतात पहिल्यांदा पंतप्रधान घरकुल योजनेमुळे जवळजवळ 2 कोटी महिलांना त्यांच्या मालकीचं घर मिळालं आहे. आपले शेतकरी बंधू भगिनी, आपले खेड्यांत राहणारे सहकारी समजू शकतात की हे किती मोठं काम झालं आहे.

मित्रांनो,

2021 साली आपण भारतीय खेळाडूंमध्ये एक नवा आत्मविश्वास देखील पहिला आहे. भारतात खेळांविषयीचे आकर्षण वाढले आहे.नव्या युगाची सुरवात झाली आहे. भारताने जेव्हा टोक्यो ऑलिंपिकमध्ये इतकी पदके जिंकली, त्यावेळी आपल्यापैकी प्रत्येक जण आनंदात होता. आणि, जेव्हा आपल्या दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिंपिक स्पर्धेत पदके जिंकून इतिहास रचला, त्यावेळी आपल्या प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरुन आला होता. पॅरालिंपिकच्या इतिहासात आतापर्यंत भारताने जेवढी पदके जिंकली होती, त्यापेक्षा अधिक पदके, आपल्या दिव्यांग खेळाडूंनी मागच्या एकाच पॅरालिंपिकमध्ये जिंकली आहेत. भारत आज आपले खेळाडू आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधांवर जेवढी गुंतवणूक करतो आहे, तेवढी याआधी कधीही केली नव्हती. उद्याच मी मेरठ मध्ये आणखी एका क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहे.

मित्रांनो,

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत भारताने आपली धोरणे आणि निर्णयांनी आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. भारताने 2016 साली हे उद्दिष्ट ठेवले होते की वर्ष 2030 पर्यंत, स्थापित वीजक्षमतेपैकी 40 टक्के ऊर्जा, बिगर-जीवाश्म इंधनापासून निर्माण केली जाईल. भारताने आपले हे उद्दिष्ट, जे 2030 चे उद्दिष्ट होते, ते नोव्हेंबर 2021 मध्येच प्राप्त केले आहे.   

हवामान बदलाविरुद्धच्या लढाईत, जगाचे नेतृत्व करत भारताने 2070 पर्यंत, शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट देखील जगासमोर ठेवले आहे. आज भारत हायड्रोजन मिशनवर काम करत आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतही भारताने आघाडी घेतली आहे. देशात कोट्यवधी एलईडी बल्ब वितरित केल्यामुळे, दरवर्षी गरिबांचे, मध्यमवर्गाचे जवळपास 20 हजार कोटी रुपयांच्या वीज बिल रकमेची बचत झाली आहे. देशभरातील स्थानिक प्रशासनानेही, पथदिव्यांच्या व्यवस्थेत, एलईडी दिवे लावण्याचे काम सुरु आहे. आणि माझे शेतकरी बंधू,आपले अन्नदाता, ऊर्जादाताही बनावेत, यासाठी देखील भारत एक खूप मोठे अभियान चालवत आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत,शेतकरी शेताच्या बांधावर सौर पॅनल लावून ऊर्जा निर्माण करु शकतील यासाठी त्यांना देखील मदत केली जात आहे. लाखो शेतकऱ्यांना सरकारकडून सौर पंप देखील देण्यात आले आहेत. यामुळे पैशांची बचत तर होत आहेच, शिवाय पर्यावरणाचेही रक्षण होत आहे.

मित्रांनो,

2021 हे वर्ष, कोरोना विरुद्धच्या देशाच्या मजबूत लढाईचे वर्ष म्हणून लक्षात ठेवले जाईल, तसेच याच काळात भारताने ज्या सुधारणा अमलात आणल्या, त्यांचीही चर्चा नक्कीच होईल. गेल्या वर्षी भारताने आधुनिक पायाभूत सुविधा उभारणी आणि सुधारणांच्या प्रक्रियेला आणखी जलद गतीने पुढे नेले आहे. सरकारचा हस्तक्षेप कमी व्हावा, प्रत्येक भारतीयाचे सामर्थ्य अधिक उजळून निघावे, आणि सर्वांच्या प्रयत्नांतून, राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य व्हावीत, याच कटिबद्धतेने, या प्रक्रियेला अधिकाधिक सक्षम केले जात आहे. व्यापार-उद्योग अधिक सोपे, व्हावे यासाठी देखील गेल्या वर्षात अनेक निर्णय घेतले गेले.

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय आराखडा, देशात पायाभूत विकास सुविधांच्या उभारणीला नवी धार देणार आहे. ‘मेक इन इंडिया’ला नवे आयाम देत, देशाने चिप निर्माण, सेमी कंडक्टर सारख्या नव्या क्षेत्रांसाठी देखील महत्त्वाकांक्षी योजना लागू केल्या आहेत. गेल्या वर्षीच, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी देशाला सात नव्या कंपन्या मिळाल्या आहेत. आम्ही पहिले, सुधारणावादी ड्रोन धोरणही लागू केले आहे. अंतराळात देशाच्या आकांक्षांना नवे पंख देत, भारतीय अवकाश संघटनेची स्थापनाही केली आहे.

मित्रांनो,

भारतात होत असलेला विकास गावागावात पोहोचवण्यासाठी डिजिटल इंडिया मोहीम मोठी भूमिका बजावत आहे. 2021 मध्ये हजारो नवीन गावे ऑप्टिकल फायबर केबलने जोडली गेली आहेत. याचा मोठ्या प्रमाणात लाभ आपल्या शेतकरी मित्रांसह त्यांचे कुटुंब, त्यांच्या मुलांनाही झाला आहे.ई -रुपी सारखे नवीन डिजिटल भरणा उपायदेखील 2021 मध्येच सुरु करण्यात आले आहेत. एक राष्ट्र, एक शिधापत्रिका योजनाही देशभर लागू करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ सहज पोहोचण्यासाठी आज देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्ड दिले जात आहेत.  

बंधु आणि भगिनींनो,

वर्ष 2022 मध्ये आपल्याला आपला वेग आणखी वाढवायचा आहे. कोरोनाची आव्हाने आहेतच , पण कोरोना भारताचा वेग रोखू शकत नाही.भारत संपूर्ण खबरदारी घेत पूर्ण दक्षतेने कोरोनाशीही लढेल आणि आपल्या राष्ट्रीय हिताच्या गोष्टीही पूर्ण करेल. आपल्या येथे म्हटले आहे,

''जहीहि भीतिम् भज भज शक्तिम्। विधेहि राष्ट्रे तथा अनुरक्तिम्॥

कुरु कुरु सततम् ध्येय-स्मरणम्। सदैव पुरतो निधेहि चरणम्''॥

म्हणजेच,

भीती, भय सोडून शक्ती आणि सामर्थ्य लक्षात ठेवावे लागेल, देशभक्तीची भावना सर्वोपरी ठेवावी लागेल. आपल्याला आपले ध्येय लक्षात ठेवून ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करावी लागेल. ‘राष्ट्र प्रथम ’ या भावनेने देशासाठी निरंतर प्रयत्न करणे, ही आज प्रत्येक भारतीयाची भावना बनत चालली आहे.

आणि म्हणूनच आज आपल्या प्रयत्नांमध्ये एकजूट आहे, आपल्या संकल्पांमध्ये सिद्धीसाठी अधीरता आहे.आज आपल्या धोरणांमध्ये सातत्य आहे, आपल्या निर्णयांमध्ये दूरदृष्टी आहे. देशाच्या अन्नदात्याला समर्पित असा आजचा हा कार्यक्रम हे त्याचेच उदाहरण आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी हा भारतातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनला आहे.प्रत्येक वेळी प्रत्येक हप्ता वेळेत, दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे हस्तांतरण, कोणत्याही मध्यस्थाशिवाय, कोणत्याही कमिशनशिवाय, भारतात असे घडू शकते याची कल्पनाही यापूर्वी कोणी केली नसेल.आजच्या रकमेचा समावेश केला तर शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख ८० हजार कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित झाली आहे.आज हा शेतकरी सन्मान निधी त्यांच्या छोट्या छोट्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या रकमेतून छोटे शेतकरी चांगल्या दर्जाचे बियाणे, चांगली खते आणि उपकरणे वापरत आहेत.

मित्रांनो,

देशातील लहान शेतकऱ्यांच्या वाढत्या सामर्थ्याला संघटीत स्वरूप देण्यासाठी आपल्या शेतकरी उत्पादक संघटना - एफपीओंची मोठी भूमिका आहे.

छोटा शेतकरी जो पूर्वी एकटा होता, त्याच्याकडे आता एफपीओच्या रूपात पाच मोठी सामर्थ्य आहेत. पहिले सामर्थ्य आहे- चांगला सौदा करणे ,म्हणजे भाव करण्याची ताकद. तुम्ही एकटे शेती करता तेव्हा काय होते हे तुम्हाला माहीत आहे? तुम्ही बियाण्यांपासून खतांपर्यंत सर्व काही विकत घेता तुम्ही किरकोळ खरेदी करता मात्र तुम्ही शेतमाल विकताना घाऊक विक्री करता. यामुळे खर्च जास्त होतो आणि नफा कमी होतो.पण हे चित्र आता एफपीओच्या माध्यमातून बदलत आहे. एफपीओद्वारे, शेतकरी आता शेतीसाठी आवश्यक वस्तू घाऊक खरेदी करतात आणि शेतमालाची किरकोळ बाजारात विक्री करतात.

एफपीओकडून शेतकऱ्यांना मिळालेले दुसरे सामर्थ्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर व्यापाराचे.एफपीओच्या स्वरूपात शेतकरी संघटित पद्धतीने काम करतात, त्यामुळे त्यांच्यासाठी शक्यताही प्रचंड आहेत.तिसरे सामर्थ्य आहे नवोन्मेष. अनेक शेतकरी एकत्र भेटतात, त्यामुळे त्यांच्या अनुभवांचीही परस्परांशी देवाणघेवाण होते. माहितीतही भर पडते. नव्या नव्या नवोन्मषासाठी मार्ग खुला होतो. एफपीओमधील चौथे सामर्थ्य म्हणजे जोखीम व्यवस्थापन. एकत्रितपणे, तुम्ही आव्हानांचे अधिक चांगले आकलन करू शकता आणि त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग तयार करू शकता.

आणि पाचवे सामर्थ्य म्हणजे बाजारानुसार बदल करण्याची क्षमता.बाजार आणि बाजारपेठेतील मागणी सतत बदलत असते.मात्र छोट्या शेतकऱ्यांना एकतर त्याची माहिती मिळत नाही किंवा ते या बदलानुरुप संसाधने जमवू शकत नाहीत.काहीवेळा सर्व लोक एकच पीक घेतात आणि नंतर असे कळते की ,आता त्याची मागणी कमी झाली आहे.मात्र एफपीओमध्ये तुम्ही केवळ बाजारपेठेनुसारच सज्ज राहात नाही तर स्वतः बाजारात नवीन उत्पादनाची मागणी निर्माण करण्याची ताकदही ठेवता.

मित्रांनो,

एफपीओचे हेच सामर्थ्य ओळखून आज आपले सरकार त्यांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन देत आहे.या एफपीओंना 15 लाख रुपयांपर्यंतची मदतही मिळत आहे.याचा परिणाम म्हणून, आज देशात सेंद्रिय एफपीओ समूह , तेलबिया समूह , बांबू समूह आणि मध एफपीओ सारखे समूह वेगाने वाढत आहेत.आज आपले शेतकरी 'एक जिल्हा एक उत्पादन' सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी देश-विदेशातील मोठ्या बाजारपेठा खुल्या होत आहेत.

मित्रांनो,

ज्या वस्तूंच्या गरजा देशातील शेतकरी सहज भागवू शकतो, अशा अनेक वस्तू आजही आपल्या देशात विदेशातून आयात केल्या जातात. खाद्यतेल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.आपण परदेशातून खाद्यतेल खरेदी करतो. आपल्याला इतर देशांना भरपूर पैसा द्यावा लागतो.देशातील शेतकऱ्यांना हा पैसा मिळाला पाहिजे, यासाठीच आमच्या सरकारने 11 हजार कोटींच्या तरतुदीसह राष्ट्रीय पाम तेल अभियान सुरू केले आहे.

मित्रांनो,

गेल्या वर्षी देशाने कृषी क्षेत्रात एकापाठोपाठ एक अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत.कोरोनाची आव्हाने असतानाही तुम्ही सर्वांनी मेहनतीने देशातील अन्नधान्य उत्पादन विक्रमी स्तरावर नेऊन दाखवले. गेल्या वर्षी देशातील धान्य उत्पादन 300 दशलक्ष टनांवर पोहोचले.फलोत्पादन-फुलोत्पादन -बागायती फूल -फूल शेतीमधील उत्पादन आता 330 दशलक्ष टनांच्यावर पोहोचले आहे.देशातील दूध उत्पादनातही ६-७ वर्षांपूर्वीच्या तुलनेत सुमारे ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकेच नाही तर शेतकरी विक्रमी उत्पादन घेत असेल तर देश हमीभावावर विक्रमी खरेदीही करत आहे.सिंचनातही, आम्ही 'पर ड्रॉप-मोअर क्रॉप' ला प्रोत्साहन देत आहोत.गेल्या काही वर्षांत पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून सुमारे ६० लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाद्वारे ठिबक सिंचनावर आणण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि समस्या कमी करण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना 1 लाख कोटींहून अधिक भरपाई देण्यात आली आहे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी केवळ 21 हजार कोटी रुपये प्रीमियमच्या रूपात भरले पण त्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई मिळाली.बंधु आणि भगिनींनो, पिकांचे अवशेष असोत की पेंढा असो, अशा प्रत्येक गोष्टीतून शेतकऱ्याला पैसा मिळाले पाहिजेत, यासाठीच्या प्रयत्नांनी जोर धरला आहे. कृषी अवशेषांपासून जैवइंधन तयार करण्यासाठी देशभरात शेकडो नवीन कारखान्यांची स्थापना केली जात आहे. 7 वर्षांपूर्वी,देशात जिथे दरवर्षी 40 कोटी लिटरपेक्षा कमी इथेनॉलचे उत्पादन होत होते, आज ते 340 कोटी लिटरपेक्षा अधिक झाले आहे.

मित्रांनो,

आज देशभर गोबर धन योजना सुरू आहे. याद्वारे गावांमध्ये शेणापासून जैववायू (बायोगॅस) बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बायोगॅसचा वापर वाढवण्यासाठी देशभरात संयंत्र उभारली जात आहेत.या संयंत्रांच्या माध्यमातून दरवर्षी लाखो टन दर्जेदार सेंद्रिय खतही तयार केले जाणार असून, ते शेतकऱ्यांना कमी खर्चात उपलब्ध होणार आहे.शेणाचे पैसे मिळाल्यावर दूध न देणार्‍या किंवा दूध देणे बंद केलेल्या जनावरांचे ओझे वाटणार नाही.सर्व देशाच्या कामी यावे, कोणीही निराधार राहू नये, ही देखील आत्मनिर्भरताच आहे.

मित्रांनो,

पशूंवर घरीच उपचार व्हावेत, घरीच कृत्रिम रेतनाची व्यवस्था असावी, यासाठी आज मोहीम चालवण्यात येत आहे. जनावरांच्या पायाच्या आणि तोंडाच्या आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण मोहीमही सुरू आहे.सरकारने कामधेनू आयोग देखील स्थापन केला आहे, दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या पायाभूत सुविधांसाठी हजारो कोटींचा विशेष निधी तयार केला आहे.आमच्या सरकारनेच लाखो पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेने जोडले आहे.

मित्रांनो,

धरणी ही आपली माता आहे आणि आपण पाहिले आहे की, जिथे धरणी मातेला वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही, ती भूमी नापीक झाली.आपली धरणी नापीक होण्यापासून वाचवण्याचा एक मोठा मार्ग म्हणजे रसायनमुक्त शेती.त्यामुळे गेल्या वर्षभरात देशाने आणखी एक दूरदर्शी प्रयत्न सुरू केला आहे.हा प्रयत्न आहे - नॅच्युरल फार्मिंग म्हणजेच नैसर्गिक शेतीचा.आणि तुम्ही याबाबत नुकतीच एक चित्रफीत पाहिली ,आणि मला ही चित्रफीत समाज माध्यमांवरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे.

आपण आपल्या जुन्या पिढ्यांकडून नैसर्गिक शेतीबद्दल खूप काही शिकलो आहोत.आपण आपले पारंपरिक ज्ञान व्यवस्थित करून त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची हीच योग्य वेळ आहे. आज जगात रसायनमुक्त धान्यांना मोठी मागणी आहे.आणि हे धान्य खरेदी करण्यासाठी खरेदीदार खूप मोठी किंमत द्यायला तयार आहेत. यात खर्च कमी आणि उत्पादन चांगले मिळते. ज्यामुळे अधिक फायदा सुनिश्चित होतो, रसायनमुक्त असल्याने आपल्या जमिनीचे आरोग्य, सुपीकता आणि खाणाऱ्यांचे आरोग्यही चांगले राहाते. आज मी तुम्हा सर्वांना आवाहन करेन की, तुमच्या शेतीला नैसर्गिक शेतीची जोड द्या, याचा आग्रह धरा.

बंधु आणि भगिनींनो,

नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे नवीन संकल्पांचा दिवस. हे संकल्प स्वातंत्र्याच्या अमृत काळात देशाला अधिक समर्थ आणि सक्षम बनवणार आहेत.

इथून आपल्याला नवनिर्मितीचा ,काही नवीन करण्याचा संकल्प करायचा आहे. शेतीतील नवनिर्मिती ही आज काळाची गरज आहे.नवनवीन पिके, नवीन पद्धती अवलंबायला आपल्याला मागेपुढे पाहायचे नाही. स्वच्छतेचा जो संकल्प आहे तो आपण विसरता कामा नये.स्वच्छतेची ज्योत गावा-गावात, शेता- शेतात ,सर्वत्र तेवत राहावी, हे आपल्याला सुनिश्चित करायला हवे. सर्वात मोठा संकल्प आहे - आत्मनिर्भरतेचा , स्थानिकांना बाजारपेठ मिळवून देण्याचा.आपल्याला भारतात बनवलेल्या वस्तूंना जागतिक ओळख द्यायची आहे.त्यासाठी भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक उत्पादनाला, प्रत्येक सेवेला आपण प्राधान्य देणे आवश्यक आहे.

 आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपली आजची कृती पुढील 25 वर्षांच्या विकासाच्या प्रवासाची दिशा ठरवेल.या प्रवासात आपल्या सर्वांचा घाम असेल , प्रत्येक देशवासीयाची मेहनत असेल. मला पूर्ण विश्वास आहे की, आपण सर्वजण भारताला त्याची गौरवशाली ओळख परत मिळवून देऊ आणि देशाला नव्या उंचीवर नेऊ. आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करणे हा असाच एक प्रयत्न आहे.

तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा 2022, या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

खूप - खूप धन्यवाद !

***

MaheshC/Radhika/Sonal/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786914) Visitor Counter : 374