शिक्षण मंत्रालय
100 दिवसांच्या 'पढे भारत' वाचन अभियानाला धर्मेंद्र प्रधान करणार आरंभ
Posted On:
31 DEC 2021 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2021
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान येत्या 1 जानेवारी 2022 पासून 100 दिवसांच्या 'पढे भारत' या वाचन अभियानाचा आरंभ करणार आहेत. हे 100 दिवसांचे अभियान विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे, कारण त्यामुळे त्यांची कल्पकता, तर्कशुद्ध विचार, शब्दभांडार आणि तोंडी आणि लिखित व्यक्त होण्याच्या क्षमतांचा विकास होऊ शकेल. त्यांच्या सभोवतालच्या आणि वास्तविक जीवनशैलीशी नाते जोडण्यासही हे सहाय्यक ठरेल.
बालवाडी ते आठवी इयत्तेत शिकत असलेली मुले या अभियानाचा भाग असतील. हे अभियान 1 जानेवारी 2022 ते 10 एप्रिल 20 22 पर्यंत 100 दिवस (14 आठवडे) आयोजित केले जाईल.या वाचन अभियानात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर मुले, शिक्षक, पालक , समाज , शैक्षणिक प्रशासक इत्यादींसह सर्व हितसंबंधितांचा सहभाग अपेक्षित आहे.
100 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत 14 आठवडे, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक वयोगटातील समूहाला योग्य अशा साप्ताहिक स्वाध्यायांची रचना करण्यात आली असून वाचन आनंददायी व्हावे आणि वाचनानंदाशी जीवनभर नाळ जोडली जावी,या हेतूने त्यांची आखणी केली आहे.
या अभियानातील स्वाध्यायांसाठी वयानुरुप व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून त्यांचे साप्ताहिक कॅलेंडर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहे. शिक्षक, पालक, मित्र, भावंडांच्या किंवा इतर कौटुंबिक सदस्यांच्या मदतीने मुलांना यांचा सराव करता येऊ शकतो. अभियान प्रभावी होण्यासाठी रचना केलेले स्वाध्याय सरल आणि आनंददायी ठेवले गेले आहेत; जेणेकरुन शाळा बंद असली तरी घरी ,मित्रमैत्रिणी, आणि भावंडांच्या मदतीने देखील ते सहजपणे करता येतील.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1786596)
Visitor Counter : 387