पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 28 DEC 2021 11:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2021

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.

मित्रांनो,

कानपूरच्या लोकांची जी मानसिकता  आहे, जो कानपूरी अंदाज आहे, त्यांच्याकडे जो हजरजबाबीपणा आहे, त्याची तुलनाच करता येत नाही. हे ‘ठग्गू के लड्डू’ यांच्या इथे काय लिहिलेले असते? बरोबर, ‘‘ठग्गू के लड्डू’ इथेच ते लिहिले आहे. ‘असा कोणीही सख्खा नाही... असे  कोणीही सख्खेसंबंधी नाही.... आता आजपर्यंत तुम्ही हेच म्हणत आले आहात. परंतु मी तर असे म्हणेन, आणि ज्यावेळी मी जी गोष्ट म्हणतो त्याचा मी अनुभव घेतला आहे. हे कानपूरच आहे, जिथे आलेला असा  कोणीच नाही की, त्याला इतके प्रेम, माया येथे मिळते. मित्रांनो, ज्यावेळी मी संघटना बांधणीचे काम करीत होतो, त्यावेळी मी तुम्हा मंडळींमध्ये वारंवार येत होतो आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी ऐकतही होतो. - झाडे रहो कलट्टर- गंज !!! झाडे रहो कलट्टर- गंज !!! आजकाल तुम्हीही अजून हे वाक्य बोलत असणारच किंवा नवीन पिढीतले लोक ते विसरून गेले असावेत

मित्रांनो,

आज मंगळवार आहे आणि पनकीवाले हनुमंताच्या आशीर्वादाने आज उत्तर प्रदेशच्या विकासाच्या वाटचालीमध्ये आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला जात आहे. आज कानपूरला मेट्रोची सुविधा मिळत आहे. त्याचबरोबर बीना शुद्धीकरण प्रकल्पही आता कानपूरला जोडला गेला आहे. यामुळे कानपूरबरोबरच उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांना पेट्रोलियम उत्पादने आता अधिक सुलभतेने मिळू शकणार आहेत.  या दोन्ही प्रकल्पांसाठी  तुम्हा सर्वांना, संपूर्ण उत्तर प्रदेशचे अभिनंदन! तुम्हा सर्व मंडळींमध्ये येण्याआधी आयआयटी कानपूरमध्ये माझा कार्यक्रम होता. मी पहिल्यांदा मेट्रो प्रवास करून कानपूरवासियांची मनोभावना, त्यांचा उत्साह, उमंग यांचा साक्षीदार बनू इच्छित होतो. म्हणूनच मी मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. हा माझ्यासाठी खरोखरीच माझ्या स्मरणात कायम राहील.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशमध्ये ज्या लोकांनी आधी सरकार चालवले आहे, त्यांनी काळाचे महत्व ओळखले नाही. 21 व्या युगाच्या काळात उत्तर प्रदेशची अतिशय वेगाने प्रगती व्हायला हवी होती. तो अमूल्य काळ, त्या महत्वाच्या संधी आधीच्या सरकारने वाया घालवल्या. त्यांचे प्राधान्य उत्तर प्रदेशचा विकास करण्याला नव्हते. त्यांची कटिबद्धता उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी नव्हती. आज उत्तर प्रदेशमध्ये जे डबल इंजिनाचे सरकार काम करीत आहे. मात्र मागच्या काळामध्ये राज्याचे जे काही नुकसान झाले आहे, त्याची भरपाई करण्याचे काम हे डबल इंजिनांचे सरकार करीत आहे. आज देशातला सर्वात मोठ्या लांबीचा द्रूतगती मार्ग उत्तर प्रदेशात बनतोय. आज देशातली पहिली ‘रिजनल रॅपिड ट्रांजिट सिस्टिम’ उत्तर प्रदेशात तयार होत आहे. मालवाहतूक समर्पित कॉरिडॉरचे केंद्रही उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ज्या उत्तर प्रदेशला कधी काळी अवैध हत्यारांची गँग म्हणून बदनाम केले गेले होते, त्याच राज्यात आता देशाच्या सुरक्षेसाठी डिफेन्स कॉरिडॉर बनत आहे. मित्रांनो, म्हणूनच उत्तर प्रदेशातले लोक म्हणत आहेत की - ‘फरक स्पष्ट आहे’! हा फरक फक्त योजना-प्रकल्प यांच्यापुरताच मर्यादित नाही तर काम करण्याच्या पद्धतीमध्येही फरक आहे. डबल इंजिनाचे सरकार जे कोणते काम सुरू करते, ते पूर्ण करण्यासाठीही रात्रीचा दिवस करीत आहे. कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या निर्माणाचे काम आमच्या सरकारमध्ये सुरू झाले आणि आमच्याच सरकारने ते पूर्ण करून आज मेट्रोच लोकापर्णही होत आहे. पूर्वांचल द्रूतगती मार्गाचा शिलान्यास आमच्या सरकारने केला आणि आमच्याच सरकारने ते काम पूर्णही केले. दिल्ली -मेरट द्रूतगती मार्गाचा शिलान्यास आमच्या सरकारने केला आणि ते काम पूर्ण करून जनतेला समर्पित करण्याचे कामही आम्हीच केले आहे. आपल्यासाठी करण्यात आलेल्या अशा अनेक प्रकल्पाची नावे मी घेवू शकतो. याचा अर्थ पूर्व असो अथवा पश्चिम किंवा आमचे क्षेत्र असो, उत्तर प्रदेशातले प्रत्येक प्रकल्प अगदी नियोजित वेळेत पूर्ण होत आहेत. यामुळे देशाच्या पैशाचाही विनियोग योग्य प्रकारे होत आहे. यामुळे देशातल्या लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. तुम्ही मला सांगा, कानपूर लोकांना वाहतुकीच्या कोंडीची समस्या किती तरी वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. तुमचा कितीतरी वेळ यामुळे वाया जात होता. तुमचा कितीतरी पैसा वाया जात होता. आता आज पहिल्या टप्प्यातल्या 9 किलोमीटर लांबीची ही मेट्रो वाहिनी सुरू झाल्यानंतर वाहतुकीची समस्या दूर होण्यास प्रारंभ होणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेले आव्हान असतानाही दोन वर्षांच्या आतच ही मेट्रोवाहिनी सुरू होत आहे, ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे. 

मित्रांनो,

स्वातंत्र्यनंतर अनेक दशकांपर्यंत आपल्या देशामध्ये एकाच प्रकारचा विचार केला जात आहे, तो म्हणजे, जे काही नवीन होईल ते चांगले होईल. आणि तीन-चार मोठ्या शहरांमध्येच त्या गोष्टी होतील. देशातल्या महानगरांशिवाय जी शहरे होती, त्यांना असेच वा-यावर सोडून दिले गेले. या शहरांमध्ये वास्तव्य करणा-या लोकांची ताकद कितीतरी मोठी आहे. त्यांना सुविधा देणे खूप आवश्यक आहे, या गोष्टी आधीचे सरकार चालविणा-या लोकांना कधीच समजू शकल्या नाहीत. या शहरांच्या आकांक्षा, इथे वास्तव्य करणा-या कोट्यवधी लोकांच्या आकांक्षांवर आधीच्या सरकारांनी अजिबात लक्ष दिले नाही. जे लोक आत्ताही असेच वातावरण तयार रहावे, असा विचार करीत आहेत, त्यांच्या दृष्टिकोन या शहरांचा विकास करण्याचा कधीच नव्हता. त्यांनी या शहरांचा कधी विचारच केला नाही. आता आमच्या सरकारने देशातल्या अशा महत्वाच्या शहरांच्या विकासकार्याला प्राधान्य दिले आहे. या शहरांसाठी चांगली संपर्क व्यवस्था विकसित व्हावी, तिथे उच्च शिक्षणाच्या चांगल्या संस्था असाव्यात, अखंड वीज पुरवठा या शहरांमध्ये व्हावा, पाण्याची समस्या असू नये, या शहरांची सांडपाण्याची व्यवस्था आधुनिक असावी, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. जर मी मेट्रोविषयी बोलायचे म्हटले तर कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातल्या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आग्रा आणि मीरत मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. इतर शहरांमध्येही मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. लखनौ, नोएडा आणि गाजियाबाद मेट्रोचा निरंतर विस्तार केला जात आहे. ज्या वेगाने उत्तर प्रदेशात मेट्रोचे काम होते आहे, ते अभूतपूर्व आहे. 

मित्रांनो,

आज मी जे आकडे देत आहे, ते आकडे जरा लक्षपूर्वक ऐकावेत. ऐका, जरा लक्ष देवून ऐकावे. असे आहे पाहा, वर्ष 2014च्या आधी उत्तर प्रदेशमध्ये जितक्या मेट्रो धावत होत्या तो एकूण मार्ग 9 किलोमीटर लांबीचा होता. सन 2014 पासून 2017 पर्यंत या मधल्या काळामध्ये मेट्रो मार्गाची लांबी वाढून ती एकूण 18 किलोमीटर झाली. आज कानपूर मेट्रो धरून उत्तर प्रदेशमध्ये 90 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे मेट्रो मार्ग  तयार झाले आहेत. आधीचे सरकार कसे काम करत होते आणि आज योगी यांचे सरकार कसे काम करीत आहे, हे यावरून लक्षात येते, म्हणूनच आज उत्तर प्रदेश म्हणतोय की- फरक स्पष्ट आहे!

मित्रांनो,

2014च्या आधी संपूर्ण देशामध्ये फक्त पाच शहरांमध्ये मेट्रोची सुविधा होती. याचा अर्थ मेट्रो रेल फक्त महानगरांमध्येच होती. आज एकट्या उत्तर प्रदेशातल्या पाच शहरांमध्ये मेट्रो सुरू आहे. आज देशातल्या 27 शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. या शहरांमध्ये वास्तव्य करणा-या गरीब कुटुंबांना, मध्यम वर्गीयांना, आज मेट्रो रेलची सुविधा मिळत आहे. जी सुविधा आधी केवळ महानगरांमध्ये होती, ती आता अनेक शहरांना मिळत आहे. शहरी गरीबांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले आहेत, त्यामुळे दोन क्रमांकाच्या, तिस-या क्रमांकाच्या शहरांमधल्या युवकांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर डबल इंजिनाचे सरकार बनल्यानंतर विकास कामांना अतिशय वेग आला आहे.

मित्रांनो,

कोणताही देश असो अथवा राज्य, असंतुलित विकास केला गेला तर ते कधीच पुढे जावू शकत नाही. अनेक दशकांपासून आपल्या देशामध्ये अशीच स्थिती आहे की, देशातल्या एका विशिष्ट भागाचा विकास झाला आणि दुसरा भाग मागे पडला. राज्यांच्या स्तरावर, समाजाच्या स्तरावर अशी असमानता दूर करणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच आमचे सरकार सबका साथ, सबका विकास हा मंत्र जपत काम करीत आहे. समाजातल्या प्रत्येक वर्गाला, दलित- शोषित, पीडित-वंचित, मागास-आदिवासी अशा सर्वांना आमच्या सरकारच्या विविध योजनांचा अगदी योग्य प्रकारे लाभ मिळवून देत आहे. ज्या लोकांनी कोणी आधी विचारलेही नाही, अशा लोकांकडे आमचे सरकार विशेष लक्ष देत आहे. ज्या गोष्टींकडे आधी कोणी लक्षच दिले नाही, अशा गोष्टी करण्याकडे आमचे सरकार लक्ष केंद्रीत करत आहे.  

मित्रांनो,

शहरात राहणार्‍या गोरगरिबांकडेही पूर्वीच्या सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले होते. आज प्रथमच आमचे सरकार अशा शहरी गरिबांसाठी प्रामाणिकपणे काम करत आहे.  मी आपल्याला एक उदाहरण देतो.  2017 पूर्वीच्या 10 वर्षांत, उत्तरप्रदेशात शहरी गरिबांसाठी फक्त 2.5 लाख पक्की घरे बांधली गेली.  गेल्या साडेचार वर्षांत उत्तरप्रदेश सरकारने शहरी गरिबांसाठी 17 लाखांहून अधिक घरे मंजूर केली आहेत.  यापैकी साडेनऊ लाख तयार झाली असून उर्वरित काम जोरात सुरू आहे.

बंधू आणि भगिनिंनो,

आमच्या खेड्यातील अनेक लोक शहरांमध्ये काम करण्यासाठी येतात.  यापैकी बरेच लोक शहरांमध्ये येतात आणि रस्त्यावरील हातगाड्या,टपऱ्या  पदपथावर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात.  आज पहिल्यांदाच आपल्याच सरकारने या लोकांची काळजी घेतली आहे.  त्यांना बँकांची मदत सहज मिळावी, या लोकांनीही डिजिटल व्यवहार करावेत, या दिशेने आमचे सरकार काम करत आहे.  कानपूरच्या अनेक रस्त्यावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेचा लाभ झाला आहे.  यूपीमध्ये स्वनिधी योजनेअंतर्गत 7 लाखांहून अधिक विक्रेत्यांना 700 कोटींहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

बंधू आणि भगिनिंनो,

जनता जनार्दनाच्या गरजा समजून घेऊन त्यांची सेवा करणे ही आपल्या सर्वांवरची जबाबदारी आहे.  यूपीच्या गरजा समजून कार्यक्षम सरकार दमदारपणे काम करत आहे.  यापूर्वी, यूपीमध्ये कोट्यवधी घरांमध्ये नळाने पाणी पोहोचत नव्हते.आज आम्ही "घर घर जल मिशन"च्या माध्यमातून यूपीच्या प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्याची व्यवस्था करण्यात गुंतलो आहोत.  कोरोनाच्या या कठीण काळात आपल्याच सरकारने यूपीतील १५ कोटींहून अधिक लोकांना मोफत रेशन मिळण्याची व्यवस्था केली आहे.

मित्रांनो,

जे आधी सरकारमध्ये होते, त्यांची मानसिकता अशी होती,की चला  पाच वर्षे आपल्याला लॉटरी लागली आहे, युपीला जमेल तेवढे लुटून घेत जाऊ,लुटून घेऊ.  यूपीमध्ये आधीच्या सरकारांनी सुरू केलेल्या प्रकल्पांमध्ये कसे हजारो कोटींचे घोटाळे झाले, ते तुम्ही स्वतः पाहिले आहे.  या लोकांनी कधीच यूपीसाठी मोठे ध्येय ठेवून काम केले नाही, दूरदृष्टीने काम केले नाही.  त्यांनी कधीही स्वत:ला उत्तर प्रदेशातील जनतेची जबाबदारी घेतली नाही.  आजचे  सरकार यूपीला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहे.  डबल इंजिनच्या सरकारला मोठी उद्दिष्टे कशी ठरवायची आणि ती कशी पूर्ण करायची हे माहीत आहे.  वीज निर्मितीपासून पारेषणापर्यंत यूपी सुधारू शकेल याचा विचार तरी कोणी केला होता का?  वीज का गेली, याचा विचार लोक करत नसत.  तासंतास वीज नसते हेच  त्यांना माहीत असे.  शेजारच्या घरातही वीज नाही यावरच ते समाधानी असायचे.

मित्रांनो,

गंगेला जाऊन मिळणारा सिसामाऊसारखा विशाल, विक्राळ नालाही एक दिवस बंद होऊ शकतो, याची कल्पना तरी कोणी केली असेल का.  पण आमच्या सरकारने हे काम केले आहे.  बीपीसीएलच्या पनकी कानपूर डेपोची क्षमता 4 पटीने वाढवल्यानेही कानपूरला मोठा दिलासा मिळणार आहे.

बंधू आणि भगिनिंनो,

कनेक्टिव्हिटी आणि  कम्युनिकेशन यांच्याशी  संबंधित पायाभूत सुविधांसोबतच, गॅस आणि पेट्रोलियम पाइपलाइनच्या पायाभूत सुविधांवर केलेल्या कामाचाही यूपीला खूप फायदा झाला आहे.  2014 पर्यंत देशात फक्त 14 कोटी एलपीजी गॅस कनेक्शन्स होती, आज 30 कोटींहून अधिक गॅस कनेक्शन आहेत.  एकट्या यूपीमध्ये सुमारे 1 कोटी 60 लाख गरीब कुटुंबांना नवीन एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत.  7 वर्षात पाईप गॅसच्या जोडणीमधे (कनेक्शनमध्ये) 9 पट वाढ झाली आहे.  गेल्या काही वर्षांत पेट्रोलियम नेटवर्कच्या अभूतपूर्व विस्तार झाला असल्यामुळे हे घडत आहे.  बीना-पंकी मल्टी प्रॉडक्ट पाइपलाइनमुळे हे नेटवर्क आणखी मजबूत होईल.  आता कानपूरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना बीना रिफायनरीच्या पेट्रोल आणि डिझेलसारख्या उत्पादनांसाठी येणाऱ्या ट्रकवर अवलंबून राहावे लागणार नाही.  यामुळे उत्तर प्रदेशातील विकासाच्या इंजिनाला न थांबता ऊर्जा मिळत राहील.

मित्रांनो,

कोणत्याही राज्यात गुंतवणुकीसाठी उद्योगधंदे वाढण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम सर्वात जरुरीचे असतात.  उत्तर प्रदेशातील आधीच्या सरकारांनी माफियावादाचा वृक्ष एवढा फोफावला की त्याच्या छायेत सर्व उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले.  आता योगीजींच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य  पुन्हा आणले आहे.  त्यामुळे आता यूपीमध्येही गुंतवणूक वाढत आहे आणि गुन्हेगार आपला जामीन स्वतः रद्द करून तुरुंगात जात आहेत.  डबल इंजिन सरकार, आता पुन्हा एकदा यूपीमधील  औद्योगिक संस्कृतीला चालना देत आहे.  कानपूर येथे एक मेगा लेदर क्लस्टर(चामड्याची औद्योगिक वसाहत) मंजूर करण्यात आले आहे.  येथील तरुणांचे कौशल्य विकसित करण्यासाठी फाजलगंजमध्ये तंत्रज्ञान केंद्राचीही स्थापना करण्यात आली आहे.  डिफेन्स कॉरिडॉर असो किंवा  वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट स्कीम असो, कानपूरच्या आमच्या उद्योजक सहकाऱ्यांनाही त्यांचा फायदा होईल.

मित्रांनो,

व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही सातत्याने कार्य केले जात आहे.  नवीन युनिट्ससाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करून 15 टक्के करणे, जीएसटीचे दर कमी करणे, अनेक कायद्यांचे जाळे काढून टाकणे, फेसलेस असेसमेंट या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत.  नवीन क्षेत्रांना चालना देण्यासाठी सरकारने उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे.  सरकारने कंपनी कायद्यातील अनेक तरतुदीही गुन्हे करण्यापासून मुक्त केल्या आहेत, ज्यामुळे आमच्या व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या होत्या.

बंधू आणि भगिनिंनो,

ज्या पक्षांचे आर्थिक धोरण भ्रष्टाचाराचे आहे, ज्यांचे धोरण बाहूबली लोकांचा सन्मान करणारे आहे, ते उत्तर प्रदेशचा विकास करू शकत नाहीत.  त्यामुळे त्यांना प्रत्येक पावलावर अडचणी येतात, ज्यामुळे  समाजाची शक्ती वाढते, समाजाचे सबलीकरण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी उचललेल्या पावलांनाही त्यांचा विरोध आहे. तिहेरी तलाकच्या विरोधात कडक कायदा असो, किंवा मुला-मुलींच्या लग्नाचे वय समान करण्याचा मुद्दा असो, ते फक्त विरोध करतात.  होय, योगीजींच्या सरकारचे काम पाहून हे लोक नक्कीच म्हणतात की आम्हीच तर हे केले, ते तर आम्हीच केले.  मी विचार करत होतो की, पेट्या भरून, पूर्वी मिळालेल्या नोटा पाहून हे लोक अजूनही म्हणतील की हेच आम्हीही  केले आहे.

मित्रांनो,

तुम्ही कानपूरचे लोक तर उद्योग-व्यवसायाला,धंद्यांना  चांगल्या प्रकारे समजून घेता.  2017 पूर्वी    संपूर्ण यूपीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार पसरवला होता, तेच पुन्हा सर्वांसमोर आले आहे.  पण आता ते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत आणि श्रेय घेण्यासाठी पुढे येत नाहीत.  संपूर्ण देशाने पाहिलेला नोटांचा डोंगर हे त्यांचे कर्तृत्व आहे, हे त्यांचे सत्य आहे.  यूपीचे लोक हे सगळं बघत आहेत, समजून आहेत.  म्हणूनच ते यूपीचा विकास करणाऱ्यांसोबत, यूपीला नव्या उंचीवर नेणाऱ्यांसोबत आहेत.  बंधू आणि भगिनींनो, आज एवढी मोठी देणगी तुमच्या चरणी सोपवत असताना, अनेक प्रकारच्या आनंदाने हे वातावरण भारलेले आहे.आजचा हा महत्वपूर्ण  क्षण, यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!  खूप खूप धन्यवाद.  

भारत माता की जय

भारत माता की जय

भारत माता की जय

खूप खूप धन्यवाद.


* * *

S.Thakur/M.Iyengar/Suvarna/Sampada/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1786089) Visitor Counter : 267