पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 डिसेंबरला उत्तराखंडच्या दौऱ्यावर, 17500 कोटी रुपयांच्या 23 प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार


लखवार बहुपयोगी प्रकल्पाची संकल्पना पहिल्यांदा 1976 साली मांडण्यात आली त्यानंतर कित्येक वर्षे काम स्थगितच होते , या प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते रचली जाणार, प्रकल्पाचा लाभ सहा राज्यांना होणार

रस्ते बांधणी क्षेत्रातील 8700 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान करणार; दुर्गम, ग्रामीण आणि सीमाभागात रस्त्यांचे दळणवळण वाढवण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होण्यास यामुळे मदत; कैलास मानसरोवर यात्रेसाठीच्या वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार

उधम सिंह नगर इथे एम्स हृषीकेश उपग्रह केंद्र आणि पिथोरागढ इथल्या जगजीवन राम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कोनशिला रचली जाणार, देशाच्या सर्व भागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला अनुसरून या संस्थांची स्थापना

काशीपूर इथे सुगंधी फुलांचा बगिचा आणि सितारगंज इथे प्लॅस्टिक औद्योगिक पार्कची कोनशिला देखील पंतप्रधानांच्या हस्ते रचली जाणार, त्याशिवाय, गृहनिर्माण, सार्वजनिक स्वच्छता आणि राज्यभरात पेयजल सुविधा देणाऱ्या योजनांचेही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

Posted On: 28 DEC 2021 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2021 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 डिसेंबर 2021 रोजी,  उत्तराखंडच्या हलद्वानी गावाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते, 17 हजार 500 कोटी रुपयांच्या 23 छोट्या-मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. हे 23 प्रकल्प उत्तराखंड राज्यातील विविध क्षेत्रातले आहेत. यात सिंचन, रस्ते, गृहनिर्माण, आरोग्यविषयक पायाभूत योजना. उद्योग, सार्वजनिक स्वच्छता , पेयजल, इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात सहा प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून, यात अनेक रस्ते विस्तार प्रकल्प आहेत.पिथोरागढ इथला जलविद्युत प्रकल्प, नैनिताल इथली सांडपाणी व्यवस्था सुधारणारे प्रकल्प यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांची एकूण किंमत 3400 कोटी रुपये इतकी आहे.

 पंतप्रधानांच्या हस्ते, लखवार बहुउपयोगी प्रकल्पाचा कोनशिला समारंभही होणार आहे. सुमारे 5750 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना पहिल्यांदा 1976 साली मांडण्यात आली. मात्र त्यानंतर तिचे पुढे काहीही झाले नाही. देशात, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले, रखडलेले प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करावेत, या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार,या प्रकल्पाची कोनशिला रचली जात आहे. राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या या प्रकल्पामुळे 34,000 हेक्टर अतिरिक्त भूमी सिंचनाखाली येणार आहे. तसेच 300 मेगावॉट जलविद्युत निर्मिती होणार आहे. तसेच उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान या सहा जिल्ह्यात, पिण्याचे पाणी पोहचणार आहे. त्याशिवाय, रस्ते बांधणी क्षेत्राशी निगडीत 8700 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

ज्या प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे, त्यात, 85 किलोमीटर लांबीच्या मुरादाबाद-काशीपूर मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश असून, 4000 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. तसेच, गदरपूर-दिनेशपूर-मडकोटा-हलद्वानी या 22 किमी लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण आणि 18 किमी लांबीच्या किकचा-पंतनगर दरम्यान 18 किमीचा मार्ग बांधला जाणार आहे त्याशिवाय, उधम सिंह नगर इथे 8 किमी लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग 109D चे बांधकाम, 175 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करुन केले जाणार आहे. या रस्ते प्रकल्पामुळे, गढवाल, कुमाऊं आणि तेराई प्रदेशातील दळणवळण व्यवस्थेत सुधारणा होणार आहे. त्याशिवाय, उत्तराखंड आणि नेपाळ दरम्यानची संपर्क व्यवस्थाही मजबूत होईल. दळणवळण व्यवस्थेत झालेल्या सुधारणांचा लाभ रुद्रपूर आणि लालकुआ इथल्या औद्योगिक प्रदेशांना मिळेल. तसेच सुप्रसिद्ध जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाकडे जाणाऱ्या वाहतुकीत सुधारणा होईल.

त्याशिवाय, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत, विविध रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यात, 1157 किमी लांबीच्या 133 ग्रामीण रस्त्यांचाही समावेश असून 625 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करुन, हे रस्ते बांधले जाणार आहेत. तसेच 450 कोटी रुपयांच्या निधीतून, 151पूल बांधले जाणार आहेत.

पंतप्रधान उद्घाटन करणार असलेल्या रस्ते प्रकल्पात 99 किमी नगीना ते काशीपुर (राष्ट्रीय महामार्ग -74) चे रुंदीकरण. यावर 2500 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच तीन सामरिक महत्वाच्या बारमाही रस्ते प्रकल्पात बनविण्यात आलेल्या तनकपूर – पिथोरागड रस्त्याचे (राष्ट्रीय महामार्ग 125) 780 कोटी रुपये खर्चून केलेले रुंदीकरण. हे तीन रस्ते आहेत च्युरानी ते अंचोली (32 किलोमीटर), बिलखेत ते चंपावत (29 किलोमीटर) आणि तिलोन ते च्युरानी (28 किलोमीटर).  या रस्त्यांचे रुंदीकरण केवळ दुर्गम भागांत दळणवळणालाच चालना देणार नाही, तर या भागात पर्यटन, उद्योग आणि व्यावसायिक गतिविधींना देखील चालना देईल. सामरिक महत्वाच्या तनकपूर - पिथोरागड रस्ता आता बारमाही खुला राहील ज्यामुळे सैन्याला सीमा भागात विनाअडथळा हालचाली करता येतील तसेच कैलास मानसरोवर यात्रेसाठीच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.

देशाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांचा विस्तार करणे आणि देशाच्या सर्व भागातील लोकांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी, पंतप्रधान अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थाच्या ऋषिकेश उपकेंद्राची उधम सिंग नगर जिल्ह्यात आणि जगजीवन राम वैद्यकीय महाविद्यालय, पिथोरागड येथे पायाभरणी करतील.  या दोन रुग्णालयांच्या उभारणीवर अनुक्रमे 500 कोटी आणि 450 कोटी रुपये खर्च होणार आहेत. सुधारित वैद्यकीय पायाभूत सुविधांचा लाभ केवळ कुमाऊ आणि तराई क्षेत्रातील नागरिकांनाच नाही तर, उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील नागरिकांना देखील होणार आहे.

उधम सिंग नगर जिल्ह्यातील सितारगंज आणि काशीपुर येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधल्या जाणाऱ्या 2400  घरांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. पंतप्रधान घरकुल योजना (शहरी) अंतर्गत एकूण 170 कोटी रुपये खर्चून ही घरे बांधण्यात येतील.

राज्यातील ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी, राज्यातील 13 जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत 73 पाणीपुरवठा योजनांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. या योजनांचा एकूण खर्च 1250 कोटी रुपये असणार आहे आणि याचा लाभ राज्याच्या 1.3 लाखांहून अधिक ग्रामीण कुटुंबांना होईल. तसेच, हरिद्वार आणि नैनिताल या शहरी भागात शुध्द पाण्याचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी या शहरांसाठीच्या पाणी पुरवठा योजनांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल. या योजनांमध्ये हरिद्वारमध्ये जवळपास 14500 नळ जोडण्या तसेच हलद्वानी मध्ये 2400 पेक्षा जास्त नळ जोडण्या दिल्या जातील. याचा लाभ हरिद्वारच्या जवळपास एक लाख नागरिकांना तसेच हलद्वानीच्या जवळपास 12000 लोकांना मिळेल.

प्रत्येक भागाच्या अंगभूत संभाव्य क्षमतांना वाव देण्यासाठी नवनवे मार्ग तयार करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला अनुसरून काशीपुर येथे 41 एकर मध्ये सुगंधी फुलांचा बगीचा तसेच सितारगंज येथे 40 एकरवर प्लास्टिक औद्योगिक पार्क प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येईल. राज्य पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास मंडळ, उत्तराखंड मर्यादित, हे दोन्ही प्रकल्प विकसित करेल. यावर एकूण 100 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. सुगंधी फुलांच्या बगीच्यात उत्तराखंडच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीत फुलशेतीच्या प्रचंड क्षमतेचा वापर करुण्यात येईल. राज्याची औद्योगिक शक्ती निर्माण करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्लास्टिक औद्योगिक पार्क उभारला जाईल.

रामनगर, नैनिताल येथे बांधण्यात आलेल्या 7 दशलक्ष लिटर प्रती दिन आणि 1.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेच्या दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच उधम सिंग नगर येथे 200 कोटी रुपये खर्चाच्या नऊ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येईल. तसेच नैनिताल येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या 78 कोटी रुपये खर्चाच्या अद्यायावातीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल.

पिथोरागड जिल्ह्यातील मुन्सायरी येथे उत्तराखंड जल विद्युत निगम लिमिटेड ने नदीच्या प्रवाहावर बांधलेल्या 5 मेगावॉट ख्सामातेच्या सुरिनगड - II या जलविद्युत प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 50 कोटी रुपये आहे.
 

* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1785932) Visitor Counter : 280