मंत्रिमंडळ

भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि पोलिश चेंबर ऑफ स्टेटयूटरी ऑडीटर्स दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Posted On: 22 DEC 2021 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, भारतीय सनदी लेखापाल संस्था (ICAI) आणि पोलिश चेंबर ऑफ स्टेटयूटरी ऑडीटर्स (PIBR) दरम्यानच्या सामंजस्य कराराला आज मंजूरी देण्यात आली. या करारामुळे, दोन्ही देशात, सदस्य व्यवस्थापन, व्यावसायिक नीतीमूल्ये, तंत्रज्ञान विषयक संशोधन, सीपीडी, व्यवसायिक लेखा प्रशिक्षण, लेखापरीक्षण गुणवत्तेवर देखरेख, लेखा ज्ञानाविषयीची अद्ययावत माहिती, व्यवसायिक आणि बौद्धिक विकास इत्यादी विषयात, दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य निर्माण होईल. 

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे :

या प्रस्तावित सामंजस्य कराराचा उद्देश, लेखा आणि लेखा परीक्षण या क्षेत्रातले अध्ययन तसेच अभिनव पद्धतींचा वापर शिकण्यासाठी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे हा आहे. यात, ब्लॉकचेन, स्मार्ट करार व्यवस्था, पारंपरिक लेखा पद्धतीपासून, क्लाऊड अकाऊंटिंग कडे परिवर्तन, यांचाही समावेश असेल. आयसीएआय आणि पीआयबीआर या दोन्ही संस्थांना पुस्तके, मासिके आणि इतर व्यावसायिक प्रकाशनांसह वेबसाईट्समधील माध्यमातून माहितीची देवघेव करता येईल, तसेच काळ्या पैशांचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत  एकत्रित काम करता येईल.

परिणाम:

आयसीएआय आणि पीआयबीआर यांच्यातील या सामंजस्य करारामुळे या संस्थेला युरोपात आपले पाय अधिक घट्टपणे रोवण्याची संधी मिळेल. तसेच, आयसीएआयच्या सदस्यांना, पोलंडमध्ये नजिकच्या भविष्यात अनेक व्यावसायिक सधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट आयसीएआय आणि पीआयबीआर यांच्यात दोन्ही देशांसाठी लाभदायक असे संबंध प्रस्थापित करणे, हे आहे. या करारामुळे, पोलंडबरोबरची आपली भागीदारी अधिक मजबूत होऊन लेखा व्यवसायातील सेवांच्या निर्यातीची संधी भारताला मिळेल.

भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे सदस्य जगभरातील विविध संस्थांमध्ये मध्य आणि उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि एखाद्या देशातील त्या त्या संस्थांच्या निर्णय/धोरण प्रक्रियांवर प्रभाव टाकू शकतात. 47 देशांतील आपल्या 73 प्रतिनिधी कार्यालये आणि शाखांच्या विस्तारलेल्या जाळ्याच्या माध्यमातून भारतीय सनदी लेखापाल जगभरात अमलात आणल्या जाणाऱ्या उत्तम पद्धतींची माहिती भारत सरकारला देण्यात महत्वाची भूमिका बजावण्यास कटिबद्ध आहे, जेणेकरून भारत सरकार त्या अमलात आणून भारतात विदेशी गुंतवणूक करण्याला आणि कार्यालये सुरु करण्याला प्रोत्सहान देऊ शकेल. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारतीय सनदी लेखापाल संस्था आणि द पोलिश चेंबर ऑफ स्टॅट्यूटरी ऑडीटर्सला या सामंजस्य कराराचा फायदा होईल.

पार्श्वभूमी:

भारतातील सनदी लेखापालांच्या व्यवसायाचे नियमन करण्यासाठी भारतीय सनदी लेखापाल संस्था, ही सनदी लेखापाल कायदा, 1949 अंतर्गत स्थापन झालेली संस्था आहे. जगभरात वाखाणल्या केलेल्या सनदी लेखापाल व्यवसायात शिक्षण, व्यावसायिक विकास, उच्च लेखा, लेखा परीक्षण आणि नीतिमूल्यांचा दर्जा आणि सनदी लेखापाल व्यवसायाची वाढ करण्याच्या दिशेने मोलाचे योगदान दिले आहे. पोलिश चेंबर ऑफ स्टेटयूटरी ऑडीटर्स (PIBR) ही वैधानिक लेखापरीक्षकांची एक स्वायत्त संस्था असून, ती 1991 साली अस्तित्वात आली. तसेच, एक जानेवरी 1992 रोजी तिचे कार्यान्वयन सुरु झाले. 

 

* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1784327) Visitor Counter : 216