संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्यास सक्षम, अत्याधुनिक अशा नव्या पिढीच्या ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची डीआरडीओ नं केलेली पहिली चाचणी यशस्वी

Posted On: 22 DEC 2021 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 डिसेंबर 2021

 

डीआरडीओ- म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं आज म्हणजेच 22 डिसेंबर  2021 या स्वदेशी बनावटीच्या, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या अत्याधुनिक क्षेपणास्त्राची पहिलीच यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ ए.पी. जे. अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. प्रलय ने आपले लक्ष्य अचूकरित्या भेदले.

या नव्या क्षेपणास्त्राने इच्छित असे निम-बैलेस्टीक मार्गक्रमण पूर्ण करत, अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला. क्षेपणास्त्राची नियंत्रण, मार्गदर्शन आणि मिशन अल्गॉरिदम प्रणाली यावेळी सुविहितपणे कार्यरत होती. त्याशिवाय, उपप्रणालीचे कामही समाधानकारक होते. पूर्व किनाऱ्यावर स्थापन केलेल्या सर्व सेन्सर्सनी या क्षेपणास्त्राचा माग घेत, प्रत्येक टप्प्यावरच्या घटनांची नोंद केली आहे.

या क्षेपणास्त्रात भक्कम असे प्रोपेलंट रॉकेट मोटरसह इतर अनेक आधुनिक तंत्रज्ञान आहे. या क्षेपणास्त्राची 150 ते 500 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता असून मोबाईल लॉंचरद्वारे ते सोडता येईल. क्षेपणास्त्राला मार्गदर्शन करणाऱ्या प्रणालीत, अत्याधुनिक दिशादर्शक प्रणाली तसेच विमान तंत्रज्ञानही समाविष्ट आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, या यशस्वी चाचणीसाठी  डीआरडीओ आणि त्यांच्याशी संबंधित सर्व चमूचे अभिनंदन केले आहे. अत्यंत जलदगतीने हे क्षेपणास्त्र विकसित करणे आणि या अत्याधुनिक जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कौतुकास्पद कामगिरी असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

डीआरडीओचे अध्यक्ष आणि संरक्षण विभागाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव, डॉ जी सतीश यांनीही आपल्या चमूचे कौतूक केले आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम अशा  या नव्या पिढीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त क्षेपणास्त्रामुळे सैन्यदलांना आवश्यक ते बळ मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1784191) Visitor Counter : 538