पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातील उमराहा ग्राम येथील स्वर्वेद महामंदिर धाम येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधानांची उपस्थिती


"भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होताना, मी देशवासियांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो"

"सदगुरु सदाफलदेवजींच्या अध्यात्मिक उपस्थितीला मी नमन करतो"

जेव्हा जेव्हा प्रतिकूल वेळ येते तेव्हा काळाचा प्रवाह बदलण्यासाठी आपल्या देशात काही संत उदयास येतात. हा भारत आहे ज्याच्या स्वातंत्र्याचा सर्वात मोठा नायक जग महात्मा म्हणून ओळखते.

"जेव्हा आपण बनारसच्या विकासाबद्दल बोलतो, तेव्हा तो संपूर्ण भारताच्या विकासाचा आराखडा तयार करतो"

"जुने जपत नावीन्य आत्मसात करत बनारस देशाला नवी दिशा देत आहे"

"आज स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि देशातील उत्पादने नवीन शक्ती प्राप्त करत आहेत, स्थानिक जागतिक होत आहेत"

Posted On: 14 DEC 2021 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील उमराहा ग्राम येथील स्वर्वेद महामंदिर धाम येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होते.

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी, काशी येथे महादेवाच्या चरणी भव्य 'विश्वनाथ धाम' काल समर्पित केल्याचे स्मरण केले. ते म्हणाले, "काशीची ऊर्जा  चिरकालिन तर आहेच त्याचबरोबर   ती नवे परिमाणही घेत आली आहे. गीता जयंतीच्या शुभमुहूर्तावर ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक झाले. या दिवशी कुरुक्षेत्राच्या रणांगणात जेव्हा सैन्य समोरासमोर भिडले, तेव्हा मानवाला योग, अध्यात्म आणि परमार्थ यांचे परम ज्ञान मिळाले. या प्रसंगी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होताना, गीता जयंतीनिमित्त मी तुम्हा सर्वांना आणि देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी सदगुरु सदाफलदेवजींना आदरांजली वाहिली. “मी त्यांच्या आध्यात्मिक उपस्थितीला नमन करतो. श्री स्वतंत्रदेव जी महाराज आणि श्री विज्ञानदेव जी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, जे ही परंपरा जिवंत ठेवत आहेत, नवीन आयाम देत आहेत”, पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले आणि कठीण काळात संत उदयास येण्याच्या भारताच्या विक्रमी परंपरेबद्दल बोलताना “आपला देश इतका अद्भुत आहे की, जेव्हा जेव्हा प्रतिकूल वेळ असते तेव्हा काळाचा प्रवाह बदलण्यासाठी येथे काही संत उदयास येतात. हा भारतच आहे ज्याच्या स्वातंत्र्याचा सर्वात मोठा नायक जग महात्मा म्हणून ओळखते,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी काशीचे वैभव आणि महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, बनारससारख्या शहरांनी अत्यंत कठीण काळातही भारताच्या अस्मितेची, कलेची, उद्योजकतेची बीजे जपली आहेत. “जिथे बीज असते, तिथूनच झाड वाढू लागते. आणि म्हणूनच, आज जेव्हा आपण बनारसच्या विकासाबद्दल बोलतो तेव्हा तो संपूर्ण भारताच्या विकासाचा आराखडा तयार करतो,” ते म्हणाले.

काशीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान काल रात्री उशिरा शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांच्या पाहणीसाठी गेले होते. बनारसमध्ये होत असलेल्या विकासकामांमध्ये आपला सातत्यपूर्ण सहभाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. "काल रात्री 12 वाजल्यानंतर, संधी मिळताच, मी माझ्या काशीत सुरू असलेले काम, पूर्ण झालेले काम पाहण्यासाठी पुन्हा बाहेर पडलो", ते म्हणाले. ते म्हणाले की, गडोलिया परिसरात झालेले सुशोभीकरणाचे काम पाहण्यासारखे झाले आहे. “मी तिथे अनेक लोकांशी संवाद साधला. मी मंडुआडीहमध्ये बनारस रेल्वे स्थानकही पाहिलं. या स्थानकाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. जुने जपत नावीन्य आत्मसात करत बनारस देशाला नवी दिशा देत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सद्गुरूंनी स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी दिलेल्या स्वदेशीच्या मंत्राचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, त्याच भावनेने देशाने ‘आत्मनिर्भर भारत अभियान ’ सुरू केले आहे. “आज देशातील स्थानिक व्यवसाय, रोजगार आणि उत्पादनांना नवीन बळ मिळत आहे. स्थानिक जागतिक होत आहे,” ते पुढे म्हणाले.

‘सबका प्रयास’ या भावनेने वाटचाल करत पंतप्रधानांनी आपल्या भाषणात प्रत्येकाला काही संकल्प करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, हे संकल्प असे असावेत की ज्यामध्ये सद्गुरूंचे संकल्प पूर्ण होतात आणि ज्यामध्ये देशाच्या आशा-आकांक्षाही सामावलेल्या असतात. हे असे संकल्प असू शकतात ज्यांना गती दिली जावी आणि पुढील दोन वर्षांत एकत्रितपणे पूर्ण केले जावे. पहिल्या संकल्पात पंतप्रधानांनी मुलींना शिक्षित करून त्यांच्यातील कौशल्य विकासाचा आग्रह धरला. “आपल्या कुटुंबाबरोबरच समाजात जे जबाबदारी घेऊ शकतात त्यांनी एक-दोन गरीब मुलींच्या कौशल्य विकासाची जबाबदारीही घेतली पाहिजे”, असा आग्रह त्यांनी धरला. ते म्हणाले, आणखी एक संकल्प पाणी बचतीचा असू शकतो. "आपल्या नद्या, गंगा जी आणि आपले सर्व जलस्रोत स्वच्छ ठेवायचे आहेत," असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1781452) Visitor Counter : 187