युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

ऑलिंपिकमध्ये भारताच्या प्रगतीला गती देण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून मिशन ऑलिंपिक सेलमध्ये(एमओसी) माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संख्येत दुपटीने  वाढ


अव्वल नेमबाज अंजली भागवत आणि बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे आणि हॉकीपटू विरेन रस्किन्हा यांचा समितीमध्ये समावेश

Posted On: 02 DEC 2021 6:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा  व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मिशन ऑलिंपिक सेल(एमओसी) या समितीला यापूर्वीपेक्षा अधिक जास्त प्रमाणात खेळाडू केंद्रित बनवण्यासाठी त्यातील प्रमुख सदस्य असलेल्या माजी खेळाडूंची संख्या दुप्पट केली आहे. मंत्रालयाच्या टॉप्स अर्थात टार्गेट ऑलिंपिक पोडियम या उपक्रमाच्या माध्यमातून एमओसी भारताच्या ऑलिंपिक तयारीला चालना देत असते. जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या प्रगतीला आणखी गतिमान करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या वेळच्या ऑलिंपिकच्या तयारीच्या चक्रातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. विद्यमान एमओसीमध्ये असलेल्या माजी खेळाडूंनी केलेल्या मार्गदर्शनाने टोक्यो ऑलिंपिक 2020 स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या प्रशिक्षणाला पाठबळ देण्यात आणि प्रत्यक्ष स्पर्धांमध्ये खेळाडूंची कामगिरी उंचावण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली आणि त्यामुळेच या खेळाडूंनी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये 7 पदकांची आणि पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये 19 पदकांची कमाई केली, असे ठाकूर यांनी सांगितले. नव्या एमओसीमध्ये भारताचे माजी फूटबॉलपटू बायचुंग भुतिया, जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीचे पदक जिंकणाऱ्या अंजू बॉबी जॉर्ज, भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार सरदारा सिंग, रायफल शूटिंगमधील अव्वल नेमबाज अंजली भागवत, माजी हॉकी कर्णधार आणि ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट चे सीईओ विरेन रस्किन्हा, टेबल टेनिस स्टार मोनालिसा मेहता आणि बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे यांचा समावेश असेल. त्याचप्रकारे शिडांच्या नौकानयन प्रकारातले ऑलिंपिकपटू आणि स्पोर्ट्स सायन्स विशेषज्ञ डॉ. मालव श्रॉफ एमओसीमध्ये कायम राहतील. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला,ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि टॉप्सचे सीईओ कॅप्टन पुष्पेंद्र गर्ग हे इतर माजी खेळाडू एमओसीमध्ये पुढेही कार्यरत असतील. केंद्रीय कॅबिनेट मंत्री अर्जुन मुंडा, अजय सिंग आणि ब्रिज भूषण शरण सिंग हे भारतीय तीरदांजी संघटना ,भारतीय मुष्टीयुद्ध महासंघ आणि भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष म्हणून एमओसीचे सदस्य असतील.

मिशन ऑलिंपिक सेलः बायचुंग भुतिया, अंजू बॉबी जॉर्ज, अंजली भागवत, तृप्ती मुरगुंडे, सरदारा सिंग, विरेन रस्किन्हा, मालव श्रॉफ, मोनालिसा मेहता, भारतीय ऑलिंपिक संघटना, भारतीय कुस्ती महासंघ, भारतीय तीरंदाजी संघटना आणि भारतीय मुष्टीयुद्ध महासंघ यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक(TEAMS), साई, संचालक(क्रीडा) MYAS, सीईओ, टॉप्स(निमंत्रक) आणि संयुक्त सीईओ, टॉप्स(सह निमंत्रक)

भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे(SAI) महासंचालक एमओसीचे अध्यक्षपद भूषवतील.

***

M.Chopade/S.Patil/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777346) Visitor Counter : 266