आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
2017-18 या वर्षासाठी राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज अहवाल जारी
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात सरकारी आरोग्य खर्चाचा हिस्सा 2013-14 मधल्या 1.15% वरून वाढून 2017-18 मध्ये 1.35%
एकूण आरोग्य खर्चात सरकारी आरोग्य खर्चाचा हिस्सा वाढून 40.8%
Posted On:
29 NOV 2021 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2021
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी आज 2017-18 या वर्षासाठी एनएचए अर्थात राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाज अहवाल जारी केला. राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राने सादर केलेला एनएचएचा हा पाचवा अहवाल आहे.
आरोग्यावरच्या सरकारी खर्चात वाढ होण्याचा कल दाखवण्या बरोबरच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरचा वाढता विश्वासही यातून दिसून येत आहे.
2017-18 साठीच्या एनएचए अंदाजात देशाच्या एकूण जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनात सरकारी आरोग्य खर्चाचा वाटा वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे यावर राजेश भूषण यांनी भर दिला. यामध्ये 2013-14 मधल्या 1.15% वरून वाढ होऊन 2017-18 मध्ये 1.35% झाला आहे. एकूण आरोग्य खर्चात सरकारी आरोग्य खर्चाचा हिस्साही वाढला आहे. सरकारी खर्च 2013-14 मधल्या 28.6% वरून 2017-18 मध्ये 40.8% झाला आहे.
2013-14 ते 2017-18 दरम्यान एकूण सरकारी खर्चाच्या रुपात सरकारचा आरोग्य खर्च वाढून 3.78% वरून 5.12% झाला आहे. देशात आरोग्य क्षेत्राला सरकारचे असलेले प्राधान्य यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.
2013-14 ते 2017-18 या काळात दर डोई सरकारी आरोग्य खर्चात 1042 वरून 1753 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. प्राथमिक आरोग्य सुविधांवर देण्यात येणारा अधिक भर, सरकारची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे दर्शवतो.
सामाजिक आरोग्य विमा कार्यक्रम, सरकारकडून वित्तीय पाठबळ लाभलेल्या विमा योजना, सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा वैद्यकीय खर्चाचा परतावा यासारख्या आरोग्यावरच्या सामाजिक सुरक्षा खर्चाच्या वाट्यातही वाढ झाली आहे.
* * *
S.Tupe/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776138)
Visitor Counter : 238