माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सुप्रसिद्ध गीतकार आणि सर्जनशील लेखक प्रसून जोशी यांचा इफ्फीकडून 'फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' सन्मान देऊन सत्कार

Posted On: 29 NOV 2021 1:52PM by PIB Mumbai

मुंबई | पणजी | 29 नोव्‍हेंबर 2021



“एक आसमान कम पड़ता है, और आसमान मंगवा दो...अर्थात …. “एक आकाश कमी पड़त असेल, तर आणखी एक आकाश आणा .....” प्रसिद्ध गीतकार आणि सर्जनशील लेखक प्रसून जोशी यांनी या पंक्ती उद्घृत केल्या.


गोवा येथे झालेल्या 52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात सुप्रसिध्द गीतकार प्रसून जोशी यांना यंदाचा 'फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यानंतर जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


भारताची विविधता खरोखरच आश्चर्यकारक असल्याची वस्तुस्थिती अधोरेखित करत प्रसून जोशी म्हणाले की जर सर्वच स्तरांना आपली कहाणी सांगण्यासाठी मंच उपलब्ध नसेल तर भारताची समृद्ध विविधता चित्रपटांमधून दाखवता येणार नाही. यंदाच्या 75 सर्जनशील प्रतिभावंताच्या निवडीच्या उपक्रमाच्या माध्यमातून अशा प्रकारचा मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी इफ्फीची प्रशंसा केली.


भावनोत्कट आणि उद्बोधक शब्दरचना असलेली चित्रपट गीते, टीव्हीवरील वैशिष्ट्यपूर्ण जाहिराती, समाजातील ताज्या घडामोडींवर भाष्य करणाऱ्या कथा यांसाठी ओळखले जाणारे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या प्रसून जोशी यांनी तरुण आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना या वयात निर्माण होणारी संभ्रमावस्था आणि येणारे वेगवेगळे विचार यांचे जतन करण्याचा आणि पुरेपूर आनंद घेण्याचा सल्ला दिला. तरुण कलावंतांनी आपल्या मनातील गोंधळाचा देखील आनंद घेतला पाहिजे. संभ्रमावस्था ही सर्वात जास्त सुपीक विचार निर्माण करणारी अवस्था आहे आणि त्याचा काही प्रमाणात त्रासही होतो. पण सर्वोत्तम आणि नावीन्यपूर्ण कल्पना सुचण्याचा संभ्रमावस्था हाच स्रोत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उत्तम चित्रपट बनवण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसतो, म्हणूनच असे शॉर्ट कट घेऊन आपल्याला काहीतरी घडवता येईल या भ्रमात चित्रकर्मींनी राहू नये, असे त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्या चित्रकर्मींना सांगितले.

"उत्तराखंडमधील अल्मोडासारख्या छोट्याशा शहरारातून  मी आलो आहे, माझ्या कामाला या पुरस्काराने ही एकप्रकारची मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार मी माझे प्रेरणास्त्रोत असलेल्या उत्तराखंडला आणि भारतातल्या सर्व युवा सर्जनशील मनांना समर्पित करतो. लहानशा गावांमधून शहरात काही वेगळे करून, मोठा प्रभाव पाडण्यासाठी मला प्रेरणा कदाचित त्यांच्यामुळेच मिळाली असेल.’’, अशा शब्दांत जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


प्रसून जोशी यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत 2001 मध्ये राजकुमार संतोषी यांच्या लज्जा या चित्रपटाद्वारे एक गीतकार म्हणून प्रवेश केला आणि त्यानंतर तारे जमीन पर, रंग दे बसंती, भाग मिल्खा भाग, नीरजा आणि मणीकर्णिका, दिल्ली 6 आणि अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

प्रसून जोशी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जाहिरात व्यावसायिक आहेत. सध्या ते जगातल्या सर्वात मोठ्या जाहिरात कंपन्यापैकी एक असलेल्या मॅककॅन वर्ल्डग्रुपचे अशिया-पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष आहेत आणि भारतामध्ये कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पहात आहेत. त्यांना कान्स येथे गोल्डन लायन पुरस्कार मिळाला आहे, तसेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्यावतीने त्यांना ‘यंग ग्लोबल लीडर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.




 

* * *

ST/CY



 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776063) Visitor Counter : 238