माहिती आणि प्रसारण मंत्रालय
52 व्या इफ्फीने नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, युवा प्रतिभावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले: इफ्फीच्या सांगता समारंभात अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन
पहिल्यांदाच इफ्फीमध्ये ओ टी टी मंचांचा उत्साहपूर्ण सहभाग, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचे गौरवोद्गार
“उद्याचे 75 युवा प्रतिभावान कलावंत काही वर्षांनी ईफ्फीच्या याच मंचावर चित्रपट क्षेत्रातील यशस्वी चित्रपट निर्माते-कलाकार म्हणून येतील, असा मला विश्वास वाटतो”- अनुराग ठाकूर
आपण ज्यावेळी आदिवासी गौरव सप्ताह साजरा करत आहोत अशावेळी, ईफ्फीमध्ये आसामच्या आदिवासी समुदायावरील दिमासा बोलीतील चित्रपट ‘सेमखोर’ प्रदर्शित होणे विशेष आनंददायी
पणजी, 28 नोव्हेंबर 2021
गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या ईफ्फीची सांगता होत असतांना, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणात, चित्रपट या अत्यंत प्रभावी माध्यमातून सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार केला.
गोव्यात श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आज, म्हणजेच 28 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या सांगता समारंभात बोलतांना ठाकूर यांनी, मुक्त-उत्साही चित्रपटनिर्मिती आणि उत्तम सिनेमांचा अमर्याद आनंद घेण्याच्या भावनेचा दरवर्षी या महोत्सवात सन्मान केला जातो, प्रत्येक वर्षी हा चोखंदळ आनंद अधिकाधिक दर्जेदार पद्धतीने सादर केला जातो, याबद्दल मनःपूर्वक कौतुक केले.

यंदाच्या 52 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ओ टी टी मंचांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आणि महोत्सवानेही यावेळी अनेक नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला दिसला , प्रेक्षकांच्या आवडीनिवडी, चोखंदळपणा लक्षात घेऊन कार्यक्रमाचे नियोजन झालेले आढळले, असे गौरवोद्गार ठाकूर यांनी काढले.
“या महोत्सवात, देशांमधील उत्तमोत्तम चित्रपटांचे इथे सादरीकरण झाले, आणि हे सहकार्य असेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होईल अशी आशा आहे असे ते म्हणाले .
इफ्फी हा महोत्सव प्रत्येक वर्षामागे आणखी मोठ्या स्वरुपात साजरा होत आहे अशी माहिती ठाकूर यांनी दिली आणि ते पुढे म्हणाले की, ‘52व्या इफ्फीमध्ये यावर्षी हायब्रिड स्वरुपातील महोत्सवात सुमारे 10,000 अभ्यागतांनी भेट दिली. यातील एकूण 234 चित्रपट दाखवले गेले ज्यांचा एकूण कालावधी 500 तासांहून अधिक तर ऑनलाईन चित्रपट पाहण्याचा तासांमधील कालावधीः 30,000 तासांपेक्षा जास्त होता आणि यामध्ये चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि जगभरातील सिनेरसिकांचा समावेश होता’.

यावर्षी इफ्फीमध्ये 5 हजार 500 प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमातून सहभागी झाले होते. यामध्ये जगभरातील चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि सिनेरसिकांचा समावेश होता असे त्यांनी सांगितले .
यंदा महोत्सवादरम्यान 75 भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन झाले , त्यामध्ये आजादी का अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी “India@75” या सेक्शनअंतर्गत निवडलेल्या 17 चित्रपटांचा समावेश होता असे ठाकूर यांनी सांगितले. देशातील युवा प्रतिभावंतांना शोधून प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही देशभरातून ‘उद्याचे 75 युवा प्रतिभावान कलावंत’ इथे महोत्सवात आमंत्रित केले होते. मला खात्री आहे, की याच आमंत्रित कलाकारांपैकी अनेक प्रतिभावंत कलाकार जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवतील आणि इफ्फी त्यांचे या मंचावर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकाराच्या रूपात स्वागत करेल.” असेही ते पुढे म्हणाले.
यंदाच्या इफ्फी महोत्सवाने चित्रपट रसिकांना 73 देशांमधील 148 परदेशी चित्रपटांच्या माध्यमातून एक आगळी वेगळी वैविध्यपूर्ण पर्वणी उपलब्ध करून दिली, असे ते म्हणाले.
या महोत्सवात 12 चित्रपटांच्या वर्ल्ड प्रिमिअरचे आणि 7 आंतरराष्ट्रीय प्रिमियरचे, 24 आशिया प्रिमियर आणि 74 इंडिया प्रिमियरचे आयोजन करण्यात आले असे ठाकूर यांनी सांगितले.

यंदा इफ्फीदरम्यान प्रथमच ब्रिक्स चित्रपट महोत्सव ही आयोजित करण्यात आला, ज्यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांतील चित्रपट दाखवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री. इस्तेवन स्झाबो आणि मार्टिन स्कॉरसेस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आल्याचे ठाकूर यांनी सांगितले. मेफिस्टो (1981) फादर (1966) यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींसाठी ओळखले गेलेले, गेल्या काही दशकांतील सर्व समीक्षकांकडून प्रशंसित असलेले इस्तेवन स्झाबो हे हंगेरियन चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. चित्रपट इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे मार्टिन स्कॉरसेस हे नव्या हॉलीवूड युगातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत.
सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती हेमा मालिनी आणि प्रसिद्ध गीतकार आणि सीबीएफसीचे अध्यक्ष श्री प्रसून जोशी यांना या महोत्सवात ‘ भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व 2021,’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले .

इफ्फीच्या इतिहासात प्रथमच, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, झी 5, वूट सोनी लाईव्ह , व्हायकॉम हे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म यात सहभागी झाले आणि या
ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर या महोत्सवातील एकाच वेळी 50 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन झाले तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने 10 मास्टरक्लासेस आणि प्रत्यक्ष संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मनोज बायपेयी, हृतिक रोशन, शूजित सरकार यांच्यासह चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अनुभव आणि कलेचे मार्गदर्शन यावेळी उदयोन्मुख चीत्रकार्मिना मिळाले असे ते म्हणाले. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मचा यापुढेही महोत्सवात सहभाग राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

सुवर्ण मयूर आणि महोत्सवातील अन्य पुरस्काराची घोषणा करताना ठाकूर यांनी सर्व विजेते आणि सह्भागींचे अभिनंदन केले आणि ते पुढे म्हणाले, “आमचे परदेशी पाहुणे आणि चित्रपट निर्मात्यांना मी सांगू इच्छितो, की तुम्ही जरूर पुन्हा पुन्हा भारतात या आणि चित्रपट निर्मिती नंतरच्या कामांसाठी इथल्या कुशल तंत्रज्ञांनी सुसज्ज अशा आधुनिक सुविधांचा लाभ घ्या.”, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
गेल्या 5 वर्षांत जगभरातील 27 देशांमधून भारतात चित्रीकरणाची परवानगी मागणारे 123 आंतरराष्ट्रीय अर्ज इथल्या चित्रपट सुविधा कार्यालयाने मंजूर केले आहेत. यामधून या उद्योगाला 400 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून 29 हजार कलाकार आणि तंत्रज्ञांना रोजगार मिळाला आहे. येणाऱ्या काळात AVGC संबंधित उद्योगांमधून याहून अधिक उत्पन्न व रोजगार मिळेल याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
येत्या काळात उत्तर प्रदेशात निर्माण होत असलेल्या फिल्म सिटी बद्दल बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, राज्यात एक हजार एकर क्षेत्रावर फिल्म सिटी ची उभारणी होत आहे. “या प्रकल्पासाठी योग्य व्यक्तींनी पुढे येऊन गुंतवणूक करण्याची प्रतीक्षा करत आहोत.”

केंद्रीय मंत्र्यांनी इफ्फीमध्य पहिल्यांदाच दिमासा भाषेत प्रदर्शित होत असलेल्या सेमखोर या चित्रपटाचे अभिनेता आणि दिग्दर्शक अॅमी बारुआ यांची प्रशंसा केली. “दिमासा भाषा शिकून घेण्यासाठी अॅमी बारुआ यांना आसाममधील आदिवासी समुदायाच्या वस्तीमध्ये एक वर्ष काढावे लागले. हा चित्रपट तयार करण्यासाठी, त्यांनी भल्या पहाटे चित्रीकरण पूर्ण करण्यासारख्या अनेक खडतर प्रक्रियांतून जाण्याचे धैर्य दाखविले. मी बारुआ यांचे त्यासाठी कौतुक करतो.”
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, सरकार यापुढे आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती याची आठवण केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना करून दिली. “केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2021 या दरम्यान आदिवासी गौरव सप्ताह साजरा केला. आणि याच महिन्यात आपल्याला आदिवासी समुदायावर आधारित चित्रपट पाहायला मिळतो आहे ही एक उत्तम घटना आहे,” असे ते म्हणाले. अॅमी बारुआ यांना संबोधित करत ते म्हणाले की यासाठी मी तुमचे कौतुक करतो.
एनएफडीसी अधिक बळकट करण्याचा संकल्प मंत्री महोदयांनी व्यक्त केला. "यातून , तुम्हाला असे चित्रपट बनवण्याची संधी मिळेल ज्यांच्या व्यावसायिक यशाबद्दल खात्री नाही . जगाला भारताची संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी आपण एकत्र काम करूया ."
2021 साठी “भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व- 2021’’ (इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर) पुरस्कार मिळवणारे प्रसून जोशी यांची त्यांनी प्रशंसा केली.
पुढल्या वर्षी याच वेळी आणि याच ठिकाणी म्हणजेच 20 ते 28 नोव्हेंबर 2022 दरम्यान गोव्यात इफ्फीचे आयोजन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
आपले भाषण संपवताना त्यांनी सर्व विद्यमान आणि होतकरू चित्रपट निर्मात्यांना शुभेच्छा दिल्या आणि उत्कृष्टतेची नवीन शिखरे गाठण्यासाठी संपूर्ण परिसंस्था मजबूत करण्यासाठी आणि उद्योगाला सुविधा पुरवण्यासाठी धोरण आखणी , उत्क्रांती आणि अंमलबजावणी पातळीवर सरकारकडून आवश्यक ते सहकार्य पुरवण्याची ग्वाही त्यांनी दिली.
* * *
JPS/Radhika/Shailesh/Sanjana/Sushma/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775931)