रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी डीएपी स्थिती , राज्यांमध्ये युरियाची उपलब्धता यांचा आढावा घेतला; देशात खतांचे भरपूर उत्पादन असून खतांचा तुटवडा नसल्याची दिली ग्वाही

Posted On: 23 NOV 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021

देशभरात खताचे भरपूर उत्पादन असून कुठलीही कमतरता नाही, अशी ग्वाही केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज राज्यांच्या कृषी मंत्र्यांबरोबर देशभरातील खतांच्या उपलब्धतेच्या स्थितीचा आढावा घेताना दिली. या आढावा बैठकीत 18 राज्यांचे कृषी मंत्री सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या खतांच्या गरजा आणि कृषी क्षेत्राचे व्यवस्थापन ही केंद्र आणि राज्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करून डॉ. मनसुख मांडविया यांनी गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांकडून डीएपीची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी राज्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सामूहिक प्रयत्नांमुळे केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालय आणि राज्यांमध्ये समन्वय निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांत अनेक राज्यांमध्ये डीएपीची मागणी वाढली असताना त्यांची खताची गरज पूर्ण केल्याबद्दल राज्यांच्या कृषी मंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले.

गेल्या दोन महिन्यांपासून कार्यरत असलेल्या खतांच्या डॅशबोर्डची तसेच विविध जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र यांच्यातील प्रभावी समन्वयासाठी 24*7 कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षाची माहिती त्यांनी राज्यमंत्र्यांना दिली . अधिक प्रभावी खत व्यवस्थापनासाठी ‘फर्टिलायझर डॅशबोर्ड’ वर दररोज मागणी /पुरवठ्याचे निरीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले. अगोदर नियोजन करणे आणि साप्ताहिक आधारावर जिल्हानिहाय आवश्यकतेचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. विविध जिल्ह्यांमध्ये मुबलक प्रमाणात शिल्लक आणि वापर न झालेले खत आहे. दैनंदिन नियमित देखरेख आम्हाला उत्तम व्यवस्थापनासाठी सूचित करेल. राज्यांनी सूचित केलेल्या मागणीच्या आधारे कोणत्याही विलंबाशिवाय केंद्र सरकार राज्यांना खतांचा पुरवठा करत आहेअसे त्यांनी नमूद केले. आगामी रब्बी हंगामात देशाची युरियाची मागणी र्ण करण्यासाठी केंद्र सरकार अथक प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, कृषी क्षेत्रासाठी पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी युरिया उद्योगांकडे (जसे की व्हिनिअर , प्लायवूड इ.) जाण्यापासून राज्यांनी आक्रमकपणे रोखणे महत्त्वाचे आहे. राज्य प्रशासनाच्या जागरूक आणि प्रभावी देखरेखीमुळे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमेपलीकडे खताची वाहतूक रोखण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. खताचा न्याय्य वापर व्हावा आणि अपव्यय तसेच गैरवापर कमी करण्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले.

आपणही पर्याय शोधूया आणि नॅनो युरिया आणि सेंद्रिय खत सारख्या पर्यायी खतांचा वापर करूया , जे जमिनीचे संरक्षण करतात आणि अधिक उत्पादन देतात करू ; सध्या वापरल्या जाणार्‍या प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात नॅनो युरियाचा वापर केला जाईल आणि उच्च पोषक वापर कार्यक्षमतेत योगदान देऊ , असे डॉ मनसुख मांडविया यांनी आढावा बैठकीत सांगितले. इफकोने नॅनो युरियाचे उत्पादन सुरू केले असून नॅनो डीएपीवर काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774297) Visitor Counter : 288