पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशातील झाशी येथे 'राष्ट्र रक्षा समर्पण पर्व' मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
Posted On:
19 NOV 2021 11:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2021
जौन धरती पै हमाई रानी लक्ष्मीबाई जू ने, आजादी के लाने, अपनो सबई न्योछार कर दओ, वा धरती के बासियन खों हमाऔ हाथ जोड़ के परनाम पौंचे। झाँसी ने तो आजादी की अलख जगाई हती। इतै की माटी के कन कन में, बीरता और देस प्रेम बसो है। झाँसी की वीरांगना रानी लक्ष्मी बाई जू को, हमाओ कोटि कोटि नमन।
कार्यक्रमाला उपस्थित उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, देशाचे संरक्षण मंत्री आणि या प्रदेशातील यशस्वी प्रतिनिधी आणि माझे अतिशय वरिष्ठ सहकारी राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, एमएसएमई राज्य मंत्री भानुप्रताप वर्मा, अन्य सर्व अधिकारीगण, एनसीसी कॅडेट्स आणि माजी विद्यार्थी गण आणि उपस्थित मित्रांनो !
झाशीच्या या शौर्य-भूमीवर पाय पडताच, असे कोण असेल ज्याच्या शरीरात वीजेचा संचार होत नसेल. असे कोण असेल इथे ज्याच्या कानांमध्ये ‘मी माझी झाशी देणार नाही ' ची गर्जना ऐकू येत नसेल. असे इथे कोण असेल ज्याला इथल्या मातीच्या कणापासून ते आकाशातील शून्यात साक्षात् रणचंडीचे दिव्य दर्शन होत नसेल! आणि आज तर शौर्य आणि पराक्रमाची पराकाष्ठा, आपल्या राणी लक्ष्मीबाई यांची जयंती देखील आहे. आज झाशीची ही भूमी स्वातंत्र्याच्या भव्य अमृत महोत्सवाची साक्षीदार बनत आहे.
आणि आज या भूमीवर एक नवीन सशक्त आणि सामर्थ्यशाली भारत आकार घेत आहे. अशावेळी आज झाशीमध्ये येऊन मला कसे वाटत आहे याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. मात्र मी पाहू शकतो राष्ट्रभक्तीचा जो ज्वर, ‘मेरी झाँसी’ ची मनोभावना माझ्या मनात दाटून येत आहे, ती बुंदेलखंडच्या प्रत्येकाची ऊर्जा आहे, त्यांची प्रेरणा आहे. या जागृत चेतनेची मला जाणीवही होत आहे आणि झाशीला बोलताना ऐकतही आहे. ही झाशी, राणी लक्ष्मीबाई यांची ही भूमी सांगत आहे - मी तीर्थ स्थली वीरांची, मी क्रांतिकारकांच्या काशीमध्ये मी आहे झाशी, मी आहे झाशी, मी आहे झाशी, माझ्यावर भारतमातेचा अनंत आशीर्वाद आहे, क्रांतिकारकांची काशी असलेल्या झाशीचे हे अथांग प्रेम मला नेहमी मिळत आहे आणि हे देखील माझे सौभाग्य आहे की मी झाशीच्या राणीचे जन्मस्थळ काशीचे प्रतिनिधित्व करतो. मला काशीची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. म्हणून, या भूमीवर येऊन मला एका विशेष कृतज्ञतेची अनुभूति होत आहे. एक विशेष आपलेपणा जाणवत आहे. या कृतज्ञ भावनेने मी झाशीला वंदन करतो, वीर-वीरांगनांची भूमी बुंदेलखंडला नतमस्तक होऊन प्रणाम करतो.
मित्रांनो,
आज, गुरुनानक देव जी यांची जयंती, कार्तिक पौर्णिमेबरोबरच देव-दिवाळी देखील आहे. मी गुरुनानक देव जी यांना वंदन करत सर्व देशवासियांना या पर्वांच्या हार्दिक शुभेच्छा देतो. देव-दिवाळीला काशी एका अद्भुत दैवी प्रकाशाने उजळून निघते. आपल्या शहीदांसाठी गंगा नदीच्या घाटांवर दिवे पेटवले जातात. गेल्या वर्षी मी देव दिवाळीला काशी मध्येच होतो आणि आज राष्ट्र रक्षा समर्पण पर्व निमित्त झाशीमध्ये आहे. मी झाशीच्या भूमीवरून आपल्या काशीच्या लोकांचे हार्दिक अभिनंदन करतो.
बंधू-भगिनींनो,
ही भूमी राणी लक्ष्मीबाई यांच्या निकटच्या सहयोगी असलेल्या वीरांगना झलकारी बाई यांची वीरता आणि सैन्य कुशलतेची देखील साक्षीदार आहे. मी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या त्या अमर वीरांगनेच्या चरणी देखील आदरपूर्वक वंदन करतो, माझ्याकडून श्रद्धांजलि अर्पित करतो. मी वंदन करतो या भूमीतून भारतीय शौर्य आणि संस्कृतीच्या अमर गाथा लिहिणाऱ्या चंदेल-बुंदेलांना, ज्यांनी भारताच्या वीरतेचे दर्शन घडवले. मी नमन करतो बुंदेलखण्डचा गौरव त्या वीर आल्हा-ऊदल यांना, जे आजही मातृभूमीच्या रक्षणासाठी त्याग आणि बलिदानाचे प्रतीक आहेत. असे कितीतरी अमर सैनिक, महान क्रांतिकारक, युगनायक आणि युग नायिका आहेत, ज्यांचे या झाशीशी विशेष नाते राहिले आहे, ज्यांनी इथून प्रेरणा घेतली आहे, मी त्या सर्व महान विभूतीना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. राणी लक्ष्मीबाई यांच्या सैन्यात त्यांच्याबरोबर लढणारे, बलिदान देणारे तुम्हा सर्वांचे तर पूर्वज होते. या भूमीच्या तुमच्यासारख्या सुपुत्रांच्या माध्यमातून मी त्या बलिदानांना देखील नमन करतो. वंदन करतो.
मित्रांनो,
आज मी झाशीचे आणखी एक सुपुत्र मेजर ध्यानचंद यांचेही स्मरण करू इच्छितो, ज्यांनी भारताच्या क्रीडा जगताला जगात ओळख मिळवून दिली. आता काही दिवसांपूर्वी आमच्या सरकारने देशाचे खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्याची घोषणा केली आहे. झाशीच्या सुपुत्राचा, झाशीचा हा सन्मान आपणा सर्वांना गौरवान्वित करतो.
मित्रांनो,
इथे येण्यापूर्वी मी महोबा मध्ये होतो, जिथे बुंदेलखंडच्या जल-समस्येवर उपाय शोधण्यासाठी पाण्याशी संबंधित योजना आणि अन्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची मला संधी मिळाली. आणि आता, झाशी येथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ मध्ये सहभागी होत आहे. हे पर्व आज झाशी मधून देशाच्या संरक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु करत आहे. आता इथे 400 कोटी रुपयांच्या भारत डायनॅमिक लिमिटेडच्या एका नवीन कारखान्याचे भूमिपूजन झाले आहे. यामुळे उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडोरच्या झाशी नोडला नवी ओळख मिळेल. झाशीमध्ये अँटी -टैंक क्षेपणास्त्रांसाठी उपकरणे तयार होतील, ज्यामुळे सीमांवर लढणाऱ्या आपल्या जवानांना नवी ताकद, नवा विश्वास मिळेल आणि याचा थेट परिणाम असा होईल की देशाच्या सीमा आणखी सुरक्षित होतील.
मित्रांनो ,
याचबरोबर, आज भारतात निर्मित स्वदेशी हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर प्रणाली देखील आपल्या सैन्याला समर्पित करण्यात आली आहे. हे असे हलके लढाऊ हेलिकॉप्टर्स आहे जे सुमारे साडे 16 हजार फूट उंचीवर उडू शकते. ही नवीन भारताची ताकद आहे, आत्मनिर्भर भारतचे यश आहे, ज्याची आपली ही वीर झाशी साक्षीदार बनत आहे.
मित्रांनो ,
आज एकीकडे आपल्या सैन्याची ताकद वाढत आहे, त्याचबरोबर भविष्यात देशाच्या रक्षणासाठी सक्षम युवकांसाठी जमीन देखील तयार होत आहे. ही 100 सैनिकशाळांची सुरुवात असेल, जी आगामी काळात देशाचे भविष्य सामर्थ्यवान हातांमध्ये देण्याचे काम करेल. आमच्या सरकारने सैनिक शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाला देखील सुरुवात केली आहे. 33 सैनिक शाळांमध्ये या सत्रापासून विद्यार्थिनींचे प्रवेश सुरु झाले आहेत. म्हणजेच आता सैनिक शाळांमधून राणी लक्ष्मीबाई सारख्या मुली बाहेर पडतील, ज्या देशाची सुरक्षेची आणि विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील. या सर्व प्रयत्नांबरोबरच एनसीसी माजी विद्यार्थी संघटना आणि एनसीसी कैडेट्ससाठी ‘नॅशनल प्रोग्राम ऑफ सिमुलेशन ट्रेनिंग’, हे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ ची भावना साकार करतील आणि मला आनंद आहे की आज संरक्षण मंत्रालयाने, एनसीसीने मला माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
मला पुन्हा एकदा एनसीसीचा तो रुबाब, एनसीसीचा एक आब याला जोडण्यात आले. मी देशभरातील त्या सर्वांना विनंती करेन की तुम्ही जर कधी एनसीसी जवान (कॅडेट) म्हणून जगला असाल तर तुम्ही या माजी विद्यार्थी संघटनेचा एक भाग व्हा आणि या, आपण सर्व जुने एनसीसी कॅडेट आज जिथे आहोत, कोणतेही काम करत असाल. देशासाठी काहीना काही करण्याचा संकल्प करुया, एकत्र मिळून करुया. ज्या एनसीसीने आपल्याला स्थैर्य शिकवले, ज्या एनसीसीने आपल्याला धैर्य शिकवले, ज्या एनसीसीने आपल्याला राष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जगण्याचा धडा शिकवला, आपणही देशासाठी अशी मूल्ये, संस्कार जगासमोर आणली पाहिजेत. एनसीसी कॅडेट्सच्या उमेदीचा, त्यांच्या समर्पणाचा लाभ आता देशाच्या सीमा आणि किनारपट्टी भागालाही प्रभावीपणे मिळणार आहे. आज मला पहिले एनसीसी माजी विद्यार्थी सदस्यत्व कार्ड दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
मित्रांनो,
झाशीच्या त्यागस्वरुप मातीतून आज आणखी एक महत्त्वाची सुरुवात होत आहे. आज राष्ट्रीय युद्ध स्मारक ('नॅशनल वॉर मेमोरियल') येथे डिजिटल किऑस्कचेही लोकार्पण केले जात आहे. आता सर्व देशवासीय आपल्या शहीदांना, रणवीरांना मोबाईल ॲपद्वारे श्रद्धांजली वाहू शकतील, या एका व्यासपीठामुळे संपूर्ण देशाशी भावनिक नात्याने जोडता येईल. या सर्वांसह, अटल एकता पार्क आणि 600 मेगावॅटचा अल्ट्रामेगा सोलर पॉवर पार्क देखील आज उत्तर प्रदेश सरकारने झाशीला समर्पित केला आहे. आज जग प्रदूषण आणि पर्यावरणीय आव्हानांशी झुंज देत असताना, सोलर पॉवर (सौरउर्जा उद्यानासारखी) पार्कसारखी कामगिरी ही देशाच्या आणि राज्याच्या दूरदृष्टीची उदाहरणे आहेत. विकासाच्या या कामगिरीसाठी आणि सध्या सुरू असलेल्या कार्य-योजनांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
माझ्या पाठीमागे असलेला ऐतिहासिक झाशीचा किल्ला या गोष्टीचा जिवंत साक्षीदार आहे की भारत कोणतीही लढाई शौर्य आणि पराक्रमाच्या अभावामुळे हरलेला नाही. म्हणजे राणी लक्ष्मीबाईंकडे इंग्रजांच्या तोडीस तोड साधनसामग्री आणि आधुनिक शस्त्रास्त्रे असती, तर देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास वेगळा असता! स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्याकडे संधी होती, अनुभवही होता. देशाला सरदार पटेलांच्या स्वप्नांतला भारत बनवण्याची, आत्मनिर्भर भारत बनवण्याची जबाबदारी आपली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत कालात हा देशाचा संकल्प आहे, हेच देशाचे ध्येय आहे. आणि बुंदेलखंडमधील (उत्तर प्रदेश संरक्षण उद्योग कॉरीडॉर) यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉर या मोहिमेत सारथी म्हणून भूमिका बजावणार आहे. एकेकाळी भारताच्या शौर्यासाठी आणि साहसासाठी ओळखले जाणारे बुंदेलखंड आता भारताच्या सामरिक शक्तीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, बुंदेलखंड द्रूतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) या प्रदेशाच्या विकासाचा द्रुतगती महामार्ग बनेल. आज येथे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी संबंधित कंपनीची पायाभरणी होत आहे, येत्या काळात अशा आणखी अनेक कंपन्याही येतील.
मित्रांनो,
दीर्घ काळापासून भारत हे जगातील सर्वात मोठे शस्त्र आणि एक प्रकारे आपली तिच ओळख बनली. आपली ओळख शस्त्रास्त्र खरेदीदार देश अशीच झाली. आमची गणती तिच होत राहिली. पण आज देशाचा मंत्र आहे - मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड. आज भारत आपल्या सैन्याला स्वावलंबी बनवण्यासाठी काम करत आहे. आम्ही देशाच्या खाजगी क्षेत्रातील प्रतिभा देशाच्या संरक्षण क्षेत्राशी देखील जोडत आहोत. नवीन स्टार्ट अप्सना आता या क्षेत्रातही आपली कमाल दाखवण्याची संधी मिळत आहे. आणि या सगळ्यात यूपी डिफेन्स कॉरिडॉरचा झाशी विभाग मोठी भूमिका बजावणार आहे. याचा अर्थ - येथील एमएसएमई उद्योगासाठी, लहान उद्योगांसाठी नवीन शक्यता, संधी निर्माण होतील. येथील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. आणि याचा अर्थ- जे क्षेत्र काही वर्षांपूर्वी चुकीच्या धोरणांमुळे पलायनाने त्रस्त होते, ते क्षेत्र आता नव्या संधींमुळे गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. बुंदेलखंडमध्ये देश-विदेशातील लोक येतील. एकेकाळी कमी पाऊस आणि दुष्काळामुळे नापीक समजल्या जाणाऱ्या बुंदेलखंडच्या भूमीत आता प्रगतीची बीजे अंकुरत आहेत.
मित्रांनो,
संरक्षण अर्थसंकल्पातून जी शस्त्रे-उपकरणे खरेदी केली जातील, त्याचा मोठा भाग मेक इन इंडिया उपकरणांवर खर्च केला जाईल, असेही देशाने ठरवले आहे. संरक्षण मंत्रालयाने अशा 200 हून अधिक उपकरणांची यादीही जारी केली आहे, जी आता देशातूनच खरेदी केली जातील, ती बाहेरून आणता येणार नाहीत. परदेशातून ते खरेदी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मित्रांनो,
आमच्या आदर्श राणी लक्ष्मीबाई, झलकारी बाई, अवंतीबाई, उदा देवी अशा अनेक विरांगणा आहेत. आपले आदर्श लोहपुरुष सरदार पटेल, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्यासारखे महान आत्मा आहेत. त्यामुळे आज अमृत महोत्सवात आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे, एकत्र येऊन देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी, आपल्या सर्वांच्या एकात्मतेसाठी संकल्प करायचा आहे. विकास आणि प्रगतीसाठी संकल्प करायचा आहे. अमृत महोत्सवात राणी लक्ष्मीबाईंचे स्मरण ज्याप्रमाणे देश करत आहे, त्याचप्रमाणे बुंदेलखंडातील अनेक सुपुत्र आहेत. मी येथील तरुणांना अमृत महोत्सवात या बलिदानाचा इतिहास, या धरतीचे वैभव, देश आणि जगासमोर आणण्याचे आवाहन करतो. मला पूर्ण विश्वास आहे, आपण सर्व मिळून या अमर वीरभूमीला त्याचे वैभव पुन्हा मिळवून देऊ. आणि मला आनंद आहे की माझे सहकारी बंधू अनुरागजी संसदेत अशा विषयांवर काहीनाकाही करत असतात. त्यांनी स्थानिक लोकांमध्ये ज्या प्रकारे उत्साह निर्माण केला आहे, सरकार आणि जनता, राष्ट्रीय संरक्षणाच्या या साप्ताहिक उत्सवात मिळून काय अद्भुत काम करू शकतात, हे आमच्या खासदारांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे, हे मी पाहतो आहे. त्यांचेही मी अभिनंदन करतो. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, आदरणीय राजनाथजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघाने ज्या कल्पकतेने, डिफेन्स कॉरिडॉरसाठी, राष्ट्राच्या संरक्षणासाठी विविध आहुती तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश हे ठिकाण निवडले, त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचा बराच काळ प्रभाव राहणार आहे. म्हणूनच राजनाथजी आणि त्यांचा संपूर्ण संघ अभिनंदनास पात्र आहे. योगीजींनी उत्तर प्रदेशच्या विकासाला एक नवे बळ दिले आहे, गती दिली आहे, पण डिफेन्स कॉरिडॉर आणि बुंदेलखंडची ही भूमी देशाच्या संरक्षणासाठी सुपीक भूमी व्हावी, पुन्हा एकदा शौर्य आणि सामर्थ्यासाठी ती तयार करणे हे खूप दूरदृष्टीचे काम असल्याचे मी मानतो. त्यांचेही मी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आजच्या या पवित्र सणाच्या मुहूर्तावर मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद!
ST/SK/VG/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773468)
Visitor Counter : 289
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam