पंतप्रधान कार्यालय

पूर्वांचल द्रूतगती मार्गाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 16 NOV 2021 5:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 16 नोव्हेंबर, 2021

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

ज्या भूमीवर हनुमंताने कालनेमीचा वध केला आहे, त्या भूमीच्या लोकांना मी प्रणाम करतो. 1857 च्या लढ्यामध्ये इथल्याच लोकांनी इंग्रजांना सळोपळो करून सोडले होते. या भूमीतल्या मातीच्या कणा- कणाला स्वातंत्र्य संग्रामाचा सुगंध आहे. कोइरीपूरच्या लढ्याचे कोणाला विस्मरण होणार आहे? आज या पवित्र भूमीला, पूर्वांचल द्रूतगती मार्गाची भेट मिळाली आहे. तुम्हा सर्वांची अनेक दिवसांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप- खूप अभिनंदन!

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे ओजस्वी, तेजस्वी आणि कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे भाजपा अध्यक्ष स्वतंत्र देव जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयप्रताप सिंह जी, धर्मवीर प्रजापती जी, संसदेमध्ये असलेल्या माझ्या भगिनी मेनका गांधी, आणि इतर लोकप्रतिनिधी मंडळी आणि माझ्या प्रिय बंधू  आणि भगिनींनो!

संपूर्ण दुनियेमध्ये ज्यांना कुणाला उत्तर प्रदेशच्या सामर्थ्याविषयी, उत्तर प्रदेशच्या लोकांच्या सामर्थ्याविषयी जर अगदी थोडीशी शंका वाटत असेल तर त्यांना आज या सुल्तानपूरमध्ये येऊन उत्तर प्रदेशाचे सामर्थ्य पाहता येईल. तीन- चार वर्षांपूर्वी ज्याठिकाणी फक्त जमीन होती, त्याच स्थानावरून आज आधुनिक द्रूतगती मार्ग जात आहे. ज्यावेळी तीन वर्षांपूर्वी मी पूर्वांचल द्रूतगती मार्गाच्या कामाचे भूमिपूजन केले होते, त्यावेळी याच मार्गावर एकेदिवशी मी स्वतःच विमानाने उतरणार आहे, असा विचारही मनात आला नव्हता. या द्रूतगती मार्गामुळे आणि उत्तर प्रदेशच्या या वेगवान गतीने काम करण्यामुळे राज्यालाच प्रगतीचा ‘एक्सप्रेस वे’ मिळाला आहे. हा द्रूतगती मार्ग म्हणजे नवीन उत्तर प्रदेशाच्या निर्माणाचा एक्सप्रेस वे आहे. हा एक्सप्रेस वे म्हणजे दिवसेंदिवस बळकट होत असलेल्या उत्तर प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेचा एक्सप्रेस वे आहे. हा एक्सप्रेस वे म्हणजे उत्तर प्रदेश आता आधुनिक होत असल्याचे प्रतिबिंब दर्शविणारा मार्ग आहे. हा एक्सप्रेस वे म्हणजे उत्तर प्रदेशच्या दृढ इच्छाशक्तीचे पावन प्रकटीकरण आहे. हा द्रूतगती मार्ग उत्तर प्रदेशमध्ये संकल्पांना सिद्धीस नेले जाते, त्याचे जीवंत प्रमाण आहे. हा मार्ग म्हणजे उत्तर प्रदेशाची शान आहे. उत्तर प्रदेशाचे कमाल आहे. आज पूर्वांचल द्रूतगती मार्ग उत्तर प्रदेशच्या लोकांना समर्पित करताना माझ्या मनामध्ये धन्यतेची भावना निर्माण झाली आहे.

मित्रांनो,

देशाचा संपूर्ण विकास करण्यासाठी देशाचा संतुलित विकास होणे तितकेच आवश्यकही आहे. विकासाच्या स्पर्धेमध्ये काही क्षेत्रांनी पुढे जायचे आणि काही क्षेत्र दशकभर मागे राहणार, अशी असमानता कोणत्याही देशासाठी योग्य नाही. भारतामध्ये जो पूर्वेकडील भाग आहे, हा पूर्वेकडचा भारत, ईशान्येकडील राज्ये यांच्यामध्ये विकास घडवून आणण्यासाठी अनेक शक्यता असतानाही या क्षेत्रांना देशामध्ये होत असलेल्या विकास कार्यांचा जितका लाभ झाला पाहिजे होता, तितका, फारसा लाभ मिळाला नाही. उत्तर प्रदेशामध्ये ज्या प्रकारचे राजकारण झाले आहे, ज्या प्रकारे दीर्घ काळापासून सरकारांनी काम केले आहे, त्यांनी उत्तर प्रदेशचा संपूर्ण विकास व्हावा, उत्तर प्रदेशचा सर्वांगीण विकास व्हावा, याकडे लक्षच दिले नाही. उत्तर प्रदेशातला या भागाला माफियावादाच्या आणि इथल्या नागरिकांना गरीबीच्या हवाल्यावर सोडून देण्यात आले होते.

आज याच क्षेत्राच्या विकासाचा एक नवीन अध्याय लिहिला जात आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे. उत्तर प्रदेशचे ऊर्जावान, कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, त्यांची टीम  आणि उत्तर प्रदेशच्या लोकांचे या पूर्वांचल द्रूतगती मार्गासाठी मी खूप-खूप अभिनंदन करतो. आपल्या ज्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी या मार्गासाठी भूमी दिली आहे, या मार्गाचे काम करताना ज्या श्रमिकांनी आपला घाम गाळला आहे, ज्या अभियंत्यांनी आपले कौशल्य दाखवून मार्ग तयार केला आहे, त्या सर्वांचे मी खूप -खूप अभिनंदन करतो.

बंधू आणि भगिनींनो,

देश समृद्ध होण्याची जितकी गरज आहे, तितकीच आवश्यकता देशाच्या सुरक्षिततेचीही आहे. आता थोड्याच वेळेमध्ये आपण सर्वजण पाहणार आहे की, आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर आपल्या हवाईदलासाठी कशा पद्धतीने हाच पूर्वांचल द्रूतगती मार्ग एक ताकद बनणार आहे. आता काही वेळातच या पूर्वांचल मार्गावर लढाऊ विमाने उतरविण्यात  येणार आहेत. ज्या लोकांनी गेली अनेक दशके देशाच्या संरक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले त्या लोकांपर्यंतही या विमानांची ‘गर्जना’- विमानांची होणारी प्रचंड घरघर आज पोहोचणार आहे.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशाची भूमी सुपीक, सुफला आहे. इथले लोक परिश्रमी आहेत, इथल्या लोकांमध्ये अनेक कौशल्ये आहेत. आणि हे काही मी पुस्तक वाचून बोलत नाही. उत्तर प्रदेशातला खासदार या नात्याने इथल्या लोकांबरोबर माझे जे नाते तयार झाले आहे, त्यामुळे येणा-या संबंधामुळे मला अनेक गोष्टी पहायला, अनुभवायला मिळाल्या आहेत. जे पाहिले आहे, ते मी बोलतोय. इथे इतक्या प्रचंड क्षेत्राला गंगा आणि इतर नद्यांचा आशीर्वाद मिळाला आहे.  इथे 7-8 वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती, ती पाहिल्यावर मला अगदी नवल वाटले होते. त्यावेळी माझ्या मनात प्रश्न आला उत्तर प्रदेशाला काही लोक कोणत्या गोष्टीची शिक्षा देत आहेत? म्हणूनच 2014 मध्ये ज्यावेळी तुम्ही सर्वांनी, उत्तर प्रदेशने, देशाने मला या महान भारत भूमीची सेवा करण्याची संधी दिली, त्यावेळी इथला खासदार म्हणून, प्रधान सेवक म्हणून उत्तर प्रदेशचा  विकास करणे माझे कर्तव्य मानले. आणि मी इथल्या कामांविषयी अगदी बारकाईने माहिती करून घ्यायला प्रारंभ केला.

उत्तर प्रदेशात अनेक कामांना मी प्रारंभ केला. गरीबांना पक्की घरे मिळावीत, गरीबांच्या घरामध्ये शौचालये असावीत, महिलांना मोकळ्या जागेत, घराबाहेर शौचाला जावे लागू नये, सर्वांच्या घरामध्ये वीज असावी, ही कामे इथे करणे अत्यंत  आवश्यक आहेत, अशी अनेक कामे होती. मात्र मला खूप वेदना देणारी गोष्ट म्हणजे, त्यावेळी उत्तर प्रदेशामध्ये जे सरकार होते, त्या सरकारने मला सहकार्य केले नाही. इतकेच नाही तर, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये माझ्या बाजूला उभे राहिलो-  तर आपली ‘मतांची बँक’ नाराज होईल, अशी भीती त्यांना वाटत होती. मी खासदार म्हणून उत्तर प्रदेशमध्ये येत होतो त्यावेळी विमानतळावर माझे स्वागत करून ते कुठे हरवून जात होते, ते माहिती नाही. त्यांना इतकी लाज वाटत होती, इतकी लाज वाटत होती; कारण त्यांनी नेमके काय काम केले त्या कामाचा हिशेब देण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नसायचे. 

मला माहिती होते की, ज्या पद्धतीने त्यावेळच्या सरकारने, योगीजी येण्याआधीच्या सरकारने उत्तर प्रदेशातल्या लोकांवर अन्याय केला आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या सरकारांनी विकास कामांमध्ये भेदभाव केला, ज्या प्रकारे त्यांनी फक्त आपल्या परिवाराचे हित साधले, त्यांना उत्तर प्रदेशचे लोक अगदी कायमस्वरूपासाठी उत्तर प्रदेशच्या विकासाच्या मार्गावरून हटवून टाकतील. आणि 2017मध्ये तुम्ही लोकांनी हे तर करूनच दाखवले. तुम्ही प्रचंड बहुमत देऊन योगीजी आणि मोदीजींना, दोघांनाही मिळून-एकत्रितपणे तुमची सेवा करण्याची संधी दिली.

आणि आज उत्तर प्रदेशात होत असलेल्या विकास कामांना पाहून मी सांगू शकतो की, या क्षेत्राचे, उत्तर प्रदेशचे भाग्य बदलण्यास प्रारंभ झाला आहे. आणि आता अधिक वेगाने हे भाग्य बदलणार आहे. आधी उत्तर प्रदेशमध्ये किती वेळ वीज पुरवठा बंद होत होता, हे कोणी विसरू शकत नाही. उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती कशी होती, हे कोणीही विसरू शकत नाही. उत्तर प्रदेशात तर अशी स्थिती होती की, इथे रस्त्यांवरून सुरक्षित जाताच येत नव्हते. कारण रस्त्यांवर लुटालूट होत होती. आता लुटालूट करणारे सगळे तुरूंगात आहेत आणि लूटपाट होत नाही. गावांगावांमध्ये नवीन रस्ते बनत आहेत. विकासाचे नवीन मार्ग बनले आहेत. गेल्या साडेचार वर्षांमध्ये मग पूर्व असो अथवा पश्चिम भाग , हजारों गावांना  नवीन  मार्गांनी जोडले आहे. हजारो किलोमीटर नवीन रस्ते  बनले आहेत. आता तुम्हा सर्वांच्या सहकार्याने उत्तर प्रदेश सरकारच्या सक्रिय भागीदारीमुळे  उत्तर प्रदेशाच्या विकास करण्याचे जे स्वप्न होते, ते साकार होत असल्याचे दिसून येत आहे. आज उत्तर प्रदेशामध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होत आहे. एम्स तयार होत आहे. आधुनिक शिक्षण संस्था निर्माण होत आहेत. काही आठवड्यांपूर्वीच कुशीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले आणि मला पूर्वांचल द्रूतगती मार्ग आपल्याला सोपविण्याचे भाग्य मिळाले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

या द्रूतगती मार्गाचा लाभ गरीबांनाही होणार आहे. आणि मध्यम वर्गालाही, शेतकरी बांधवांनाही होणार आहे. तसेच व्यापा-यांनाही या मार्गामुळे सुविधा मिळणार आहेत . याचा लाभ श्रमिकांना होणार आणि उद्योजकांनाही होणार. याचा अर्थ दलित, वंचित, मागास, शेतकरी, युवा, मध्यमवर्ग अशा प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होईल. निर्माणाच्या काळातही या मार्गाने हजारो सहकारींना रोजगार दिला आणि आता मार्ग सुरू झाल्यानंतरही लाखों नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाचे माध्यम हा द्रूतगती मार्ग बनेल.

मित्रांनो,

उत्तर प्रदेशासारख्या विशाल राज्यात आधी एक शहर हे दुस-या शहरापासून ब-याच प्रमाणात तुटल्यासारखे होते, ही गोष्ट सुद्धा खरी आहे. वेगवेगळ्या भागांमध्ये लोक जात तर होते, काम असो, नातेसंबंध ठेवण्यासाठी असो, मात्र या वेगवेगळ्या शहरांमध्ये संपर्क व्यवस्था, संपर्क साधने चांगली नसल्यामुळे सर्वजण त्रासून जात होते. पूर्वेकडच्या लोकांना लखनौला पोहोचणे म्हणजे सुद्धा महाभारतासारखी स्थिती होती. याआधीच्या मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचा परिवार ज्या भागात आहे ज्या भागात त्यांचे घर आहे, त्या भागापुरताच मर्यादित विकास केला होता. मात्र आज जितका पश्चिमेचा सन्मान केला जातो, तितकेच महत्व, प्राधान्य पूर्वांचल भागालाही दिले जात आहे. पूर्वांचल  द्रूतगती मार्ग आज उत्तर प्रदेशमधली ही दरी मिटवून टाकत आहे. उत्तर प्रदेशाला एकमेकांमध्ये जोडत आहे. हा द्रूतगती मार्ग बनवला गेल्यामुळे अवध, पूर्वांचलाबरोबरच बिहारच्या लोकांनाही लाभ होणार आहे. दिल्लीतून बिहार जाणे-येणे आता अधिक सोईचे, सोपे होणार आहे.

 

आणि मी तुमचे लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधू इच्छितो. हा मार्ग लखनऊ, बाराबंकी, अमेठी, सुल्तानपुर, अयोध्या, अंबेडकरनगर, मउ , आजमगढ़ आणि  गाजीपुर यांना जोडेल एवढेच या 340 किलोमीटरच्या  पूर्वांचल एक्सप्रेसवेचे वैशिष्ट्य  नाही .  याचे वैशिष्ट्य हे देखील आहे की हा  एक्सप्रेसवे, लखनऊ इथून त्या शहरांना जोडेल, ज्यांच्यात विकासाच्या अमाप  आकांक्षा आहेत, जिथे विकासाच्या खूप मोठ्या संधी आहेत. यावर आज उत्तर प्रदेश सरकारने योगीजींच्या नेतृत्वाखाली  22 हजार कोटी रुपयांहून अधिक भले खर्च केले असतील, मात्र भविष्यात हे एक्सप्रेसवे, लाखो कोटींच्या उद्योगांना इथे आणण्याचे  माध्यम बनेल. मला माहित नाही, इथे जे माध्यमांमधील सहकारी आहेत , त्यांचे लक्ष याकडे गेले आहे की नाही  कि आज उत्तर प्रदेशात ज्या नवीन एक्सप्रेसवे वर  काम होत आहे , तो कशा प्रकारच्या शहरांना जोडणार आहे.  सुमारे  300 किलोमीटरचा  बुंदेलखंड एक्सप्रेसवे कोणत्या शहरांना जोडेल? चित्रकूट, बांदा हमीरपुर, महोबा, जालौन, औरेया आणि  इटावा. ।90 किलोमीटरचा  गोरखपुर लिंक एक्सप्रेव वे कोणत्या शहरांना जोडेल? गोरखपुर, अंबेडकर नगर, संत कबीर नगर, आणि  आजमगढ़. सुमारे  600 किलोमीटरचा गंगा एक्सप्रेस वे कोणत्या शहरांना जोडेल? मेरठ, हापुड़, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहांपुर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ़, आणि  प्रयागराज . आता हा देखील विचार करा एवढी छोटी छोटी शहरे जोडली जाणार, मला सांगा यापैकी किती शहरे मोठी महानगरे मानली जातात? यापैकी किती शहरे राज्यांच्या इतर शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेली आहेत?  उत्तर प्रदेशच्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे माहिती आहेत आणि उत्तर प्रदेशचे लोक या गोष्टी समजूनही घेतात. अशा प्रकारचे काम उत्तर प्रदेशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच होत आहे. प्रथमच  उत्तर प्रदेशच्या आकांक्षांचे  प्रतीक या शहरांमध्ये आधुनिक कनेक्टिविटीला एवढे प्राधान्य देण्यात आले आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला देखील हे माहित आहे की  जिथे उत्तम रस्ते पोहचतात, चांगले महामार्ग पोहचतात, तिथे विकासाचा वेग वाढतो,  रोजगार निर्मिती आणखी वेगाने होते.

 

मित्रांनो ,

 

उत्तर प्रदेशच्या  औद्योगिक विकासासाठी , उत्तम  कनेक्टिविटी आवश्यक आहे, उत्तर प्रदेशचा कानाकोपरा जोडला जाणे आवश्यक आहे. मला आनंद आहे की आज योगीजी यांचे सरकार  कुठलाही भेदभाव , कौटुंबिक वाद , जातीयवाद, प्रादेशिक वादाशिवाय ,  'सबका साथ, सबका विकास' हा  मंत्र घेऊन काम करत आहे. जसजसे उत्तर प्रदेशात  एक्सप्रेसवे तयार होत आहेत, तसतसे इथे औद्योगिक  कॉरिडोरचे  काम देखील सुरु होत आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला लवकरच नवीन उद्योग उभे रहायला सुरुवात होईल. यासाठी  21 जागांची निवड करण्यात आली आहे. आगामी काळात या एक्सप्रेसवेच्या बाजूला जी शहरे वसलेली आहेत तिथे अन्न प्रक्रिया, दुधाशी संबंधित उत्पादने, शीतगृह, साठवणूक संबंधी उद्योग वेगाने वाढणार आहेत. फळे-भाजीपाला, धान्य ,  पशुपालन आणि शेतीशी संबंधित अन्य उत्पादने असतील किंवा मग औषध निर्मिती,  इलेक्ट्रिकल, वस्त्रोद्योग, हातमाग, धातू,  फर्नीचर, पेट्रोकेमिकल क्षेत्राशी संबंधित उद्योग, या सर्वांना उत्तर प्रदेशात बनणारे नवीन  एक्सप्रेसवे, नवी  ऊर्जा देणार आहेत, नवीन आकर्षणाचे केंद्र बनणार आहेत.

 

मित्रांनो ,

 

या उद्योगांसाठी आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. या शहरांमध्ये आयटीआय, अन्य शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, वैद्यकीय संस्था देखील स्थापन केल्या जातील. म्हणजेच शेत असो वा  उद्योग, उत्तर प्रदेशच्या युवकांसाठी रोजगाराचे आणेल पर्याय आगामी काळात इथे तयार होणार आहेत. उत्तर प्रदेशात तयार होत असलेला संरक्षण कॉरिडोर इथे  नवीन रोजगाराच्या संधी घेऊन येणार आहे. मला विश्वास आहे , उत्तर प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या या कामामुळे भविष्यात इथली अर्थव्यवस्था नवी  उंची गाठेल.

 

बंधू आणि भगिनींनो,

 

एखादी व्यक्ती घर बांधते तेव्हा सर्वप्रथम रस्त्यांची चिंता करते, मातीची तपासणी करते, अन्य पैलूंवर विचार करतो. मात्र उत्तर प्रदेशात आपण प्रदीर्ध काळ अशा सरकारांना पाहिले आहे ज्यांनी  कनेक्टिविटीची  चिंता न करता,  औद्योगीकरणाबाबत मोठमोठ्या घोषणा दिल्या, स्वप्ने दाखवली. परिणाम हा झाला की आवश्यक सुविधांच्या अभावी इथे उभे  राहिलेले कारखाने बंद पडले. त्यांना टाळे लागले. या परिस्थितीत हे देखील दुर्भाग्य होते की दिल्ली आणि  लखनऊ, दोन्ही ठिकाणी घराणेशाहीचे  वर्चस्व राहिले. वर्षानुवर्षे घराणेशाहीची ही भागीदारी उत्तर प्रदेशच्या आकांक्षांना चिरडत राहिली, नुकसान करत राहिली. बंधू आणि भगिनींनो, सुल्तानपुरचे सुपुत्र  श्रीपति मिश्रा यांच्याबरोबर देखील हेच झाले. ज्यांचा प्रत्यक्ष अनुभव आणि कार्यशीलता हीच पूंजी होती, परिवाराच्या दरबारींनी त्यांना अपमानित केले. अशा कर्मयोगींचा अपमान उत्तर प्रदेशातील लोक कधीही विसरू शकत नाहीत.

 

मित्रांनो ,

 

आज उत्तर प्रदेशात  डबल इंजिनचे सरकार उत्तर प्रदेशच्या सामान्य लोकांना आपले कुटुंब मानून काम करत आहे. इथे जे कारखाने उभारले आहेत, ज्या गिरण्या आहेत त्या उत्तम प्रकारे चालवण्याबरोबरच नवीन गुंतवणूक , नव्या कारखान्यांसाठी वातावरण निर्मिती केली  जात आहे. महत्वाचे हे आहे की उत्तर प्रदेशात आज केवळ  5 वर्षांची  योजना बनत नाही , तर या दशकाच्या गरजा लक्षात घेऊन वैभवशाली उत्तर प्रदेशच्या निर्माणासाठी पायाभूत विकास केला जात आहे.  पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडोरद्वारे  उत्तर प्रदेशला पूर्व  आणि  पश्चिम किनारपट्टीशी जोडण्यामागे हाच विचार आहे . मालगाड्यांसाठी बनलेल्या या विशेष मार्गावरून उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा शेतमाल आणि कारखान्यात तयार झालेला माल जगभरातील बाजारपेठांपर्यंत पोहचू शकेल. याचाही लाभ आपले शेतकरी, आपले  व्यापारी, आपले उद्योजक अशा प्रत्येक छोट्या-मोठ्या मित्रांना होणार आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

 

आज या  कार्यक्रमात , मला  उत्तर प्रदेशच्या लोकांची , कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी उत्तम काम केल्याबद्दल प्रशंसा करायची आहे. उत्तर प्रदेशने  14 कोटी  कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रा देऊन आपल्या राज्याला, देशातच नाही तर जगातील  अग्रणी भूमिकेत नेऊन ठेवले आहे. जगातील अनेक देशांची तर एवढी लोकसंख्या देखील नाही.

 

मित्रांनो ,

 

मी उत्तर प्रदेशच्या लोकांची यासाठीही प्रशंसा करेन की त्यांनी भारतात बनलेल्या लसीविरोधात कुठलाही राजकीय  अपप्रचार टिकू दिला नाही. इथल्या लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कट उत्तर प्रदेशच्या लोकांनी उधळून लावला. आणि मी असेही म्हणेन - उत्तर प्रदेशची जनता त्यांना अशा प्रकारे यापुढेही नेस्तनाबूत करत राहील.

 

 बंधू आणि भगिनींनो,

 

उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे  सरकार रात्रंदिवस  मेहनत करत आहे. कनेक्टिविटीबरोबरच उत्तर प्रदेशात मूलभूत सुविधांना देखील   सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. याचा सर्वात जास्त लाभ आपल्या बहिणींना झाला आहे, नारीशक्तिला झाला आहे. गरीब भगिनींना त्यांचे स्वतःचे पक्के घर मिळत आहे, त्यांच्या नावावर मिळत आहे, त्यामुळे त्यांना ओळख मिळत असून उन्हाळा, पावसाळा अशा अनेक त्रासांपासून देखील मुक्ती मिळत आहे.  वीज आणि गॅस जोडण्यांच्या अभावामुळे सर्वाधिक त्रास  माता-भगिनींना होत होता. सौभाग्य आणि  उज्वला योजनेद्वारे मिळालेल्या मोफत वीज आणि गॅस जोडणीमुळे हा त्रास देखील संपला. शौचालयाच्या हवी घर आणि शाळा दोन्ही ठिकाणी सर्वाधिक त्रास आपल्या बहिणी आणि आपल्या मुलींना होत होता. आता  इज्जतघर बनल्यामुळे घरीही सुख आहे आणि मुलींना आता शाळेतही कुठल्याही संकोचाशिवाय शिकण्याचा मार्ग मिळाला आहे.

 

पिण्याच्या पाण्याच्या समस्येत तर माता-भगिनींच्या कितीतरी पिढ्या गेल्या. आता कुठे प्रत्येक घराघरात पाणी पोहचवले जात आहे , पाईपद्वारे पाणी पोहचत आहे. केवळ  2 वर्षांतच उत्तर प्रदेश सरकारने सुमारे  30 लाख ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी पोहचवले आहे. आणि यावर्षी  लाखों भगिनींना त्यांच्या घरी शुद्ध पेयजल देण्यासाठी डबल इंजिनचे  सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे.

 

बंधू आणि भगिनींनो ,

 

आरोग्य सुविधांच्या अभावी सर्वाधिक त्रास जर कुणाला झाला  असेल तर तो आपल्या माता-भगिनींना होत होता. लहान मुलांपासून संपूर्ण कुटुंबाची चिंता, खर्चाची  चिंता इतकी असायची कि ते आपले उपचार करून घ्यायला देखील टाळायच्या  . मात्र आयुष्मान भारत योजना, नवीन रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सारख्या सुविधांमुळे आपल्या माता-भगिनींना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

 

मित्रांनो ,

 

डबल इंजिनच्या सरकारचे जेव्हा असे दुप्पट लाभ मिळतात, तेव्हा त्या लोकांचा तोल सुटत चालला आहे , मी पाहतो आहे, काय- काय  बोलत सुटलेत, त्यांचे विचलित होणे अगदी  स्वाभाविक आहे. जे आपल्या काळात  असफल राहिले ते  योगीजींचे यश देखील पाहू शकत नाहीत. जे यश पाहू शकत नाही ते यश कसे पचवतील.

 

बंधू आणि भगिनींनो ,

 

त्यांच्या कोलाहलापासून   दूर, सेवाभावाने राष्ट्रनिर्माणमध्ये सहभागी होणे हेच आपले कर्म आहे, हीच आपली  कर्म गंगा आहे आणि आपण ही कर्म गंगा घेऊन  सुजलाम, सुफलाम वातावरण निर्माण करत राहू. मला विश्वास आहे, तुमचे प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच आम्हाला मिळत राहील.पुन्हा एकदा  पूर्वांचल एक्सप्रेसवेसाठी तुमचे खूप अभिनंदन !

 

 

 

माझ्याबरोबर म्हणा, पूर्ण ताकदीनिशी बोला -

 

 

 

भारत माता की जय !

 

भारत माता की जय !

 

भारत माता की जय !

 

खूप-खूप  धन्यवाद !

***

Jaydevi PS/ SB/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772515) Visitor Counter : 220