आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर दस्तक’ मोहिमेला बळ देण्याच्या हेतूने स्वयंसेवी संस्था, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय आणि विकासकामातील सहभागींशी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची चर्चा


"कोविड लसीकरणासंदर्भातील यश हे सर्व देशवासियांनी मिळून केलेल्या प्रयत्नांचं यश आहे",हे मोदीजींनी नेहमीच अधोरेखित केले आहे

Posted On: 16 NOV 2021 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021

 

कोविड लसीकरणाचे यश हे सरकारचे नसून संपूर्ण देशाचे यश आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठळकपणे सांगितले आहे. सर्व संबंधितांनी आपापल्या स्तरावर उत्तम काम केले, अशा तऱ्हेने एकत्रितपणे लक्ष्य साध्य करण्याची क्षमता हेच लोकशाहीचे खरे गमक आहे., असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी आज केले. कोविड लसीकरणाचा उपक्रम देशभरात नेण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्या सर्व संबंधितांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती प्रवीण पवार त्यांच्या मतदार संघातून कार्यक्रमाला डिजिटली उपस्थित होत्या.

भारतातील लसीकरण कार्यक्रमासारख्या अवाढव्य उपक्रमाला जन भागीदारीचे बळ लाभणे आवश्यक असते श्री मांडविया यांनी सांगितलं. कोविड संकटातून भारत पुन्हा उभा राहिला याच्यामागे स्वयंसेवी संस्था आणि नागरी सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकार यांचा मोठा वाटा होता. कोविड टाळेबंदीच्या काळात कुणालाही उपाशीपोटी झोपावे लागू नये यासाठी सरकारच्या प्रयत्नांना त्यांनी साथ दिली. साधारणपणे 80 टक्के नागरिकांना  लसीकरणाची पहिली तर 40 टक्के लोकसंख्येला दोन्ही मात्रा मिळाल्या.  यामध्येही स्वयंसेवी आणि सामाजिक संस्थांच्या कामाचा वाटा होता असे त्यांनी नमूद केले.

प्रत्येकाला लस मिळेल याची आपण सर्वांनी खात्री केली पाहिजे असे त्यांनी सांगितले. भारताचे कोविड पासून संरक्षण करण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्था तसेच राजकीय पक्ष आणि नागरिकांनी शेवटच्या नागरिकापर्यंत लसीकरण पोचवण्याचे जे प्रयत्न केले. याची त्यांनी प्रशंसा केली.

लसीकरणा संबंधी जनजागृती करून लसीकरणाचा कार्यक्रम  हा जनआंदोलनात परावर्तित करण्यासाठी जमलेल्या सर्व सहभागींना प्रोत्साहन देण्यात आले. गंभीर आजारपण किंवा रुग्णालयातील मुक्काम यापासून संरक्षण मिळवण्यासाठी दुसरी मात्रा घेणे महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करून, ते लोकांपर्यंत ठळकपणे पोचवायला हवे यावर भर देण्यात आला.

एखादे क्षेत्र लसीकरणासाठी निवडून तेथील सर्व रहिवाशांचे संपूर्ण लसीकरण होईल याची खातरजमा करावी अशी सूचना मांडविया यांनी केली. लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ज्या घरातील सर्वांनी लसींच्या मात्रा घेतल्या आहेत त्या घरांवर तसे दर्शवणारे आकर्षक स्टीकर लावावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

लस देण्याची सोय आणि लसीचा पुरवठा, माहिती आणि प्रसार करणारी प्रचार पत्रके, कोविड व्यवस्थापनासाठी आर्थिक आणि तांत्रिक संसाधनांचा उपयोग याबद्दल सहभागींनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांचे आभार मानले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, अतिरिक्त आरोग्य सचिव मनोहर अगनागी, अतिरिक्त सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे संचालक विशाल शील, आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव आरती अहुजा, संयुक्त सचिव आरोग्य विभाग मनदीप भंडारी आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ आधिकारी बैठकीस उपस्थित होते.

 

 M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772305) Visitor Counter : 230