पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पहिल्या लेखापरीक्षण दिवस समारंभ कार्यक्रमाला संबोधित केले


“कॅग विरुद्ध सरकार” ही धारणा बदलली असून आज लेखापरीक्षण हा मूल्यवर्धनाचा एक भाग समजला जात आहे

“आम्ही यापूर्वीच्या सरकारांचे सत्य संपूर्ण प्रामाणिकतेने देशासमोर मांडले आहे. जेव्हा आपण समस्या ओळखू तेव्हाच आपण त्यावरील उपाय शोधू शकू”

“सेवांच्या वितरणासाठी संपर्कविरहित प्रक्रिया, स्वयंचलित नूतनीकरण, चेहेराविरहित मूल्यमापन, ऑनलाईन सुविधा या सर्व सुधारणांमुळे सरकारच्या अनावश्यक हस्तक्षेपाला पायबंद बसला आहे.

“आधुनिक पद्धतींचा स्वीकार केल्यामुळे कॅगमध्ये वेगवान बदल घडून आले आहेत. आज तुम्ही आधुनिक विशेषणात्मक साधने, भू-अवकाशीय माहिती आणि उपग्रह प्रतिमा यांचा वापर करत आहात”

“21 व्या शतकात संकलित आकडेवारी हीच माहिती आहे आणि येत्या काळात आपला इतिहास देखील या आकडेवारीच्या माध्यमातून पाहिला आणि समजून घेतला जाईल. भविष्यात आकडेवारी इतिहास ठरवेल”

Posted On: 16 NOV 2021 11:32AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 16 नोव्हेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या लेखापरीक्षण दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, कॅग अर्थात नियंत्रक आणि लेखापरीक्षक संस्था केवळ देशाच्या हिशोबांची नोंद ठेवत नाही तर उत्पादकता आणि कार्यक्षमता यांचे मूल्यवर्धन देखील करते. म्हणून लेखापरीक्षण दिवसानिमित्त चर्चा आणि इतर संबंधित कार्यक्रम हा आपल्या सुधारणेचा आणि  आयत्या वेळी केलेल्या सुधारित प्रक्रियांचा भाग आहे. कॅग या संस्थेने काळासोबत स्वतःचे महत्त्व वाढविले असून एक वारसा निर्माण केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात महात्मा गांधी, सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आणि ते म्हणाले कि या महान नेत्यांनी आपल्याला मोठी उद्दिष्ट्ये निश्चित करून ती कशी साध्य करायची हे शिकविले.

एक काळ असा होता जेव्हा देशात लेखापरीक्षणाकडे लोक दडपण आणि भीतीच्या नजरेने पाहत असत. “कॅग विरुध्द सरकार’ ही आपल्या यंत्रणेची सर्वसामान्य धारणा बनली होती. पण आज, या मनोभूमिकेत बदल झाला आहे. आज लेखापरीक्षणाला मूल्यवर्धनाचा एक महत्त्वाचा भाग समजले जात आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

पूर्वीच्या काळात बँकिंग क्षेत्रात पारदर्शकतेच्या अभावामुळे अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जात होत्या. याचा परिणाम असा झाला की बँकांच्या अनुत्पादक मालमत्तांमध्ये सतत वाढ होत राहिली अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. “पूर्वीच्या काळी अनुत्पादक मालमत्तांची माहिती कशी दडवली जात होते हे तुम्ही जाणताच, मात्र आम्ही पूर्वीच्या सरकारांबाबतचे सत्य संपूर्ण प्रामाणिकतेने देशासमोर मांडले आहे. जेव्हा आपण समस्या ओळखू तेव्हाच आपण त्यावरील उपाय शोधू शकू,” असे ते म्हणाले.

 

पंतप्रधान लेखापरीक्षकांना म्हणाले, “आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यामध्ये ‘सरकार सर्वम’ म्हणजे प्रत्येक गोष्टीत सरकारचा हस्तक्षेप असण्याचे प्रमाण कमी होईल आणि तुमचे काम अधिक सोपे होईल.” हा मार्ग ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या धोरणाला अनुसरूनच आहे. “सेवांच्या वितरणासाठी संपर्कविरहित प्रक्रिया, स्वयंचलित नूतनीकरण, चेहेराविरहित मूल्यमापन, ऑनलाईन सुविधा अशा सर्व सुधारणांमुळे सरकारच्या अनावश्यक हस्तक्षेपाला पायबंद बसला आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले.

  

कॅगने फाईल्ससह धडपडणारी,कारभारात लुडबुड करणारी संस्था ही प्रतिमा पुसून टाकली आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “आधुनिक पद्धतींचा स्वीकार केल्यामुळे कॅगमध्ये वेगवान बदल घडून आले आहेत. आज तुम्ही आधुनिक विशेषणात्मक साधने, भू-अवकाशीय माहिती आणि उपग्रह प्रतिमा यांचा वापर करत आहात,” असे त्यांनी नमूद केले. 

 

इतिहासातील सर्वात मोठ्या महामारीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी या महामारीशी देशाने दिलेली झुंज देखील असामान्य असल्याचा उल्लेख केला. आपण आज जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवीत आहोत. काही आठवड्यांपूर्वी आपण कोविड प्रतिबंधक लसीच्या 100 कोटी मात्रा देण्याचा महत्त्वाचा टप्पा पार केला अशी माहिती त्यांनी दिली. या मोठ्या लढयादरम्यान उदयाला आलेल्या पद्धतींचा कॅगने अभ्यास करावा अशी सूचना त्यांनी केली.

पंतप्रधान म्हणाले की जुन्या काळात गोष्टींच्या माध्यमातून माहितीचे हस्तांतरण होत असे. कहाण्यांच्या माध्यमातून इतिहास लिहिला जात असे. पण आज 21 व्या शतकात संकलित आकडेवारी हीच माहिती आहे आणि येत्या काळात आपला इतिहास देखील या आकडेवारीच्या माध्यमातून पाहिला आणि समजून घेतला जाईल. भविष्यात आकडेवारी इतिहास ठरवेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी सांगितले.

***

 

MC/Sanjana/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772265) Visitor Counter : 264