माहिती आणि प्रसारण मंत्रालय

52व्या इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थिती लावू इच्छिणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू

Posted On: 06 NOV 2021 12:22PM by PIB Mumbai

 

गोवा येथे होणार असलेल्या बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींची नोंदणी आता  सुरू झाली आहे.

20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत होत असलेल्या या महोत्सवाला डिजिटल माध्यमाच्या मदतीने आभासी पद्धतीने उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांसाठी ही व्यवस्था आहे.

खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून ही नोंदणी पार पाडता येईल.

https://virtual.iffigoa.org

अजूनही अस्तित्वात असलेल्या covid-19  महामारीचा धोका लक्षात घेता  आशियातील  या सर्वात जुन्या आणि भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाचे स्वरूप यंदाही हायब्रीड अर्थात  संमिश्र असेल.  त्यामुळे महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

बहुतांश  चित्रपटांचे प्रसारण ऑनलाईन होईल. याशिवाय सर्व पत्रकार परिषदा या youtube.com/pibindia. या पीआयबी इंडियाच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रक्षेपित केल्या जातील. या पत्रकार परिषदांमध्ये ऑनलाइन प्रश्न विचारण्याची संधी प्रसार माध्यम प्रतिनिधींना  उपलब्ध करून देण्यात येईल.

1 जानेवारी 2021 रोजी 21 वर्षे पूर्ण झालेले माध्यम प्रतिनिधी या महोत्सवाला उपस्थिती लावण्यास पात्र आहेत.

प्रसार माध्यमांना  विनाशुल्क नोंदणी करता येईल. अधिकृत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना महोत्सवाला उपस्थिती लावण्यासाठीची लॉगिनविषयक माहिती मेल /एसएमएस मार्फत कळवली जाईल.

माध्यम प्रतिनिधींना आभासी पद्धतीने पुरवण्यात आलेली नोंदणी ही हस्तांतरित करता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आभासी मंचावरील कार्यक्रमापुरतीच ही नोंदणी मर्यादित असेल  व  महोत्सवात  प्रत्यक्ष उपस्थितीसाठी वापरता येणार नाही.

बावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रत्यक्ष उपस्थित राहू इच्छिणार्‍या प्रसार माध्यम प्रतिनिधींनी https://my.iffigoa.org/extranet/media/   येथे नोंदणी करावी.

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाबद्दल माहिती:

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ईफ्फी 1952 मध्ये सुरु झाला. हा आशियातील  सर्वाधिक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो.

दरवर्षी भरवला जाणारा हा चित्रपट महोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही गोव्यात पार पडणार आहे. जागतिक चित्रपटांना एका मंचावर आणून चित्रपट कलेतील गुणवत्ता प्रदर्शित करण्याची संधी मिळावी, विविध देशांमधील चित्रपटांना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून समजून घेण्याची आणि त्याद्वारे तेथील चित्रपट कलेचा आनंद घेण्याची संधी सर्वांना मिळावी आणि त्याद्वारे जगभरात लोकांमध्ये मैत्री व सहकार्याची भावना दृढ व्हावी हा या महोत्सवाला मागील उद्देश आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या चित्रपट महोत्सव महासंचालनालय आणि गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाशी संबंधित सर्व अद्ययावत माहिती  महोत्सवाच्या www.iffigoa.org  या संकेतस्थळावर तसेच ईफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ट्विटर ,फेसबुक , इंस्टाग्राम या समाज माध्यम हँडलवर तसेच गोवा पत्र सूचना कार्यालय आणि मुंबई पत्र सूचना कार्यालय  यांच्या समाज माध्यम हँडलवर मिळेल. या महोत्सवाचे ऑनलाइन माहितीपत्रक  उपलब्ध आहे.

***

Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1769718) Visitor Counter : 248