पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथल्या महापरिनिर्वाण मंदिरामध्ये अभिधम्म दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 20 OCT 2021 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2021

 

नमो बुद्धाय!

या पवित्र, मंगल कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, मंत्रिमंडळातले माझे सहकारी जी किशन रेड्डी, किरण रिजीजू, ज्योतिरादित्य शिंदे, श्रीलंकेतून कुशीनगरला आलेले, श्रीलंका सरकारच्या मंत्रिमंडळातले मंत्री नमल राजपक्षा, श्रीलंकेतून आलेले अति पूजनीय, आमचे इतर अतिथीगण, म्यानमार, व्हिएतनाम, थायलंड, लाओ पीडीआर, भूतान आणि दक्षिण कोरियाचे भारतातले राजदूत, श्रीलंका, मंगोलिया, जपान, सिंगापूर, नेपाळ आणि इतर देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, सर्व सन्माननीय भिक्षुगण आणि भगवान बुद्धांचे सर्व अनुयायी मित्रांनो!

अश्विन महिन्यातल्या पौर्णिमेच्या या पवित्र दिनी, कुशीनगरची पावन भूमी आणि आपल्या शरीर अंशांमध्ये- रेलिक्सच्या रूपाने साक्षात भगवान बुद्धांची असलेली उपस्थिती!

भगवान बुद्धांच्या कृपेने आजच्या दिनी अनेक अलौकिक व्यक्तींच्या संगतीमध्ये - अनेक अलौकिक संयोग घडून येत आहेत. आताच इथं येण्यापूर्वी मला कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण करण्याचे भाग्य लाभले. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून जगातल्या बुद्ध अनुयायींना इथे येण्याची संधी आता मिळणार आहे. त्यांचा यात्रा-प्रवास आता अधिक सुलभ होईल. या आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्रीलंकेतून आलेल्या पहिल्या विमानाने अति-पूजनीय महासंघ, सन्माननीय भिक्षू, आमचे सहकारी मंडळी  यांचे कुशीनगर इथे आगमन झाले आहे. आपल्या सर्वांची या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणजे- भारत आणि श्रीलंका यांच्यातील हजारो वर्षांपासूनचा असलेला अध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा, याचेच हे प्रतीक आहे.

मित्रांनो,

आपण सर्वजण जाणून आहात की, श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा संदेश, सर्वात प्रथम भारतातून सम्राट अशोकाचे पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांनी नेला होता. असे मानतात की, आजच्याच दिवशी ‘अर्हत महिंदा’ यांनी परत येवून आपल्या पित्याला सांगितले होते की, श्रीलंकेने बुद्धांचा संदेश अतिशय उत्साहाने, पूर्ण शक्तीनिशी स्वीकारला आहे, या संदेशाचा अंगिकार केला आहे. या वृत्तामुळे सर्वांचा विश्वास अधिक वाढला होता. बुद्धांचा संदेश हा संपूर्ण विश्वासाठी आहे, बुद्ध हा धम्म मानवतेसाठी आहे, असा दृढ विश्वास निर्माण झाला. म्हणूनच आजचा हा दिवस आपण सर्व देशांच्या युगायुगांपासून असलेल्या प्राचीन सांस्कृतिक संबंधांना नवीन शक्ती देण्याचाही दिवस आहे. मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो ही, आपण आज भगवान बुद्धांच्या महा-परिनिर्वाण स्थानी, त्यांच्या समोर उपस्थित आहोत. मी श्रीलंका आणि इतर सर्व देशांतून आलेल्या आमच्या सन्माननीय अतिथीगणांचे हार्दिक स्वागत करतो. आपले जे अतिपूजनीय महासंघ, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही मी आदरपूर्वक नमस्कार करतो. आपण आम्हा सर्वांना भगवान बुद्धांच्या अवशेष स्वरूपाचे -रेलिक्सचे दर्शन देण्याचे भाग्य दिले. इथे कुशीनगरच्या या कार्यक्रमानंतर तुम्ही मी खासदार म्हणून ज्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतो, त्या वाराणसी शहरामध्ये जाणार आहात. आपली पवित्र चरणं, तिथे पडतील, आणि तिथेही सौभाग्याचे आगमन होईल.

मित्रांनो,

मी आज आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सर्व सदस्यांचेही अभिनंदन करतो. ते ज्यापद्धतीने आधुनिक विश्वामध्ये भगवान बुद्धांच्या संदेशाचा प्रसार करीत आहेत, ते अतिशय वाखाणण्यासारखे आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे जुने सहकारी शक्ती सिन्हा यांचीही खूप आठवण येत आहे. आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाचे महासंचालक म्हणून कार्य करीत असलेले शक्ती सिन्हा जी यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. भगवान बुद्धांविषयी त्यांना असलेली आस्था, त्यांचा समर्पण भाव या सर्व गोष्टी आपल्या सर्वांना प्रेरणादायक आहेत.

मित्रांनो,

आपण सर्वजण जाणून आहातच की, आज आणखी एका दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. भगवान बुद्धांचे तुषिता येथून आजच्या दिवशीच पन्हा एकदा धरतीवर आगमन झाले होते. म्हणूनच अश्विनी पौर्णिमेला आज  भिक्षुगण आापला तीन महिन्यांचा ‘वर्षावास’ही पूर्ण करतात. आज मलाही वर्षावासानंतर संघ भिक्षुंना ‘चीवर दान’ करण्याचे भाग्य लाभले. भगवान बुद्धांचा हा बोध अद्भूत आहे. त्यांनी अशा परंपरांना जन्म दिला. पावसाळ्याच्या महिन्यात आपला निसर्ग, आपल्या आजूबाजूला असलेले वृक्ष-लता-वेली,रोपे यांना नवीन जीवन मिळत असते. जीवमात्रांविषयी अहिंसेचा संकल्प आणि झाडां-रोपांमध्येही परमात्मा पाहण्याचा भाव, बुद्धांचा हा संदेशच इतका जिवंत आहे की, आजही आपले भिक्षू त्या संदेशानुसार जगत आहेत. जो कोणी साधक नेहमी क्रियाशील असतात, सदैव गतिशील असतात, ते हे पावसाळ्याचे तीन महिने एके ठिकाणी थांबतात. कारण आपल्या पायाखाली नव्याने अंकूर फुटण्याच्या अवस्थेत असलेली बीजे येवू नयेत, चिरडली जावू नयेत. तसेच नव्याने निर्मितीच्या टप्प्यात असलेल्या निसर्गाच्या नियमामध्ये कोणत्याही प्रकारे व्यत्यय येवू नये, असा विचार भिक्षुगण करतात. या वर्षावासामध्ये केवळ बाहेरच निसर्ग प्रस्फुटित होतो, असे नाही, तर आपल्या आतमध्येही वसलेल्या निसर्गाला संशोधन करण्याची संधी मिळत असते.

मित्रांनो,

धम्मंचा निर्देश आहे - यथापि रूचिरं पुप्फं, वण्णवन्तं सुगन्धकं।

एवं सुभासिता वाचा, सफलाहोति कुब्बतो।।

याचा अर्थ असा की, चांगली वाणी आणि चांगले विचार जर तितक्याच निष्ठेने आचरणामध्ये आणले तर त्याचा परिणामही सुगंधित फुलाप्रमाणेच चांगला होतो. कारण आपण आचरण चांगले केले नाही तर मात्र उत्तमातील उत्तम गोष्ट म्हणजे, सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असणार आहे. दुनियेमध्ये जिथे जिथे बुद्धांचे विचार अगदी योग्य पद्धतीने आत्मसात केले गेले आहेत, तिथे तिथे अतिशय कठीण परिस्थितीमध्येही प्रगतीचे मार्ग बनले आहेत. 

म्हणूनच  बुद्ध  वैश्विक आहे, कारण बुद्ध आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायला सांगतात. भगवान बुद्ध यांचे बुद्धत्व आहे - sense of ultimate responsibility. अर्थात पूर्ण जबाबदारीची भावना. आपल्या आसपास, आपल्या  ब्रह्मांडात जे काही घडत आहे , आपण स्वतःला त्याच्याशी जोडून पाहतो , स्वतः  त्याची जबाबदारी घेतो. जे घडत आहे त्याला  जर आपण आपल्या सकारात्मक प्रयत्नांची जोड दिली तर आपण सृजनाला गती देऊ शकू.  आज जेव्हा जगभरात पर्यावरण संरक्षणाबाबत बोलले जात आहे, हवामान बदलाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे , तेव्हा त्याबरोबर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जातात. मात्र जर आपण बुद्धाचा संदेश अंगिकारला तर ‘कुणी करायचे आहे ' या ऐवजी 'काय करायचे आहे' याचा मार्ग आपोआप दिसायला लागतो.

मित्रांनो ,

हजारो वर्षांपूर्वी  भगवान बुद्ध जेव्हा या धरतीवर होते तेव्हा आजच्यासारख्या व्यवस्था नव्हत्या, मात्र तरीही बुद्ध जगभरातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहचले, त्यांच्या अंतर्मनाशी जोडले गेले. मी विविध देशांमध्ये  बौद्ध धर्माशी संबंधित मंदिरे ,  विहारामध्ये याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. मी पाहिले आहे की  कैंडी ते  क्योटो पर्यंत , हनोई ते  हंबनटोटा पर्यंत भगवान बुद्ध आपल्या विचारांच्या माध्यमातून मठ, अवशेष आणि  संस्कृतीद्वारे प्रत्येक ठिकाणी आहेत. हे माझे सौभाग्य आहे की मी  कैंडी येथे  श्री डलाडा मैलागोवा इथे  दर्शन घेण्यासाठी गेलो होतो ,  सिंगापुर येथे त्यांचे  दंत-अवशेष मी पाहिले आहेत, आणि क्योटो मध्ये किन्का-कुजीला भेट देण्याची मला संधी मिळाली होती.  त्याचप्रमाणे दक्षिण पूर्व देशांमधील  भिक्षुकांचा आशीर्वाद देखील मला मिळत आला आहे. वेगवेगळे  देश, वेगवेगळी परिसंस्था , मात्र  त्यांच्या आत्म्यात वसलेले बुद्ध सर्वांना जोडत आहेत. भारताने भगवान बुद्ध यांच्या या शिकवणीला आपल्या  विकास यात्रेचा भाग बनवले आहे. त्याचा स्वीकार केला आहे. आम्ही  ज्ञान, महान संदेश, महान आत्म्यांच्या विचारांना सीमित ठेवण्यावर कधीच विश्वास ठेवला नाही. ते सीमित ठेवणे ही आमची विचारधारा नाही , आम्ही जे काही आमचे होते ते मानवतेसाठी ‘ममभावने ’ ने अर्पित केले. म्हणूनच , अहिंसा, दया, करुणा सारखी  मानवीय मूल्य आजही तेवढ्याच सहजतेने भारताच्या  अन्तर्मनात रुजली आहेत. म्हणूनच, बुद्ध आजही  भारताच्या  संविधानाची प्रेरणा आहेत,  बुद्ध यांचे धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर विराजमान होऊन आपल्याला गती देत आहेत. आजही भारताच्या संसदेत कुणी जाते तेव्हा त्यांची नजर या मंत्रावर नक्कीच पडते-  ‘धर्म चक्र प्रवर्तनाय’!

मित्रांनो ,

साधरणपणे ही देखील धारणा असते की बौद्ध धर्माचा प्रभाव, भारतात प्रामुख्याने पूर्वेकडेच जास्त राहिला. मात्र इतिहासाकडे बारकाईने पाहिले तर आपल्याला आढळून येते की  बुद्ध यांनी जेवढे पूर्वेकडील भागांना प्रभावित केले तेवढेच  पश्चिम आणि दक्षिणेवरही त्यांचा प्रभाव आहे. गुजरातमधील वडनगर, जे माझे  जन्मस्थान देखील आहे, ते प्राचीन काळी  बौद्ध धर्माशी संबंधित एक महत्वपूर्ण स्थान होते. आतापर्यन्त आपण  ह्वेन सांग यांच्या उद्धरणांच्या माध्यमातून हा इतिहास जाणून होतो , मात्र आता वडनगर येथे पुरातनकालीन मठ आणि स्तूप देखील उत्खननात मिळाले आहेत.  गुजरातचा हा भूतकाळ याचाही पुरावा आहे की बुद्ध दिशा आणि सीमांच्या पलिकडे होते. गुजरातमध्ये जन्मलेले महात्मा गांधी तर बुद्ध यांच्या सत्य आणि अहिंसा  संदेशांचे आधुनिक संवाहक होते.

मित्रांनो

आज भारत आपला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या  अमृत महोत्सवात आपण आपल्या भविष्यासाठी, मानवतेच्या भविष्यासाठी  संकल्प करत आहोत. या अमृत संकल्पांच्या केंद्रस्थानी भगवान बुद्ध यांचा तो संदेश आहे जो सांगतो -

अप्पमादो अमतपदं,

पमादो मच्चुनो पदं।

अप्पमत्ता न मीयन्ति,

ये पमत्ता यथा मता।

म्हणजेच प्रमाद टाळणे हेच  अमृत पद आहे आणि  प्रमाद हाच मृत्यू आहे. म्हणूनच  आज भारत नव्या ऊर्जेने पुढे जात आहे , संपूर्ण जगाला बरोबर घेऊन पुढे वाटचाल करत आहे.  भगवान बुद्ध यांनी म्हटले होते -

“अप्प दीपो भव”।

म्हणजे  आपला प्रकाश स्वतः बना. स्वयंप्रकाशित व्यक्ती जगाला प्रकाश देऊ शकते. भारताला आत्मनिर्भर बनवण्यामागे हीच प्रेरणा आहे.  जगातील प्रत्येक देशाच्या विकासात सहभागी होण्यासाठी हीच प्रेरणा आपल्याला  बळ देते. भगवान बुद्धांची हीच शिकवण  भारत सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रासह  पुढे नेत आहे. 

मला पूर्ण  विश्वास आहे की  भगवान बुद्ध यांच्या  या विचारांचे अनुसरण करत आपण सर्व एकजुटीने मानवतेच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करू.

याच कामनेसह तुम्हा सर्वांना खूप-खूप  धन्यवाद!

भवतु सब्ब मंगलं।

नमो बुद्धाय॥

* * *

MC/SRT/Suvarna/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1765270) Visitor Counter : 286