आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांनी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत एचआयव्ही/एड्स आणि टीबी बाबत जनजागृती मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला


न्यू इंडिया @75 ने राज्यांना विद्यार्थी, किशोरवयीन, युवा आणि इतर हितधारकांना एकत्रितपणे राष्ट्र हितासाठी काम करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे: केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार

"राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांनी भारताचे आरोग्य निर्देशांक सुधारण्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे"

पहिल्या टप्प्याअंतर्गत आयोजित विविध जागरूकता विषयक उपक्रमांचे दर्शन घडवणारी ई-पुस्तिका प्रकाशित

Posted On: 12 OCT 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 ऑक्टोबर 2021

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रविण पवार यांनी आज नवी दिल्लीत आझादी का अमृत महोत्सवअंतर्गत एचआयव्ही/एड्स आणि क्षयरोगाबाबत  जनजागृती मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. त्यांनी  देशभरातील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधला आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी  प्रोत्साहित केले.

या मोहिमेच्या प्रारंभाबद्दल आनंद व्यक्त करत त्या म्हणाल्या, न्यू इंडिया@75 ने राज्यांना विद्यार्थी, किशोरवयीन, युवा आणि इतर हितधारकांना एकत्रितपणे राष्ट्र हितासाठी काम करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रारंभानंतर प्रत्येक राज्याच्या 25 शाळा आणि 25 महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही/एड्स, क्षयरोग आणि रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा  आणि मास्क तयार करणे यांसारख्या उपक्रमांचे आठवडाभर आयोजन करण्यात आले होते हे ऐकून मला आनंद झाला."

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी एचआयव्ही, क्षयरोग आणि रक्तदानाबाबत ‘जनजागृती मोहिमेचा टप्पा 1’ यशस्वीपणे सुरू केल्याबद्दल डॉ भारती प्रविण पवार यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेचे (नॅको) अभिनंदन केले. कोविड -19 महामारी दरम्यान देशभरातील तरुणांपर्यंत पोहोचण्याच्या नॅकोच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी, त्यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (नॅको) विकसित केलेल्या ई-पुस्तिकेचे प्रकाशन देखील केले ज्यात पहिल्या टप्प्यांतर्गत आयोजित विविध जनजागृती उपक्रमांची माहिती आहे. देशभरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना यापुढील उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शक म्हणून काम करेल.

देशभरातील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअली संवाद साधताना त्या म्हणाल्या, "मला ठामपणे असे वाटते की 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' आपल्या देशाला एक महान राष्ट्र बनवण्यासाठी महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील 'आत्मनिर्भर भारत, एक स्वयंपूर्ण भारत’ साठी तुमचे योगदान सर्वात महत्वाचे आहे. आपल्या पंतप्रधानांनी  म्हटले आहे की, "देशभरातील भारतीय युवक क्रीडा, रोबोटिक्स, मशीन-लर्निंग सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या देशाला अभिमानास्पद कामगिरी बजावत आहेत. आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता असलेल्या अनेक उत्पादनांवर काम करत आहेत.

युवकांना सामाजिक विकासात्मक मुद्यांवर भागीदार आणि प्रमुख म्हणून पूर्णपणे सहभागी करून आरोग्य विषयक उद्दिष्टे साध्य करण्यावर आपला दृढ विश्वास व्यक्त करताना त्या म्हणाल्या, एचआयव्ही/एड्स, क्षयरोग, रक्तदान, कलंक आणि भेदभाव याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समुदाय स्वयंसेवक म्हणून युवक मोठी भूमिका बजावू शकतील.  "आयुर्मान, बालमृत्यू दर (IMR), मातृ मृत्यू दर (MMR)सारख्या सर्व आरोग्य निर्देशकांमध्ये भारताच्या उल्लेखनीय सुधारणा अधोरेखित करत त्या म्हणाल्या की राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम यांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांनी भारताचे आरोग्य निर्देशक सुधारण्यात खूप महत्वाची भूमिका बजावली आहे.

आरोग्य सचिव राजेश भूषण, अतिरिक्त सचिव आरती आहुजा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि नॅकोचे महासंचालक आलोक सक्सेनानॅकोच्या संचालक निधी केसरवानी, नॅकोचे उपमहासंचालक डॉ अनूप कुमार पुरी आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान दाखवलेल्या माहितीपटाची  लिंक:

Youth are champions of change:

https://www.youtube.com/watch?v=MUWe7wj7ufE

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1763256) Visitor Counter : 320