सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लेह येथे जगातील सर्वात मोठ्या भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन करत खादीने महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 02 OCT 2021 6:26PM by PIB Mumbai

 

राष्ट्राभिमान आणि देशभक्ती, भारतीयत्वाची एकत्रित उर्जा आणि खादीच्या कारागिरीचा  वारसा यांनी आज लेह येथे प्रदर्शित करण्यात आलेल्या, जगातील सर्वात मोठ्या भारतीय राष्ट्रध्वजाला सलाम करण्यासाठी संपूर्ण देशाला एकत्र आणले. सर्वात पर्यावरण-स्नेही कापड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खादीची देणगी जगाला देणाऱ्या महात्मा गांधीजींना सर्वात मोठी आदरांजली वाहण्याच्या उद्देशाने केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने हा स्मारकरुपी भव्य राष्ट्रध्वज तयार केला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001YOTC.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002RZ33.jpg

या राष्ट्रध्वजाचे अनावरण लडाखचे नायब राज्यपाल आर.के.माथुर यांनी केले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की हा स्मारकरुपी राष्ट्रध्वज देशभक्तीच्या प्रेरणेने प्रत्येक भारतीयाला एकत्र बांधून ठेवेल. केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना, लडाखमधील संसद सदस्य जे टी नामग्याल आणि भारतीय लष्कर प्रमुख एमएम नरवणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हा स्मारकरुपी भव्य राष्ट्रध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद आहे आणि त्याचे वजन (अंदाजे) 1400 किलो आहे.खादीचे काम करणारे कारागीर आणि संबंधित कामगारांनी जवळजवळ 3500 तास अतिरिक्त काम करून हा भव्य राष्ट्रध्वज तयार केला आहे. एकूण 33,750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला हा विशाल ध्वज तयार करण्यासाठी 4600 मीटर इतक्या प्रचंड लांबीचे हाताने विणलेले खादीचे तागे वापरण्यात आले. या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्राचा व्यास 30 फूट आहे. हा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागीर 49 दिवस काम करीत होते.

देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सवसाजरा करण्यासाठी केव्हीआयसीने या प्रचंड ध्वजाची संकल्पना आखली आणि त्यानुसार हा राष्ट्रध्वज तयार करण्यात आला. राष्ट्रध्वजाची हाताळणी तसेच प्रदर्शन अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकतेने होणे आवश्यक असल्यामुळे केव्हीआयसीने हा राष्ट्रध्वज भारतीय लष्कराकडे सुपूर्द केला.  लष्कराच्या जवानांनी मुख्य लेह शहरातील उंच डोंगरमाथ्यावर हा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला. या राष्ट्रध्वजाला जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नये म्हणून लष्कराने ध्वज प्रदर्शित करण्यासाठी चौकटीचा वापर केला आहे. 

या ध्वजाला चारही बाजूंनी नेफा जोडण्यात आला असून त्यासाठी 12 मिलीमीटरची दोरी वापरण्यात आली आहे. या ध्वजासाठी वरच्या  आणि खालच्या बाजूला प्रत्येकी 3 तसेच डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी 3 अशा  उच्च दर्जाच्या एकूण 12 नायलॉन दोऱ्या वापरण्यात आल्या असून त्यांनी सुमारे 3000 किलो वजन घेण्याच्या क्षमतेसह ध्वजाचे वजन विभागून घेतले आहे.

तसेच, यापैकी प्रत्येक दोरीला दोन्ही बाजूंना फास ठेवण्यात आले असून त्यांच्या मदतीने ध्वजाचे वजन एकत्रितपणे पेलता येते आहे. ध्वजाचे सर्व भाग एकमेकांना जोडून शिवून घेतले आहेत आणि नेफ्यामधील दोरी दिसणार नाही अशा बेताने हे जोड शिवण्यात आले आहेत. नेफ्याची आतली किनार रासायनिक लेप लावलेल्या खादीच्या तुकड्यापासून तयार केली आहे जेणेकरून दोऱ्या हलताना होणारे घर्षण कमी होईल आणि ध्वजाच्या कापडाची हानी होणार नाही. राष्ट्रध्वजाच्या रंगांमध्ये मिसळून जाण्यासाठी नेफा देखील तिरंगीच वापरण्यात आला आहे.

***

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1760393) Visitor Counter : 363