पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 27 SEP 2021 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर, 2021 

 

नमस्कार! 

कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रिमंडळामधले माझे सहकारी आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया जी, मंत्रिमंडळातले माझे इतर सहकारी, वरिष्ठ अधिकारीवर्ग, देशभरातून जोडले गेलेले सरकारी आणि खासगी रूग्णालयांमधले आरोग्य अधिकारी, रूग्णालय व्यवस्थापनाशी जोडले गेलेले लोक, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनिंनो! 

21 व्या शतकामध्ये पुढे जाणाऱ्या भारताच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. गेल्या सात वर्षांमध्ये देशामधली आरोग्य सेवा-सुविधा बळकट करण्यासाठी जी मोहीम राबविली जात आहे, ती मोहीम आज एका नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करीत आहे. आणि हा टप्पा, हे वळण काही सामान्य नाही, तर असामान्य टप्पा आहे. आज एका अशा अभियानाचा प्रारंभ होत आहे की, ज्यामध्ये भारतातल्या आरोग्य सुविधांमध्ये क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणण्याची खूप मोठी ताकद आहे. 

मित्रांनो, 

तीन वर्षांपूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या जयंतीनिमित्त पंडितजींना समर्पित आयुष्मान भारत योजना संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली होती. मला आनंद आहे की, आजपासून आयुष्मान भारत डिजिटल अभियान संपूर्ण देशामध्ये सुरू करण्यात येत आहे. हे अभियान, देशातल्या गरीब आणि मध्यम वर्गातल्या रूग्णांसमोर उपचार घेताना येणा-या सर्व समस्या, दूर करण्यामध्ये खूप मोठी भूमिका पार पाडेल. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रूग्णांना संपूर्ण देशातल्या हजारो रूग्णालयांबरोबर जोडण्याचे काम आयुष्मान भारताने केले आहे. आज त्याचाही विस्तार होत आहे. त्यालाही तंत्रज्ञानाचा एक मजबूत मंच मिळत आहे. 

मित्रांनो, 

आज भारतामध्ये ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा उपयोग उत्तम प्रशासनासाठी, प्रशासकीय कामांमध्ये सुधारणा आणण्यासाठी तंत्रज्ञान मोठा आधार ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे सामान्य जनता आपोआपच शक्तिशाली, सबल बनत आहे, ही गोष्ट अभूतपूर्व आहे. डिजिटल भारत अभियानामुळे देशातल्या सामान्य लोकांना डिजिटल तंत्रज्ञानाने जोडून, देशाची ताकद अनेकपटींनी वाढली आहे. आपल्याला तर चांगले माहिती आहेच की, आपला देश अभिमानाने सांगू शकतो, 130 कोटी आधारकार्ड , 118 कोटी मोबाईल वापरकर्ते, जवळपास 80 कोटी इंटरनेट वापरकर्ते, जवळपास 43 कोटी जनधन बँक खाते, इतक्या प्रचंड  प्रमाणात जोडली गेलेली पायाभूत सुविधा जगामध्ये इतरत्र कुठेही नाही. या डिजिटल पायाभूत सुविधेमुळे राशनपासून ते प्रशासनापर्यंत प्रत्येक व्यक्तीला वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. यूपीआयच्या माध्यमातून ‘‘कधीही, कुठेही’’ देवघेवीच्या डिजिटल व्यवहारामुळे भारत जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. अलिकडेच देशामध्ये जे ई-रूपी व्हाउचर सुरू केले आहे, तो सुद्धा एक चांगला उपक्रम आहे. 

मित्रांनो, 

भारताच्या डिजिटल पर्यायांमुळे कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्येही प्रत्येक भारतीयाला खूप मदत झाली आहे. एक नवीन ताकद दिली आहे. आता ज्याप्रमाणे आरोग्य सेतु अॅपमुळे कोरोनाच्या संक्रमणाचा प्रसार होवू नये म्हणून जागरूकता निर्माण करण्याचे काम केले. इतकेच नाही तर संपूर्ण परिस्थिती ओळखून, आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जाणून घेण्याच्या कामी आरोग्य सेतू अॅपने खूप मोठी मदत केली आहे. त्याच प्रकारे, सर्वांना लस, मोफत लसीकरण अभियानाअंतर्गत भारतामध्ये आज जवळपास 90 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत आणि त्याची नोंदणीही झाली आहे. सर्वांनी घेतलेल्या लसीचे प्रमाणपत्र उपलब्ध आहे. यामध्ये ‘को-विन’ची खूप मोठी भूमिका आहे. नोंदणी करण्यापासून ते प्रमाणपत्रापर्यंत इतका मोठा डिजिटल मंच जगातल्या मोठ-मोठ्या देशांकडेही नाही. 

मित्रांनो, 

कोरोना काळामध्ये दूरवैद्यकीय सेवेचाही अभूतपूर्व विस्तार झाला आहे. ई-संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास सव्वा कोटी रूग्णांना दूरवैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे. ही सुविधा दररोज देशाच्या दूर-दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या हजारो देशवासियांना दिली जात आहे. त्यांना घरामध्ये बसून शहरांतल्या मोठ्या रूग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या मोठ-मोठ्या डॉक्टरांबरोबर जोडले जात येते. मान्यवर, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आता तंत्रज्ञानामुळे सहज मिळू शकत आहे. मी आज या कार्यक्रमानिमित्त देशातल्या सर्व डॉक्टरांचे, परिचारिकांचे आणि वैद्यकीय कर्मचारी वर्गाचे अगदी हृदयापासून आभार व्यक्त करू इच्छितो. मग त्यामध्ये लसीकरण असो, कोरोनाच्या रूग्णांवर औषधोपचार करणे असो, त्यांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाविरोधात लढा देत असतान देशाला खूप मोठा आधार मिळला आहे. त्यांनी सर्वांची खूप मदत केली आहे. 

मित्रांनो, 

आयुष्मान भारत- पीएमजेएवायने गरीबांच्या जीवनातली खूप मोठी चिंता दूर केली आहे. आत्तापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त देशवासियांनी या योजनेअंतर्गत मोफत औषधोपचाराच्या सुविधेचा लाभ घेतला आहे आणि यामध्येही निम्मे लाभार्थी आमच्या माता, भगिनी आणि आमच्या कन्या आहेत. ही गोष्ट एक समाधान देणारी आहे, मनाला आनंद देणारी आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती लक्षात घेवून औषधोपचाराचा खर्च टाळण्यासाठी देशातल्या सर्वात जास्त महिला-भगिनी प्रकृतीचा त्रास सहन करतात. घराची चिंता, घरातल्या वाढत्या खर्चाची चिंता, त्यामध्ये स्वतःच्या औषधोपचाराचा खर्च नको असा विचार करतात. घरातल्या इतर लोकांची काळजी घेणाऱ्या आपल्या माता-भगिनी स्वतःवर होणारा खर्च नेहमीच टाळत राहतात. सातत्यानं दुखणं, आजार अंगावर काढत राहतात. आपल्याला काय एखादे औषध घेतले तर बरं वाटेल, कशाला जास्त खर्च करायचा, असे त्या म्हणत असतात. घरातल्या मातेचे मन, सर्व दुःखे झेलत राहते तरीही कुटुंबावर आर्थिक बोझ टाकायचा नाही, असेच माता-भगिनी म्हणत, जगत असतात. 

मित्रांनो, 

ज्यांनी आयुष्मान भारत अंतर्गत आत्तापर्यंत मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला आहे, अथवा सध्या जे उपचार घेत आहे, त्यांच्यापैकी लाखोजण असे आहेत, त्यांनी या योजनेच्या आधी कधीच रूग्णालयात जाण्याचे धाडस केले नव्हते. तितके साहस त्यांच्यात नव्हते. औषधोपचाराच्या खर्चाच्या भितीने ते रूग्णालयामध्ये जाण्याचेच टाळत होते. आणि वेदना सहन करीत होते. जीवनाची गाडी अशीच पुढे नेत होते. मात्र पैशाअभावी रूग्णालयामध्ये जावू शकत नव्हते. त्यांच्या या वेदनेची जाणीव आम्हाला झाली आणि आतून हेलावून टाकले. आयुष्मान भारत योजनेतून औषधोपचार घेणा-या अनेक कुटुंबांना या कोरोना काळामध्ये आणि त्याच्याही आधी मी भेटलो आहे. काही वयोवृद्ध सांगत होते की, मी औषधोपचार घेत नाही कारण मला जाताना आपल्या मुलांवर कर्जाचा डोंगर करायचा नाही. त्यांना आपल्या उपचारासाठी कर्ज काढावे, लागू नये, म्हणून मी रूग्णालयात जात नाही. स्वतः ज्या काही वेदना आहेत, त्या सहन करतो, जर देवाचं बोलावणं आलं तर, लवकर जाईन, म्हणून उपचारच करायला नको, असा विचार अनेक ज्येष्ठ मंडळी करीत होते. आज या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या अनेकांनी पाहिले असेल, आपल्या परिवारामध्ये, किंवा परिसरामध्ये असे अनेक लोक असतात. आपल्यापैकी बहुतांश लोकांनीही तर औषधोपचारासाठी येणारा प्रचंड खर्चाच्या प्रश्नाच्या चिंता केली असणार. 

मित्रांनो, 

आत्ता तर कोरोना काळ आहे. मात्र याआधी, मी देशामध्ये ज्या-ज्यावेळी प्रवास करीत होतो, राज्यांमध्ये जात होतो, त्या त्यावेळी माझा प्रयत्न असायचा की, आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थींना जरूर भेटायचे. मी त्यांना भेटत होतो, त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांच्या वेदना, त्यांचे अनुभव, त्यांचे सल्ले, ऐकून घेण्यासाठी मी त्यांच्याशी थेट बोलत होतो. या गोष्टीची काही प्रसार माध्यमांतून आणि सार्वजनिक रूपाने जास्त चर्चा झाली नाही. परंतु मी, हा आपला नित्यक्रम बनविला होता. आयुष्मान भारताच्या शेकडो लाभार्थींबरोबर मी स्वतः संवाद साधला आहे. काही गोष्टी, अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. एखाद्या वयोवृद्ध मातेने अनेक वर्षे वेदना सहन करावी लागल्यानंतर या योजनेमुळे मुतखड्याची शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.  तसेच एखादा नवतरूण मूत्रपिंडाच्या आजारामुळे अतिशय त्रस्त झाला होता, त्याचा त्रास कमी झाला. कोणा एकाला पायाची वेदना होती, कुणाला मणक्याचा आजार होता, त्या सर्वांचे चेहरे मी कधीच विसरू शकणार नाही. आज आयुष्मान भारत योजना अशा सर्व लोकांसाठी खूप मोठा आधार बनली आहे. काही वेळापूर्वी इथे जी चित्रफीत दाखवण्यात आली, जे कॉफी टेबल पुस्तक प्रकाशित करण्यात आले, त्यामध्ये विशेष करून त्या माता-भगिनींविषयी विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये हजारो कोटी रूपये सरकारने या योजनेसाठी खर्च केले आहेत. त्या निधीतून लाखो परिवार गरीबीच्या दुष्टचक्रात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. कोणालाही आपण गरीब राहावे असे वाटत नसते. कठोर परिश्रम करून, गरीबीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करीत असतात. सर्वजण संधीच्या शोधात असतात. कधीतरी आपल्याला संधी मिळेल आणि या गरीबीच्या चक्रातून आपण बाहेर पडू, असाच विचार सर्वजण करीत असतात, आणि संधीचा शोध घेत असतात. मात्र बरेचदा असे होते की, अचानक कुटुंबामध्ये कुणाला तरी गंभीर आजार होतो, आणि केलेली सर्व मेहनत मातीत जाते. हे कुटुंब पुन्हा पाच-दहा वर्ष मागे फेकले जाते. गरीबीच्या चक्रात अडकत जाते. घरातल्या कुणा एकाचे आजारपण संपूर्ण परिवाराला गरीबाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू देत नाही. आणि म्हणूनच आयुष्मान भारताबरोबरच आरोग्य काळजी, दक्षता यांचीही जोड देण्यात आली आहे, त्यामुळे गरीबांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तर सरकारने दिले आहे. ही देशात केली जात असलेली वर्तमान आणि भविष्यातली एक खूप मोठी गुंतवणूक आहे. 

बंधू आणि भगिनींनो, 

आयुष्मान भारत-डिजिटल अभियान, रूग्णालयांमधील प्रक्रिया अधिक सुलभ-सरल बनविण्यात आली आहे, त्याचबरोबर ईज ऑफ लिव्हिंगही वाढणार आहे. वर्तमानकाळात रूग्णालयांमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्यानुसार सध्या फक्त एका रूग्णालयामध्ये किंवा एका समूहातल्या रूग्णालयामध्ये त्याची मदत होवू शकते. जर रूग्णाला दुस-या रूग्णालयामध्ये किंवा नवीन शहरातल्या रूग्णालयामध्ये जावे लागते, त्यावेळी त्याला पुन्हा एकदा नव्याने त्याच प्रक्रियेतून जावे लागते. डिजिटल आरोग्य विषयक नोंदींच्या अभावी, त्याला अनेक वर्षांपासूनच्या चाचणी अहवालांची फाईल बरोबर घेवून जावी लागते. आणीबाणीची स्थिती आली तर हे सगळे शक्य होत नाही. यामध्ये रूग्ण आणि डॉक्टर अशा दोघांचाही खूप वेळ वाया जातो. अनेक अडचणी निर्माण होतात. रूग्णाच्या त्रासामध्ये भर पडते आणि चाचण्यांमुळे औषधोपचाराचा खर्चही खूप वाढतो. आपण नेहमी पाहतो की, अनेक लोक जवळच्या रूग्णालयामध्ये जातात त्यावेळी त्यांच्याकडे वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल, नोंदी काहीही नसते. अशावेळी तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना पुन्हा अगदी शून्यापासून प्रारंभ करावा लागतो, आणि चाचण्या कराव्या लागतात. सर्व गोष्टी नव्याने करून घ्याव्या लागतात. 

वैद्यकीय पूर्व इतिहासाची नोंद नसल्यामुळे वेळही अधिक लागतो आणि खर्चही वाढतो. कधी-कधी तर उपचारांमध्ये विरोधाभासही आढळतो, त्यामुळे आपल्या खेड्यांमध्ये राहणाऱ्या बंधू-भगिनींना यामुळे खूप अडचणींना सामोरे जावे लागते. एवढेच नाही, डॉक्टरांची वृत्तपत्रांमध्ये कधीही जाहिरात देखील नसते. ऐकीव माहिती असते की अमूक डॉक्टर चांगला आहे, मी गेलो होतो, त्याच्या औषधाने बरे वाटले. आता यामुळे  डॉक्टरांची माहिती प्रत्येकापर्यंत पोहचेल की कोणते मोठे डॉक्टर्स आहेत, कोणते तज्ज्ञ डॉक्टर आहेत, कुणाकडे जायचे आहे, जवळ कोण आहे लवकर कुठे पोहचू शकतो, सर्व सुविधा आणि इतर तुम्हाला माहीत आहेच, आणि मला एक गोष्ट सांगायची आहे,  या सर्व नागरिकांना अशा प्रकारच्या त्रासातून मुक्ती देण्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशन मोठी भूमिका बजावेल.

मित्रांनो ,

आयुष्मान भारत डिजिटल अभियान, आता संपूर्ण देशातील रुग्णालयांच्या डिजिटल आरोग्य सुविधांना एकमेकांशी जोडेल. या अंतर्गत देशवासियांना आता एक डिजिटल आरोग्य ओळखपत्र मिळेल. प्रत्येक नागरिकाची आरोग्य संबंधी माहिती  डिजिटली सुरक्षित राहील. डिजिटल आरोग्य ओळखपत्राच्या माध्यमातून रुग्ण स्वतः आणि डॉक्टर देखील जुनी नोंद गरज पडल्यास पडताळून पाहू शकतील. एवढेच नाही, यामध्ये डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी सारख्या सहकाऱ्यांची देखील नोंदणी होईल. देशातील रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा, औषधांची दुकाने या सर्वांची नोंदणी होईल. म्हणजेच हे डिजिटल मिशन, आरोग्याशी संबंधित प्रत्येक हितधारकाला एकत्र एकाच मंचावर आणेल.

मित्रांनो ,

या अभियानाचा सर्वात मोठा लाभ देशातील गरीब आणि मध्यम वर्गाला होईल. एक सुविधा तर अशी असेल की रुग्णाला देशभरात कुठेही असा डॉक्टर शोधणे सोपे जाईल ज्याला त्याची भाषा समजत असेल आणि त्याच्या आजारावर सर्वोत्तम उपचार करण्याचा त्याला अनुभव असेल. यामुळे रुग्णांना देशातील कानाकोपऱ्यातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होईल. केवळ डॉक्टरच नाही, तर उत्तम चाचण्यांसाठी प्रयोगशाळा आणि औषधांच्या दुकानांचा शोध घेणे सहज शक्य होईल. 

मित्रांनो,

या आधुनिक मंचामुळे उपचार आणि आरोग्यसेवा धोरण आखणीशी संबंधित संपूर्ण परिसंस्था अधिक प्रभावी होणार आहे.  डॉक्टर आणि रुग्णालय या मंचाचा वापर आपल्या सेवेला  दूरस्थ आरोग्य सेवा पुरवण्यासाठी करू शकतील.  प्रभावी आणि विश्वासार्ह माहिती बरोबरच यामुळे उपचारही उत्तम होतील आणि रुग्णांचीही बचत होईल.

बंधू आणि भगिनींनो,

देशात आरोग्य सेवा  सहज आणि  सुलभ बनवण्याचे जे  अभियान आज संपूर्ण देशात सुरु झाले आहे , ते 6-7 वर्षांपासून सुरु असलेल्या निरंतर प्रक्रियेचा एक भाग आहे. गेल्या काही वर्षात भारताने देशात आरोग्याशी संबंधित अनेक दशकांपासूनचे विचार आणि दृष्टीकोनात बदल घडवून आणला आहे. आता भारतात अशा एका आरोग्य मॉडेलवर काम सुरु आहे जे सर्वंकष असेल, समावेशक असेल. एक असे मॉडेल ज्यामध्ये आजारांपासून बचावावर भर असेल, म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, आजारपणात उपचार सुलभ, स्वस्त आणि सर्वांपर्यंत पोहचणारे असावेत.  योग आणि आयुर्वेद सारख्या आपल्या पारंपरिक उपचार पद्धतींवर भर असेल, असे सर्व कार्यक्रम गरीब आणि मध्यम वर्गाला आजारांच्या दुष्टचक्रापासून वाचवण्यासाठी सुरु करण्यात आले आहेत. देशात आरोग्य विषयक सुविधांचा विकास आणि उत्तम उपचार  सुविधा, देशातील कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी, नवीन आरोग्य धोरण आखण्यात आले.  आज देशात एम्स सारख्या खूप मोठया आणि  आधुनिक आरोग्य संस्थांचे जाळे देखील तयार केले जात आहे . प्रत्येक  3 लोकसभा क्षेत्रांमध्ये  एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

मित्रांनो ,

भारतात आरोग्य  सुविधा अधिक उत्तम बनवण्यासाठी गावांमधील वैद्यकीय सुविधा सुधारणे अतिशय गरजेचे आहे. आज देशात गाव आणि घराच्या जवळच प्राथमिक आरोग्यसेवांशी निगडित  नेटवर्कला आरोग्य आणि कल्याण केंद्रांद्वारे मजबूत केले जात आहे. आतापर्यंत अशी सुमारे  80 हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. ही केंद्रे नियमित तपासणी आणि लसीकरण, गंभीर आजारांची प्राथमिक तपासणी आणि अनेक प्रकारच्या चाचणी सुविधांनी सुसज्ज आहेत.  या केंद्रांच्या माध्यमातून जागरूकता वाढावी आणि वेळेवर गंभीर आजारांचे निदान व्हावे हा प्रयत्न आहे. 

मित्रांनो ,

कोरोना जागतिक महामारीच्या या काळात वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या निर्मितीला सातत्याने गती दिली जात आहे. देशातील जिल्हा रुग्णालयांमध्ये गंभीर आजार विभागाची पायाभूत संरचना तयार केली जात आहे, मुलांच्या उपचारांसाठी जिल्हा आणि तालुक्याच्या रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा निर्माण केल्या जात आहेत. जिल्हा स्तरीय रुग्णालयांमध्ये स्वतःचे ऑक्सिजन संयंत्र देखील बसवण्यात येत आहेत.

मित्रांनो ,

भारताच्या आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात देखील अभूतपूर्व सुधारणा होत आहेत.  7-8 वर्षात पूर्वीच्या तुलनेत आज अधिक डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय मनुष्यबळ देशात तयार होत आहे. केवळ मनुष्यबळच नाही तर आरोग्याशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन , औषधे आणि उपकरणांमधील  आत्मनिर्भरता याबाबत देशात जलद गतीने काम सुरु आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा विकास आणि निर्मितीत भारताने ज्याप्रकारे आपले  सामर्थ्य दाखवले आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. आरोग्य उपकरणे आणि औषधांच्या कच्च्या मालासाठी पीएलआय योजनामुळे देखील  या क्षेत्रात  आत्मनिर्भर भारत अभियानाला मोठे बळ मिळत आहे.

मित्रांनो ,

उत्तम वैद्यकीय व्यवस्थेबरोबरच, गरीब आणि मध्यम वर्गाचा औषधांवरील खर्च कमीत कमी होणे हे देखील आवश्यक आहे. म्हणूनच केंद्र सरकारने अत्यावश्यक औषधे, शस्त्रक्रिया सामग्री, डायलिसिस, सारख्या अनेक सेवा आणि सामानांचे दर कमी ठेवले आहेत. भारतातच बनणाऱ्या जगातील  श्रेष्ठ जेनरिक औषधांचा उपचारांमध्ये जास्तीत जास्त वापर करण्यासाठी  प्रोत्साहन देण्यात आले आहे.  8 हजार पेक्षा अधिक जनऔषधी केंद्रांनी तर गरीब आणि मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.  जनऔषधी केंद्रांमधून औषधे खरेदी करणाऱ्या रुग्णांशी गेल्या काही दिवसात अनेकदा संवाद साधण्याची संधी  मिळाली आणि मी पाहिले आहे की काही कुटुंबांमध्ये अशा लोकांना वयामुळे किंवा काही आजारांमुळे दररोज काही औषधे घ्यावी लागतात.या जन औषधी केंद्रांमुळे अशा मध्यमवर्गीय कुटुंबांची मासिक हजार, पंधराशे, दोन हजार रुपयांची बचत होत आहे.

मित्रांनो ,

एक योगायोग हा देखील आहे की आजचा हा कार्यक्रम जागतिक पर्यटन दिनी होत आहे . काही लोक असा विचार करत असतील की आरोग्य सेवा कार्यक्रमाचा पर्यटनाशी काय संबंध आहे? तर आरोग्याचा पर्यटनाशी एक मोठा मजबूत संबंध आहे. कारण जेंव्हा आपल्या पायाभूत सुविधा एकात्मिक असतात, मजबूत असतात तेंव्हा त्याचा प्रभाव पर्यटन क्षेत्रावर देखील पडतो. कुठल्याही पर्यटकाला अशा ठिकाणी यायला आवडेल का जिथे कुठल्याही आपत्कालीन स्थितीत उपचारांच्या उत्तम सुविधाच नसतील ? आणि कोरोना नंतर तर आता हे महत्वपूर्ण झाले आहे. जिथे सर्वात जास्त लसीकरण होईल, तिथे जाणे पर्यटकांना अधिक सुरक्षित वाटेल आणि तुम्ही पाहिले असेल,  हिमाचल असेल, उत्तराखंड असेल, सिक्किम असेल, गोवा असेल, अंदमान असेल ही जी आपली पर्यटन स्थळे असलेली राज्ये आहेत तिथे खूप जलद गतीने लसीकरणावर भर दिला जात हे जेणेकरून पर्यटकांच्या मनात एक विश्वास निर्माण व्हावा. येत्या काही वर्षात हे निश्चित आहे की सर्व बाबी अधिक मजबूत होतील. ज्या-ज्या ठिकाणी उत्तम आरोग्य विषयक पायाभूत सुविधा असतील तिथे पर्यटनाच्या संधी अधिक उत्तम असतील.  म्हणजे रुग्णालय आणि आदरातिथ्य एकमेकांबरोबर चालतील.

मित्रांनो ,

आज जगाचा भारतातील डॉक्टर्स आणि आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास सातत्याने वाढत आहे.जगभरात आपल्या देशातील डॉक्टरांनी खूप प्रतिष्ठा मिळवली आहे. भारताचा गौरव वाढवला आहे. जगातील मोठमोठ्या लोकांना तुम्ही विचारले तर ते सांगतील, हो माझा एक डॉक्टर भारतीय आहे, म्हणजेच भारताच्या डॉक्टरांना चांगली मागणी आहे. भारतात पायाभूत सुविधा एकत्र आल्या तर जगभरातून आरोग्य  संबंधी उपचारांसाठी भारतात येणाऱ्यांची वाढतच राहणार आहे. मर्यादित पायाभूत सुविधा असूनही लोक भारतात उपचार करून घेण्यासाठी येतात आणि कधी-कधी तर त्यांच्या भावनिक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्या शेजारी देशांमधील  लहान मुले  जेंव्हा इथे येतात, बरे होऊन जातात संपूर्ण कुटुंब आनंदी झाल्याचे पाहून समाधान वाटते. 

मित्रांनो ,

आपला लसीकरण कार्यक्रम,  Co-Win तंत्रज्ञान मंच आणि औषध निर्मिती उद्योगाने आरोग्य क्षेत्रात भारताची  प्रतिष्ठा आणखी वाढवली आहे. जेंव्हा  आयुष्मान भारत डिजिटल अभियान द्वारा तंत्रज्ञानाची नवी  व्यवस्था  विकसित होईल, तेव्हा जगातील कुठल्याही देशातील रुग्णांना भारतीय डॉक्टरांशी सल्ला मसलत करणे, उपचार करणे, आपले रिपोर्ट त्यांना पाठवून त्यांचा सल्ला घेणे खूप सोपे होईल. आणि निश्चितपणे याचा  प्रभाव आरोग्य पर्यटनावरही पडेल.

मित्रांनो,

निरोगी भारताचा मार्ग, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात भारताचे मोठे संकल्प सिद्धीला नेण्यात, मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी खूप आवश्यक आहे. यासाठी आपल्यला एकत्रित प्रयत्न सुरु ठेवावे लागतील. मला विश्वास आहे, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती, आपले डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय संस्था या नवीन व्यवस्थेला वेगाने आत्मसात करतील . पुन्हा एकदा, आयुष्मान भारत- डिजिटल अभियानासाठी  मी देशाला खूप-खूप शुभेच्छा देतो.  !!

खूप-खूप  धन्यवाद !

 

* * *

S.Thakur/S.Bedekar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1758675) Visitor Counter : 340