आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-अमेरिका आरोग्यविषयक संवाद 2021


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी चौथ्या भारत-अमेरिका आरोग्यविषयक संवाद कार्यक्रमाला संबोधित केले

“आपल्या देशांमधील सहकारी संबंधांमुळे वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक आरोग्यविषयक आव्हानांच्या व्यवस्थापनात प्रगती होईल”: डॉ. भारती प्रवीण पवार

Posted On: 27 SEP 2021 2:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2021

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी भारताकडे यजमानपद असलेल्या आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या भारत-अमेरिका आरोग्यविषयक संवादाच्या उद्घाटनपर सत्राला आज संबोधित केले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002P3RT.jpg

या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व अमेरिकी आरोग्य आणि मनुष्यसेवा विभागाच्या जागतिक व्यवहार कार्यालयाच्या संचालक लॉईस पेस यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकी आरोग्य आणि मनुष्यसेवा विभागाच्या जागतिक व्यवहार कार्यालयाच्या आशिया-प्रशांत विभागाच्या संचालक मायकेल मॅककॉनेल, डॉ.मिशेल वुल्फ, डायना एम बेन्सील हे देखील उपस्थित होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003BCKU.jpg

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ.रेणू स्वरुप, भारतीय आरोग्य संशोधन मंडळाचे महासंचालक डॉ.बलराम भार्गव तसेच केंद्रीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिवांसह आरोग्य मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी या संवादात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

भारत आणि अमेरिका या देशांदरम्यान आरोग्य क्षेत्रामध्ये सध्या असलेल्या सहकारी संबधांबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठीचा उत्तम मंच म्हणून हा दोन-दिवसीय संवाद कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. साथरोगविषयक संशोधन आणि तपासणी, लसी विकसित करणे, एकसमान आरोग्य, प्राणीजन्य आणि प्राण्यांपासून मनुष्याला होणारे रोग, आरोग्य यंत्रणा आणि आरोग्यविषयक धोरणे यांना बळकटी आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या क्षेत्रांबाबत चर्चा करण्यासाठीच्या विषयांचे नियोजन या चर्चेच्या फेरीत करण्यात आले आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004TG6H.jpg

कोविड-19 महामारीच्या काळात भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी एकमेकांना दिलेल्या दृढ पाठिंब्याचा उल्लेख करून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी बोलताना दोन्ही देशांमधील परस्पर ऐक्याचा ठळकपणे उल्लेख केला. संशोधन आणि विकास या क्षेत्रात, विशेषतः औषधे, उपचार सामग्री आणि लसीचे विकसन यांच्या संदर्भातील कार्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याचे संबंध ज्या प्रकारे विकसित झाले आहेत त्याबद्दल कौतुक व्यक्त करत, या संबंधांचे प्रतिबिंब कोविड-19 लस विकसित करण्याच्या कामात भारतीय लस उत्पादक कंपन्या आणि अमेरिकास्थित संस्था यांच्या एकत्रित येण्यातून दिसून येते असे त्या म्हणाल्या.

मानसिक आरोग्याबाबत 2020 मध्ये या देशांदरम्यान झालेल्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून त्यांनी दोन्ही देशांमधील आरोग्य क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध वाढले आहेत याची पोचपावती दिली. आरोग्यविषयक काळजी आणि संरक्षण, संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार, आरोग्य यंत्रणा तसेच आरोग्यविषयक धोरणे यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांबाबत प्रमुख क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच अमेरिकेच्या आरोग्य आणि मनुष्यसेवा विभाग यांच्या दरम्यान आणखी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.

आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि जागतिक आरोग्यविषयक आव्हानांच्या व्यवस्थापनासाठी मदत व्हावी म्हणून सुनिश्चित रचना आणि प्रमाणित शास्त्रीय दृष्टीकोन यांच्या मदतीने संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी नव्याने उदय पावणाऱ्या क्षेत्रांमध्ये लक्ष केंद्रीत करण्याची गरज डॉ. पवार यांनी पुन्हा व्यक्त केली. सरकारी आणि खासगी क्षेत्राने एकत्र येऊन काम करावे आणि अभिनव संशोधनातून आरोग्य यंत्रणेतील विषमतेशी लढण्यासाठी त्यांच्या शक्तींचा एकत्रितपणे वापर करावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

या दोन दिवसीय संवाद कार्यक्रमाची सुरुवात करताना त्या म्हणाल्या की, हा मंच सर्व सहभागींना विस्तृत चर्चेसाठी संधी उपलब्ध करून देईल आणि या चर्चेचा उपयोग भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील बहुविध संस्थांमध्ये आरोग्य विषयाशी संबंधित भागीदारीची कक्षा आणखी रुंदावण्यासाठी करता येईल.


* * *

S.Thakur/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1758543) Visitor Counter : 281