माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले लडाखमधील हंबोटिंग ला येथे दूरदर्शन/ आकाशवाणी ट्रान्समीटर्सचे उदघाटन
हंबोटिंग ला सारख्या दुर्गम आणि सीमावर्ती भागात प्रक्षेपणासाठी प्रसार भारतीचे सर्वाधिक उंचीचे ट्रान्समीटर्स
Posted On:
25 SEP 2021 4:26PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री श्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज लडाखमधील कारगिलजवळ हंबोटिंग ला येथे दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या उच्च शक्तीचे ट्रान्समीटर्स राष्ट्राला समर्पित केले. 10 KW ट्रान्समीटर हे देशातील सर्वाधिक उंचीचे दूरदर्शन आणि रेडिओ ट्रान्समीटर आहेत, जे समुद्रसपाटीपासून 4054 मीटर (सुमारे 13,300 फूट) उंचीवर स्थित आहेत. लेह येथील ट्रान्समीटर 3501 मीटर (सुमारे 11,450 फूट) उंचीवर आहेत.
यावेळी मंत्र्यांनी नमूद केले की प्रतिकूल हवामान आणि भौगोलिक प्रदेश लक्षात घेता हंबोटिंग ला हे ठिकाण सर्वात प्रतिकूल ठिकाणांपैकी एक आहे. अशा प्रतिकूल हवामानात प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल अभियंते आणि कामगारांच्या चमूचे अनुराग ठाकूर यांनी कौतुक केले. ट्रान्समीटरचा पल्ला 50 किलोमीटरपेक्षा जास्त त्रिज्येचा आहे. कारगिलच्या दुर्गम सीमावर्ती भागातील सुमारे 50,000 लोकसंख्येला या ट्रान्समीटर्स चा लाभ होईल हे लक्षात घेत ठाकूर म्हणाले की, ही लोकसंख्या देशाच्या इतर भागांच्या तुलनेत कमी वाटेल तथापि सीमावर्ती भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी भारत सरकारची बांधिलकी यातून दिसून येते. 1 ऑक्टोबर 2021 पासून डीडी काशीरसाठी लडाखचे योगदान दररोज 30 मिनिटांवरून एक तास असे दुप्पट केले जाईल अशी घोषणाही मंत्र्यांनी केली.
श्री ठाकूर म्हणाले की, रेडिओ आणि दूरदर्शनच्या मजबूत सिग्नलद्वारे सीमावर्ती भागात पोहोचणे हा सरकारच्या प्रसारण धोरणांचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मंत्री म्हणाले की जम्मू -काश्मीर आणि लडाखच्या संवेदनशील सीमावर्ती भागातील लोकांना योग्य माहिती पुरवण्यापर्यंतच हे गरजेचे नाही तर शेजारील शत्रू राष्ट्रांकडून होणाऱ्या प्रचाराचा सामना करण्यासाठी देखील आवश्यक आहे. सीमावर्ती भागातील प्रादेशिक संपर्क मजबूत झाल्याने दर्शकांना/श्रोत्यांना देशाची धोरणे, बातम्या आणि चालू घडामोडींबद्दल पुरेशी माहिती जाणून घेण्याबरोबरच एकाच वेळी विविध कार्यक्रमांद्वारे मनोरंजनाचाही आस्वाद घेता येतो.
दूरदर्शन आणि रेडिओ वाहिन्या सामान्य लोकांसाठी सुलभ करण्यासाठी प्रसारभारती बातम्या, मनोरंजन, शिक्षण इत्यादी विविध प्रकारांमध्ये 160 हून अधिक दूरदर्शन वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्या डीडी फ्री डिश असलेल्या कुटुंबांना मोफत मासिक शुल्क न घेता उपलब्ध करून देत आहे. अनोख्या फ्री टू एअर मॉडेलने डीडी फ्री डिशला सर्वात मोठे डीटीएच व्यासपीठ बनवले आहे जे 4 कोटींपेक्षा जास्त घरांपर्यंत पोहोचले आहे.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758035)
Visitor Counter : 287