पंतप्रधान कार्यालय

गोव्यामधील कोविड प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचे लाभार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 18 SEP 2021 8:24PM by PIB Mumbai

 

गोव्याचे उर्जावान आणि लोकप्रिय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, गोव्याचे सुपुत्र श्रीपाद नाईक, केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी डॉक्टर भारती पवार, गोव्याचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्व कोरोना योद्धे, बंधू आणि भगिनींनो!

गोंयच्या म्हजा मोगाल भावा बहिणींनो, तुमचे अभिनंदन.

तुम्हा सर्वांना श्री गणेश उत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा. उद्या अनंत चतुर्दशीच्या पवित्र प्रसंगी आपण सर्वच जण बाप्पांना निरोप देणार, हातात अनंत सूत्र देखील बांधणार. अनंत सूत्र म्हणजे जीवनात सुख-समृद्धी, दीर्घायुष्याच्या आशीर्वाद.

या पवित्र दिवसाच्या आधी गोव्याच्या लोकांनी आपल्या हातावर, बाहुवर जीवन रक्षण सूत्र म्हणजेच लस टोचण्याचे काम देखील पूर्ण केले आहे. गोव्याच्या प्रत्येक व्यक्तीने लसीची एक मात्रा घेतली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये ही अतिशय मोठी गोष्ट आहे यासाठी गोव्याच्या सर्व सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन.

 

मित्रांनो,

गोवा एक असे राज्य आहे जिथे भारताच्या विविधतेचे दर्शन घडते. पूर्व आणि पश्चिम यांची संस्कृती, राहणीमान खाण्यापिण्याच्या सवयी ज्या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात येथे गणेश उत्सव देखील साजरा होतो, दिवाळी देखील उत्साहात साजरी केली जाते आणि नाताळच्या काळात तर गोव्याची चमक आणखीनच वाढते. हे करत असताना गोवा आपल्या परंपरा देखील जपत असते. एक भारत श्रेष्ठ भारत ही ही भावना सातत्याने बळकट करणार्‍या गोव्याच्या प्रत्येक कामगिरीबाबत केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला आनंद आहे अभिमान आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

या महत्त्वाच्या प्रसंगी मला माझे मित्र आणि सच्चे कर्मयोगी स्वर्गवासी मनोहर पर्रिकर यांची आठवण होत आहे. 100 वर्षातल्या या सर्वात मोठ्या संकटाच्या काळात गोव्याने ज्याप्रकारे लढा दिला आहे अशावेळी पर्रिकर जर आपल्यात असते तर या कामगिरीचाया सिद्धीचा त्यांना देखील अभिमान वाटला असता. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात वेगवान लसीकरण मोहिमेमध्ये सर्वांना लस डमोफत लसच्या यशामध्ये गोवा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मुसळधार पाऊस चक्रीवादळ पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना गोव्याने मोठ्या धैर्याने तोंड दिले आहे. या नैसर्गिक संकटांच्या काळात देखील प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा लढा अतिशय शौर्याने लढला आहे. या नैसर्गिक आपत्तींच्या काळात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग कायम राखल्याबद्दल आरोग्य कर्मचारी टीम गोवा आणि प्रत्येकाचेच मी खूप खूप अभिनंदन करत आहे. या ठिकाणी अनेक सहकाऱ्यांनी मला त्यांचे जे अनुभव सांगितले त्यावरून हे अगदी स्पष्ट दिसत आहे की ही मोहीम किती खडतर होती दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या ओलांडून, लसींना सुरक्षित राखून दूर दूर अंतरावर त्या पोहोचवण्यासाठी कर्तव्य भावनेची देखील गरज असते, समाजाविषयी जिव्हाळा आवश्यक असतो आणि अदम्य साहसाची देखील गरज असते. तुम्ही सर्व न थांबता, न थकता मानवतेची सेवा करत आहात. तुम्ही केलेली ही सेवा सदैव लक्षात राहील.

 

मित्रांनो,

सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयासया सर्व गोष्टी  कशा प्रकारे उत्तम परिणाम साध्य करतात हे गोव्याने, गोव्याच्या सरकारने, गोव्याच्या नागरिकांनी गोव्याच्या कोरोना योद्ध्यांनी, आघाडीवरील कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले आहे. सामाजिक आणि भौगोलिक आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्याप्रकारे गोव्याने समन्वय दाखवला आहे तो अतिशय प्रशंसनीय आहे.  प्रमोद जी तुमचे आणि तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन.  राज्यात दूर दूर अंतरावर, कॅनाकॉना सब डिव्हिजन मध्येही राज्याप्रमाणेच वेगाने लसीकरण होणे याचाच दाखला देत आहे. गोव्याने आपल्या लसीकरणाचा वेग कमी होऊ दिला नाही याचा मला आनंद आहे यावेळी देखील आपण येथे  बोलत असताना राज्यात लसींच्या दुसऱ्या मात्रेसाठी लसीकरण उत्सव सुरू आहे आहे. अशा प्रामाणिक, एकनिष्ठ प्रयत्नांमुळेच संपूर्ण लसीकरण मोहिमेत, गोवा देशातील अग्रणी राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.  केवळ गोव्यातील लोकांनाच नाही तर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना, बाहेरून येणाऱ्या कामगारांना देखील लसी दिल्या जात आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे.

 

मित्रांनो,

आज या प्रसंगी मी देशातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, प्रशासन यामधील सर्व लोकांचे देखील अभिनंदन करत आहे. तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांमुळेच काल भारताने एकाच दिवसात अडीच  कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला. जगातील मोठमोठे आणि समृद्ध आणि सामर्थ्यवान मानल्या जाणाऱ्या देशांना देखील हे करता आले नव्हते. काल आपण पाहत होतो की कशाप्रकारे देश टक लावून कोविड डॅशबोर्डकडे पाहात होता.  वाढणाऱ्या आकड्यांना पाहून उत्साह निर्माण होत होता.

काल दर तासाला 15 लाखापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे, दर मिनिटाला 26 हजार पेक्षा जास्त लसीकरण झाले, दर सेकंदाला 400 पेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली. देशातल्या कानाकोपऱ्यात उभारण्यात आलेल्या एक लाखांपेक्षा जास्त लसीकरण केंद्रांवर लोकांना लसी देण्यात आल्या. भारताची आपली स्वतःची लस, लसीकरणासाठी इतके मोठे जाळे, कौशल्यप्राप्त मनुष्यबळ यातून भारताचे सामर्थ्य प्रदर्शित होत आहे.

 

मित्रांनो,

कालची जी तुमची कामगिरी आहे, ती संपूर्ण जगात केवळ लसीकरणाच्या आकड्यांवर आधारित नाही तर भारताकडे केवढे सामर्थ्य आहे याची ओळख जगाला होणार आहे. आणि यासाठी या कामगिरीचे गौरवगान करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य देखील आहे आणि आणि तो स्वभाव देखील असला पाहिजे. मित्रांनो, आज या ठिकाणी मला माझे मनोगत देखील व्यक्त करायचे आहे. वाढदिवस तर किती आले आणि किती गेले. मी नेहमीच या गोष्टींपासून अलिप्त राहिलो आहे, या गोष्टींपासून लांब राहिलो आहे. पण माझ्या संपूर्ण आयुष्यात कालचा दिवस माझ्यासाठी अतिशय भावना उचंबळून आणणारा दिवस होता वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. लोक वेगवेगळ्या प्रकारे आपला वाढदिवस साजरा देखील करतात आणि जर साजरा करत असतील तर तर त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. पण तुम्हा सर्वांच्या प्रयत्नांमुळे कालचा दिवस माझ्यासाठी अतिशय विशेष दिवस ठरला. वैद्यकीय क्षेत्रातील जे लोक, गेल्या दीड-दोन वर्षांपासून दिवस-रात्र काम करत आहेत, आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाशी लढण्यासाठी देशवासीयांची मदत करत आहेत. त्यांनी काल ज्याप्रकारे लसीकरणाचा विक्रम करून दाखवला आहे. ती अतिशय मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाने यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे लोकांनी सेवाभावाने हे काम केले आहे. त्यांची करुणेची भावना, कर्तव्याची भावना यामुळेच अडीच कोटी मात्रा देणे शक्य झाले आणि मला असे वाटते की लसीकरणाची प्रत्येक मात्रा एक जीव वाचवण्यासाठी मदत करत असते. अडीच कोटी पेक्षा जास्त जास्त लोकांना इतके मोठे सुरक्षा कवच इतक्या कमी कालावधीत मिळणे, मनाला खूप मोठे समाधान देत आहे. वाढदिवस येतील आणि जातील पण कालचा दिवस माझ्या मनात कायम कोरला गेला आहे. अविस्मरणीय बनला आहे. यासाठी मी जितके आभार व्यक्त करेन ते कमी आहेत. मी मनापासून देशवासियांना नमन करत आहे.सर्वांचे आभार व्यक्त करत आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

भारताचे लसीकरण अभियान, केवळ आरोग्याचे सुरक्षा  कवच नाही तर एक प्रकारे उपजीविकेच्या सुरक्षेचे देखील  कवच आहे. आता आपण पाहिले तर हिमाचलमध्ये  लसीच्या पहिल्या मात्रेचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहेगोवा इथे ही 100 टक्के झाले आहे, चंदीगड आणि लक्षद्वीपमध्येही सर्व पात्र व्यक्तींना पहिली मात्रा देण्यात आली आहे. सिक्कीममध्ये देखील लवकरच 100 टक्के  लसीकरणाचा टप्पा पार होणार आहे. अंदमान निकोबार, केरळ, लडाख, उत्तराखंड, दादरा आणि नगर हवेली देखील यापासून खूप दूर नाहीत.

 

मित्रांनो,

याबाबत खूप चर्चा झाली नाही, मात्र भारताने आपल्या लसीकरण अभियानात पर्यटन क्षेत्राशी संबंधित राज्यांना खूप प्राधान्य दिले आहे. सुरुवातीला नाही सांगितलेकारण त्यावरूनही राजकारण सुरु होते. मात्र आपली पर्यटन स्थळे लवकरात लवकर सुरु होणे हे खूप आवश्यक होते. आता उत्तराखंडमध्येही चारधाम यात्रा शक्य होईल.  या सर्व प्रयत्नांमध्ये गोव्यात 100 टक्के लसीकरण होणे ही  खूप विशेष बाब आहे.

पर्यटन क्षेत्राला पुरुज्जीवित करण्यात गोव्याची खूप महत्वपूर्ण भूमिका आहे.

तुम्हीच विचार करा, हॉटेल उद्योगातील लोक असतील, टॅक्सी चालक असतील, फेरीवाले असतील, दुकानदार असतील, जेव्हा या सर्वांचे  लसीकरण झाले असेल तेव्हा पर्यटक देखील मनात सुरक्षिततेची भावना घेऊन येतील. आता गोवा जगातील त्या निवडक आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट झाला आहे जिथे लोकांना लसीचे सुरक्षा कवच मिळाले आहे.

 

मित्रांनो,

आगामी पर्यटन हंगामात इथे पूर्वीप्रमाणेच पर्यटन उपक्रम सुरु रहावेत , देश-विदेशातील  पर्यटकानी इथे आनंद लुटावा  ही आपणा सर्वांची इच्छा आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण  कोरोनाशी संबंधित सावधानतेच्या उपायांवर तेवढेच लक्ष देऊ जेवढे लसीकरणावर देत आहोत. कोरोना संसर्ग कमी झाला  आहे मात्र अजूनही आपण या विषाणूला कमी लेखता कामा नये. सुरक्षितता आणि स्वच्छतेवर इथे जेवढा भर दिला जाईलतेवढ्याच मोठ्या संख्येने पर्यटक इथे येतील.

 

मित्रांनो,

केंद्र सरकारने देखील अलिकडेच पर्यटकांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. भारतात येणाऱ्या पाच  लाख पर्यटकांना निःशुल्क व्हिसा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवास आणि  पर्यटन क्षेत्रातील हितधारकाना सरकारी हमीसह 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. नोंदणीकृत पर्यटन गाईड म्हणून काम करणाऱ्यांना देखील एक  लाख         रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  केंद्र सरकार यापुढेही देशाच्या पर्यटन क्षेत्राला वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक असे प्रत्येक पाऊल उचलण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

मित्रांनो,

गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आकर्षक बनवण्यासाठी, तिथले शेतकरी, मच्छिमार  आणि अन्य लोकांच्या सुविधेसाठी पायाभूत विकासाला डबल इंजिन सरकारच्या दुहेरी शक्तीची जोड मिळत आहे. विशेषतः कनेक्टिविटीशी संबंधित पायाभूत प्रकल्पांवर गोव्यात अभूतपूर्व काम होत आहे.  'मोपा' इथे  बनत असलेला ग्रीनफील्ड विमानतळ येत्या काही महिन्यात बांधून तयार होईल. या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी सुमारे 12 हजार कोटी रुपये खर्चून  6 पदरी  एक आधुनिक महामार्ग तयार केला जात आहे. केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामातच गेल्या काही वर्षात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक गोव्यात झाली आहे.

ही देखील आनंदाची बाब आहे की उत्तर गोव्याला दक्षिण गोव्याशी जोडण्यासाठी 'झुआरी ब्रिज' चे लोकार्पण पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहे. जसे की तुम्ही जाणता, हा पूल पणजीला 'मडगाव' शी जोडतो. मला सांगण्यात आले आहे की  गोवा मुक्ति संग्रामाच्या अनोख्या गाथेचा  साक्षी 'अग्वाद' किल्ला देखील लवकरच लोकांसाठी पुन्हा खुला केला जाणार आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

गोव्याच्या विकासाचा जो वारसा  मनोहर पर्रिकर मागे  ठेवून गेले आहेत तो  माझे मित्र डॉ. प्रमोद जी आणि त्यांची  टीम समर्पित भावनेने पुढे नेत  आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात जेव्हा  देश आत्मनिर्भरतेच्या नव्या संकल्पासह पुढे जात असताना गोव्यानेही स्वयंपूर्ण गोव्याचा संकल्प केला आहे. मला सांगण्यात आले आहे की आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा या संकल्पाअंतर्गत गोव्यात  50 हून अधिक सुट्या भागांच्या निर्मितीवर काम सुरु आहे. यावरून हे दिसून येते की  गोवा राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी किती गांभीर्याने काम करत आहे.

 

मित्रांनो,

आज गोवा केवळ कोविड लसीकरणात अग्रेसर नाही तर विकासाच्या अनेक बाबतीत देशातील अव्वल राज्यांपैकी एक आहे. गोव्याचा जो शहरी आणि ग्रामीण भाग आहे, तो पूर्णपणे उघडयावरील शौचापासून मुक्त होत आहे. वीज आणि पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांच्या बाबतीतही गोव्यात चांगले काम होत आहे.  गोवा हे देशातील असे  राज्य आहे जिथे शंभर टक्के विद्युतीकरण झाले आहे. प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याच्या बाबतीत तर गोव्याने कमालच  केली आहे. गोव्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय आहे. जल जीवन अभियानाअंतर्गत मागील 2 वर्षांत देशाने आतापर्यंत 5 कोटी कुटुंबांना पाईपद्वारे पाण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्याप्रकारे गोव्याने हे अभियान पुढे नेले आहे,  ते 'सुशासन' आणि  'राहण्यास सुलभ ' बाबत  गोवा सरकारची प्राथमिकता  स्पष्ट करते.

 

बंधू आणि भगिनींनो,

सुशासनाप्रती हीच वचनबद्धता कोरोना काळात गोवा सरकारने दाखवली आहे. विविध प्रकारची आव्हाने असूनही केंद्र सरकारने जी काही मदत गोव्यासाठी पाठवली, ती जलद गतीने, कुठल्याही भेदभावाशिवाय प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहचवण्याचे  काम गोव्याच्या टीमने केले आहे. प्रत्येक गरीब, प्रत्येक मच्छिमार बांधवापर्यंत मदत पोहचवण्यात कोणतीही कसर सोडण्यात आली    नाही. गेले अनेक महिने गोव्याच्या गरीब कुटुंबांना मोफत शिधा प्रामाणिकपणे पोहचवला जात आहे. मोफत गॅस सिलेंडर मिळाल्यामुळे गोव्याच्या अनेक भगिनींना कठीण काळात आधार मिळाला आहे.

गोव्याच्या शेतकरी कुटुंबांना  पीएम किसान सम्मान निधि मधून कोट्यवधी   रुपये थेट बँक खात्यात मिळाले आहेत.  कोरोना काळातच इथल्या छोट्या शेतकऱ्यांना  मिशन मोडवर  किसान क्रेडिट कार्ड मिळाली आहेत. एवढेच नाही, गोव्याचे  गुराखी आणि मच्छिमारांना प्रथमच मोठ्या संख्येने किसान क्रेडिट कार्ड  सुविधा मिळाली आहे. पीएम स्वनिधी योजनेंतर्गत देखील गोव्यात फेरीवाले आणि ठेल्यांच्या माध्यमातून व्यापार करणाऱ्याना जलद गतीने      कर्जपुरवठा करण्याचे काम सुरु आहे. या सर्व प्रयत्नांमुळे गोव्यातील लोकांना पुराच्या संकटादरम्यानही  खूप मदत मिळाली आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

गोवा अमर्याद संधी असलेला प्रदेश आहे. गोवा हे देशातील केवळ एक राज्य   नाही तर ब्रांड इंडियाची देखील एक सशक्त ओळख आहे. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की गोव्याच्या या भूमिकेचा आपण आणखी विस्तार करावा. गोव्यात  आज जी चांगली कामे होत आहेत, त्यात निरंतरता खूप  आवश्यक आहे. दीर्घ काळानंतर गोव्याला राजकीय स्थैर्य आणि सुशासनाचा लाभ मिळत आहे.

ही मालिका गोव्यातील लोक अशीच कायम राखतील या इच्छेसह तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन.  प्रमोद जी आणि त्यांच्या पूर्ण टीमचे अभिनंदन.

सगल्यांक देव बरें करूं

धन्यवाद !

***

Jaydevi PS/S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1756121) Visitor Counter : 200