रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
देशाची सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी आणीबाणीच्या स्थितीत विमान उतरविण्यासाठीच्या सुविधा अन्य 19 ठिकाणी विकसित करणार - नितीन गडकरी
Posted On:
09 SEP 2021 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, देशाची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी अन्य 19 ठिकाणी आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठीच्या 'इमर्जन्सी लँडिंग' सुविधा विकसित केल्या जातील. संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्यासह राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्ग 925ए वर 'इमर्जन्सी लँडिंग' सुविधेचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, ही महामार्गावरील विमानासाठीची धावपट्टी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सीमांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने देशाची सुरक्षा आणखी बळकट करेल.
श्री गडकरी यांनी सांगितले की, राजस्थानमधील फलोदी - जैसलमेर रस्ता आणि बाडमेर - जैसलमेर रस्त्यावर, पश्चिम बंगालमधील खरगपूर - बालासोर रस्ता,खरगपूर - केंझार रस्ता आणि पनागढ/केकेडी जवळ,तामिळनाडूमध्ये पुदुचेरी रस्त्यावर चेन्नई येथे, आंध्र प्रदेशात नेल्लोर - ओंगोले रस्ता आणि ओंगोले - चिलाकलुरिपेट रस्ता , हरियाणातील मंडी डबवाली ते ओढन रस्त्यावर, पंजाबमधील संगरूरजवळ,गुजरातमधील भुज-नलिया आणि सुरत-बडोदा रस्त्यावर, जम्मू-काश्मीरमध्ये बनिहाल-श्रीनगर रस्त्यावर, आसाममधील लेह/न्योमा क्षेत्र आणि जोरहाट-बाराघाट रस्त्यावर, शिवसागर जवळ , बागडोगरा-हाशिमारा रस्ता, हाशिमारा-तेजपूर मार्ग आणि हाशिमारा-गुवाहाटी रस्ता या देशातील अन्य 19 ठिकाणी आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी 'इमर्जन्सी लँडिंग' सुविधा विकसित केल्या जातील.
मंत्री म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम विक्रमी वेगाने केले जात आहे. आता आपले राष्ट्रीय महामार्ग देखील लष्कराला उपयोगी पडतील, ज्यामुळे आपला देश अधिक सुरक्षित होईल आणि आणीबाणीच्या परिस्थितीसाठी नेहमी सज्ज राहील, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री गजेंद्रसिंह शेखावत, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि एअर चीफ मार्शल श्री. आर. एस भदौरिया देखील यावेळी उपस्थित होते.
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1753519)
Visitor Counter : 218