संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलासाठी 56 सी-295 एमडब्ल्यू मालवाहू विमान खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


'आत्मनिर्भर भारत'ला मोठी चालना

Posted On: 08 SEP 2021 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 सप्‍टेंबर 2021 

 

प्रमुख ठळक वैशिष्ट्ये :

  • स्पेनमधून उड्डाणास तयार स्थितीतील 16 विमाने पाठवली जातील; 40 विमानांची भारतात निर्मिती केली जाईल
  • स्वदेशी क्षमता बळकट करण्यासाठी आणि 'मेक इन इंडिया'ला चालना देण्यासाठी अनोखा उपक्रम
  • सर्व विमानांमध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवले  जातील
  • आयएएफच्या जुन्या अव्रो विमानांची जागा घेतील
  • समकालीन तंत्रज्ञानासह 5-10 टन क्षमतेचे मालवाहू विमान

आज, सुरक्षाविषयक केंद्रीय  समितीने भारतीय हवाई दलासाठी स्पेनच्या मेसर्स एअरबस डिफेन्स आणि स्पेस एस. ए , कडून 56 सी-295 एमडब्ल्यू मालवाहू विमाने  खरेदी करण्यास मंजुरी दिली. सी -295 एमडब्ल्यू  विमान  5-10 टन क्षमतेची वाहतूक करणारे विमान आहे जे समकालीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे विमान भारतीय हवाई दलाच्या जुन्या  एवरो विमानांची जागा घेईल. विमानाला मागच्या बाजूला जलद प्रतिसादासाठी आणि सैन्य आणि वस्तू  पॅराशुटद्वारे सोडण्यासाठी एक  दरवाजा आहे.

करारावर स्वाक्षरी केल्यापासून 48 महिन्यांच्या आत स्पेनमधून सोळा विमाने उड्डाणक्षम  स्थितीत पाठवली जातील  आणि करारावर स्वाक्षरी केल्यापासून दहा वर्षांमध्ये टाटा कन्सोर्टियमद्वारे चाळीस विमानांची  भारतात निर्मिती केली जाईल. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यामध्ये एका खासगी कंपनीद्वारे भारतात लष्करी विमानांची निर्मिती केली जाईल. सर्व छप्पन विमानांमध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट बसवले  जातील. हा प्रकल्प भारतातील एरोस्पेस परिसंस्थेला चालना देईल ज्यामध्ये देशभरातील अनेक एमएसएमई विमानाच्या सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये सहभागी होतील.

एरो स्ट्रक्चरचे मोठ्या संख्येने तपशीलवार भाग, सब -असेंब्ली आणि प्रमुख भागांची  असेंब्ली भारतात तयार केली जाणार आहे. हा कार्यक्रम देशातील एरोस्पेस परिसंस्थेत रोजगार निर्मितीतील उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि  भारताचे हवाई क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्र यात 600 अति कुशल रोजगार, 3000 पेक्षा अधिक अप्रत्यक्ष रोजगार आणि 3000 मध्यम कौशल्य रोजगाराच्या संधीसह 42.5 लाखांपेक्षा अधिक कामाचे मनुष्य तास निर्माण करण्याची शक्यता आहे.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753306) Visitor Counter : 313