माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘आयकॉनिक वीक’ चा समारोप

Posted On: 30 AUG 2021 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2021

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘आयकॉनिक वीक’ या आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमांचा काल समारोप झाला. 23 ऑगस्टला सुरु झालेल्या या सप्ताहात मंत्रालयाच्या सर्व माध्यम विभागानी उत्साहाने भाग घेतला.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘राज्य घटनेची निर्मिती होताना’ या विषयावरच्या ई छायाचित्र प्रदर्शनाचे आणि चित्रांजली @75 या आभासी पोस्टर प्रदर्शनाचे केलेले उद्घाटन हे या सप्ताहाचे उल्लेखनीय वैशिष्ट्य ठरले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल, डॉ एल मुरुगन आणि मीनाक्षी लेखी यांच्यासह ठाकूर यांनी याचे उद्घाटन केले होते.

या आठवड्यात दूरदर्शनने ‘नेताजी’, ‘मर्जर ऑफ प्रिन्सली स्टेट्स’ यासारख्या माहितीपटांची  मालिका दाखवली. ‘राझी’ सारख्या लोकप्रिय भारतीय चित्रपटांचेही प्रसारण करण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट विकास  महामंडळाने  (NFDC) आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्म www.cinemasofindia.com वरून आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात ‘आयलंड सिटी’, ‘क्रॉसिंग ब्रिजेस’ यासारखे चित्रपट दाखवण्यात आले.  

दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक विभागानी स्वातंत्र्य सैनिक, ऐतिहासिक महत्वाच्या घटना आणि स्थळे यावर आधारित विशेष कार्यक्रम आपल्या दैनंदिन बातमीपत्रात प्रसारित केले. अनेक कम्युनिटी रेडीओनी विशेष कार्यक्रम प्रसारित केले. स्वातंत्र्य सैनिकांचे अद्वितीय योगदान, त्यांचे शौर्य, निष्ठा आणि त्याग तसेच प्रसिद्धी न पावलेले नायक यासारखे विविध पैलू  ठळकपणे दर्शवण्यात आले.

ब्युरो ऑफ आऊटरिच अँन्ड कम्युनिकेशनच्या प्रादेशिक विभागानी पथ नाट्य, जादूचे प्रयोग, कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग, लोक कथा, विविध एकात्मिक संवाद  आणि  आऊटरिच कार्यक्रमाच्या आणि गायन आणि नाट्य विभागाच्या 1000 पेक्षा जास्त पीआरटीच्या सहकार्यातून देशभरात सादर केले. नेहरू युवा केंद्र आणि आणि एनएसएस पथकांच्या सहकार्याने राज्यांमध्ये फ्रीडम वॉक आयोजित करण्यात आल्या. स्वातंत्र्य सैनिकांबाबत बेंगळूरू मध्ये आरओबी ने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ एल मुरुगन यांनी केले. राजस्थान आरओबीने आयोजित केलेल्या अशाच  प्रकारच्या  प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय राज्य मंत्री अर्जुन राम  मेघवाल यांनी बिकानेर इथे केले.

पत्र सूचना कार्यालयाच्या प्रादेशिक विभागानी देशभरात विविध विषयांवर वेबिनार आयोजित केले. स्वातंत्र्य लढ्यात राज्यांमधल्या सहभागी झालेल्यांचे योगदान ठळकपणे मांडणाऱ्या विषयांचा यात समावेश होता. स्वातंत्र्य चळवळीतले  मुंबईचे योगदान,वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक रोहिणी गवाणकर यांनी पीआयबी मुंबईने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये विशद केले. भुवनेश्वर प्रादेशिक विभागाने आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये  विविध प्रश्न मंजुषा आणि स्पर्धा या द्वारे युवा पिढीला या आयकॉनिक वीक मध्ये  सहभागी करून घेण्यात आले.

आयकॉनिक वीकच्या संकल्पनेत जन भागीदारी म्हणजेच लोक सहभाग केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता लोक चळवळ राहावी असा यामागचा उद्देश होता.  

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1750527) Visitor Counter : 272