संरक्षण मंत्रालय

मलाबार नौदल सरावात भारतीय नौदलाचा सहभाग

Posted On: 26 AUG 2021 11:37AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2021

 

भारतीय नौदल 26 ते 29 ऑगस्ट 2021 दरम्यान अमेरिकन नौदल, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (जेएमएसडीएफ) आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (आरएएन) यांच्यासह मलाबार 2021 सरावात सहभागी होत आहे.

मलाबार सागरी सरावाला 1992 मध्ये IN-USN सराव म्हणून सुरूवात झाली.  2015 मध्ये, जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स मलाबारमध्ये कायम स्वरूपी सदस्य म्हणून सहभागी  झाले. 2020 मधील सरावात  रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाचा सहभाग होता. या वर्षी 25 व्या मलाबार सरावाचे आयोजन पश्चिम प्रशांत क्षेत्रात अमेरिकन नौदलाद्वारे  केले जात आहे.

भारतीय नौदलाकडून आयएनएस शिवालिक आणि आयएनएस कदमत आणि P8I गस्ती विमान सहभागी होणार असून त्याचे नेतृत्व रिअर ऍडमिरल तरुण सोबती, व्हीएसएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इस्टर्न फ्लीट हे करणार आहेत. अमेरिकन नौदलाचे प्रतिनिधित्व USS बॅरी, USNS Rappahannock, USNS बिग हॉर्न आणि P8A गस्ती विमान करेल. जपानी नौदलाचे प्रतिनिधित्व पाणबुडी आणि पी 1 गस्ती विमानाव्यतिरिक्त जेएस कागा, मुरासामे आणि शिरानुई करतील. ऑस्ट्रेलियन नौदलाचे प्रतिनिधित्व एचएमएएस वारामुंगा करेल.

भारतीय नौदलाची जहाजे गुआम येथून निघाली आहेत. तिथे त्यांनी 21-24 ऑगस्ट 21 दरम्यान आयोजित  ऑपरेशनल टर्न अराउंडमध्ये भाग घेतला होता. यावेळी पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ऍडमिरल एबी सिंह, AVSM, VSM यांनी अमेरिकन नौदलाच्या समपदस्थांबरोबर विचारांचे आदानप्रदान केले.

मलाबार -21 मध्ये भूपृष्ठ विरोधी, हवाई विरोधी आणि पाणबुडीविरोधी युद्ध कवायती आणि इतर डावपेच आणि सामरिक कवायतींचा समावेश असेल. या सरावात  सहभागी झालेल्या नौदलांना परस्परांच्या कौशल्य आणि अनुभवांचा लाभ घेण्याची संधी मिळेल.

कोविड -19 जागतिक महामारी दरम्यान आरोग्य विषयक नियमांचे पालन करत आयोजित केलेला सराव हे सहभागी नौदल तसेच मुक्त, खुले आणि सर्वसमावेशक हिंद -प्रशांत क्षेत्राच्या सामायिक दृष्टीकोनातील समन्वयाचा पुरावा आहे.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749147) Visitor Counter : 325